

पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेसाठी देवीची मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये ‘निशिद्धो पालो’ (निषिद्ध क्षेत्र) म्हणजेच वेश्यांच्या अंगणातील मातीचा वापर करणे अत्यंत पवित्र मानले जाते. उर्वरित समाज पवित्र राहावा, म्हणून आयुष्याची माती केलेल्या स्त्रियांचे काय? तशी ती होऊ द्यावी का? वस्तुस्थिती कितीही अपरिहार्य असली तरी ती समर्थनीय ठरत नाही.
बायणातली वेश्यावस्ती जमीनदोस्त झाली तेव्हा प्रत्येक किनारी भाग ‘बायणा’ तर होणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात होती. तीच भीती आता खरी ठरत आहे. पर्यटन हा गोव्याचा आर्थिक कणा आहे, परंतु पर्यटनाच्या नावाखाली कायदा बाजूला ठेवण्याची परंपरा अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचली आहे.
परप्रांतीय पर्यटक स्थानिकांच्या घराची दारे बडवून मुलींची मागणी करतात, हे कटू वास्तव हरमलमपुरते मर्यादित नाही. ती उत्तर गोव्यातील संपूर्ण किनारी भागाची चिंता बनली आहे. यापूर्वी कळंगुटमधील नग्न वास्तव ‘गोमन्तक’ने खास पानाद्वारे मांडले.
जनभावनांचे त्यात प्रतिबिंब होते. मात्र, पर्यटन वाचवण्यासाठी गुन्ह्यांकडे डोळेझाक कायम आहे, जी फक्त प्रशासनाची नाही, थेट कायदा-सुव्यवस्थेच्या मुळावर घाव घालणारी आहे.
हरमलसारख्या आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळी देहविक्री उघडपणे फोफावते, ऑनलाइन संकेतस्थळांवर जाहिराती चालतात, दलाल निर्भयपणे फिरतात तरीही यंत्रणेला ‘माहिती नव्हती’ असे सांगण्याची हिंमत होते. ही अज्ञानाची कबुली नाही, निष्क्रियतेची स्वीकृती आहे.
संतप्त नागरिकांनी डिसेंबर महिन्यात पोलिसांना निवेदन देऊनही दखल घेतली गेली नाही. गोव्यातील लोकांना आपल्या आया-बहिणींची अब्रू राखण्यासाठी कायदा सुव्यवस्था हाती घेण्याची भाषा करावी लागते, हे किती लांच्छनास्पद आहे.
अखेर नाईलाजाने पोलिसांनी कथित मसाज पार्लरवर छापा टाकून वेश्या व्यवसायात अडकलेल्या १३ युवतींची सुटका केली. लोकांच्या दबावामुळे पोलिसांना ही कारवाई करावी लागली. तो काही पोलिसांचा पराक्रम नाही.
कायदा राबवण्याचे काम नागरिकांना करावे लागते, याचा अर्थ कायदा अस्तित्वात आहे, पण अमलात नाही. पर्यटन टिकवण्यासाठी जर नागरिकांनीच पोलिसांची भूमिका घ्यावी लागणार असेल तर ही व्यवस्था कोणासाठी आहे?
दोन कनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांची बदली करून प्रशासनाने कारवाई झाल्याचा देखावा केला. परंतु बदली म्हणजे शिक्षा नाही. ती जबाबदारी झटकण्याचे साधन ठरू शकत नाही. जे गुन्हे वर्षानुवर्षे सुरू होते, ते केवळ एक-दोन कर्मचाऱ्यांच्या संमतीनेच सुरू होते, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
मग वरिष्ठ अधिकारी नेमके काय करत होते? हा प्रश्न जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला जातोय. ऊस गोड लागला म्हणून कुणी मुळासकट खात नाही. दुर्दैवाने गोव्यात ‘अति तेथे माती’ असा जागोजागी प्रत्यय येत आहे.
देहविक्री, मानवी तस्करी आणि महिलांचे शोषण हे पर्यटनाचे उपउत्पादन नाही; ते कायद्याच्या अपयशाचे परिणाम आहेत. या अपयशावर पडदा टाकण्यासाठी ‘पर्यटनाला धक्का लागू नये’ हा युक्तिवाद केला जात असल्यास ते ढोंग आहे. ‘अर्ज’ संस्थेमार्फत अरुण पांडे कितीतरी मुलींची सुटका करतात. ‘मानवी तस्करी होते’, हे पोलिसांना कळवताच ती खबर तस्करांपर्यंत आधीच कशी पोहोचते?
गोव्याची बदनामी करणारी, वेश्या व्यवसायासंदर्भात कित्येक संकेतस्थळे आज कार्यरत आहेत. ती रोखता का येत नाहीत? सायबर सेल काय करतोय? गोव्यातील महिलांची प्रतिमा दूषित करणाऱ्या ॲपच्या जाहिरातींवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी महिलांना पोलिस ठाण्याच्या पायऱ्या चढाव्या लागतात.
पोलिसांना अशी ॲप दिसत नाहीत. राज्यात मसाज पार्लर तर अलीकडच्या काळात भूछत्र्यांसारखे निर्माण झाले आहेत. तेथे परराज्यांतील मुलींना आणून शोषण केले जाते, असा आरोप आहे. ‘क्रॉस मसाज’ संदर्भात नेमकी व्याख्या नसल्याचा दावा होतो. राजधानी पणजीत चहाच्या ठेल्याप्रमाणे मसाज पार्लर आहेत.
त्यांची कधी तपासणी होत असल्याचे ऐकिवात नाही. वेश्या व्यवसायाची उदाहरणे समोर येत असल्याने ‘मसाज’ ही मूळ संकल्पनाही बदनाम होत आहे. त्यामध्ये स्पष्टता हवी. हरमलात जे घडले, ते किनारी भागातील प्रातिनिधिक चित्र आहे.
सरकारने जरा संवेदनशीलता दाखवावी. हरमल भागात वेश्या व्यवसाय फोफावण्यात काही सरकारी घटकांचा हात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. यंत्रणा निष्क्रिय झाली तर समाज अस्वस्थ होतो. प्रशासनाने आश्वासनांवर वेळ न घालवता, ठोस कृतीतून विश्वास पुनर्स्थापित करावा.
बदली करून काहीही साध्य होत नाही. बोटचेप्या भूमिकेमुळे पर्यटनस्थळे ‘हॉटस्पॉट’ नव्हे ‘हॉटबेड’ ठरू लागतात. पैशांसाठी, दबावामुळे जे लोक हा व्यवसाय चालू देतात त्यांनी लक्षात ठेवावे, की मुली त्यांनाही आहेत.
आमच्या लेखणीस याहून भलते स्पष्ट वदवत नाही, यातच परिस्थितीचे गांभीर्य ओळखा. पश्चिम बंगालप्रमाणे मोठ्या स्तरावर दुर्गापूजा इथेही होऊ लागली आहे. तिथली माती पवित्र असली तरी गोमंतकीयांची अंगणे त्यासाठी नाहीत, एवढे ध्यानात असू द्या!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.