Michael Lobo : पर्रा, हडफडे व नागोआ या परिसरात मोठ्या प्रमाणात भू रुपांतरणे झाली आहेत असे नगर व शहर नियोजन मंडळाच्या विशेष समितीने केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. ही भू रूपांतरे उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाच्या (एनजीपीडीए) अध्यक्षांच्या काळात झाली आहेत व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याने त्या काळात असलेल्या आमदार मायकल लोबो व माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा या दोघांविरुद्ध चौकशी करण्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) दिली आहे, अशी माहिती तक्रारदार सुदिप ताम्हणकर यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी बार्देश तालुक्यातील पर्रा, हडफडे व नागोआ या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतजमिनींचे रुपांतर झाले असल्याचे समितीने चौकशीअंती सादर केलेल्या अहवालात स्पष्ट झाले असल्याचे म्हटले होते. त्यामुळे या अहवालाच्या आधारावर त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
आमदार लोबो हे भाजप सरकारात असताना 2012 ते 2019 च्या मध्यान्हपर्यंत एनजीपीडीएचे अध्यक्ष होते, तर त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार फ्रांसिस सिल्वेरा यांची अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली होती.
या दोघांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात जमिनीत भराव टाकून त्या पुरवणे, जमिनींच्या दस्तावेजामध्ये फेरफार करून बाह्यविकास आराखड्यामध्ये दाखवण्यात आलेल्या बांधकाम निर्बंधित क्षेत्राचा बदल करण्याचे प्रकार करण्यात आले आहे. यासाठी अध्यक्षांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे या दोघांनीही एनजीपीडीए पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी चौकशी करून कारवाईची मागणी तक्रारीत करण्यात आल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.