

Bihar Crime News: बिहारची राजधानी पाटणातील मसौढी येथून एक धक्कादायक घटना समोर आली, जिथे केवळ दहा मिनिटे उशीर झाल्यामुळे दहावीची परीक्षा देता न आल्याच्या धक्क्यातून एका विद्यार्थिनीने धावत्या ट्रेनमधून उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली. कोमल कुमारी असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून ती मसौढीच्या खरजमा गावातील रहिवासी होती. कोमलचा पेपर मंगळवारी बरनी येथील परीक्षा केंद्रावर होता. परीक्षेसाठी सोयीचे पडावे म्हणून ती आदल्या दिवशीच परीक्षा केंद्राजवळ राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे गेली होती.
घटनेच्या दिवशी सकाळी 9:30 वाजता परीक्षा सुरु होणार होती आणि केंद्रावर पोहोचण्याची शेवटची वेळ 9:00 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती. कोमल केंद्रावर 9:10 वाजता पोहोचली, म्हणजे ती केवळ 10 मिनिटे उशिरा आली होती. नियमांचे कारण देत परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. कोमलने गेटवर वारंवार विनंती केली, "सर, प्लीज गेट उघडा, अजून परीक्षा सुरु व्हायला 20 मिनिटे शिल्लक आहेत, माझ्या करिअरचा प्रश्न आहे," असे म्हणून तिने अनेकदा विनवणी केली. मात्र, केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी तिचे काहीही ऐकून घेतले नाही आणि तिला आतमध्ये घेण्यास नकार दिला. वर्षभराची मेहनत वाया गेल्याच्या नैराश्यातून ती केंद्रावरुन माघारी फिरली.
त्यानंतर ती नदौल स्थानकावर पोहोचली आणि एका ट्रेनमध्ये बसली. तरेगना आणि मसौढी कोर्ट स्टेशनच्या दरम्यान महाराजचक गावाजवळ तिने धावत्या ट्रेनमधून उडी मारली. या भीषण अपघातात ती गंभीर जखमी झाली. पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला तिची ओळख पटू शकली नव्हती, पण पोलिसांनी तिचा फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यानंतर ग्रामस्थांनी तिची ओळख पटवली आणि पालकांना माहिती दिली.
कोमल ही तिच्या भावंडांमध्ये सर्वात मोठी होती आणि तिचे वडील मंटू यादव हे मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलीच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून परीक्षेच्या नियमांच्या अतिशय कठोर अंमलबजावणीवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एका विद्यार्थिनीच्या (Student) भविष्यापेक्षा 10 मिनिटांचा नियम मोठा ठरला का, अशी संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.