म्हापसा: वादग्रस्त कोलवाळ मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा गंभीर गैरव्यवहार आणि सुरक्षेच्या चिंधड्या उडवणाऱ्या कारनाम्यांमुळे चर्चेत आले आहे. कायदा व सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजवत कारागृहाच्या चार भिंतींआड कैद्यांसाठी एक समांतर काळाबाजार सुरू असल्याचे उघड झाले आहे. बाहेरील बाजारातील दरापेक्षा ५ ते १० पट जास्त रक्कम मोजून कैद्यांना कथित मद्य, लक्झरी अन्न, स्मार्टफोन, अगदी अमलीपदार्थ आणि ओटीटी मनोरंजनासह परफ्युमपर्यंत सर्व सोयीसुविधा बिनदिक्कत पुरवल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
कारागृहातील अंतर्गत रॅकेटने प्रत्येक बेकायदेशीर वस्तूचे दर ठरवले असून आता हे ‘रेट कार्ड’ आणखी वाढवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. अधूनमधून जी कारवाई होते किंवा छापासत्र राबविले जाते, ते काही शिस्त किंवा धाक निर्माण करण्याचा हेतू नसतो, तर कारागृहातील कथित रेट कार्ड वाढविण्याचा हा एक मार्ग असतो, असे सूत्रांनी सांगितले.
साधा स्मार्टफोन किंवा सिमकार्ड मिळवण्यासाठी मूळ किमतीपेक्षा १० पट अधिक रक्कम उकळली जात असून या मोबाईलवरून नेटफ्लिक्स, जिओ-हॉटस्टार सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापरही बिनदिक्कत सुरू आहे. तसेच गांजा, चरस, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ कारागृहात सहज उपलब्ध असून त्यासाठी ५ ते १० पट जादा पैसे मोजले जात आहेत. बाहेरचे चविष्ट अन्न, शीतपेये, नामांकित परफ्युम आणि इतर चैनीच्या वस्तूही ५ पट जादा दराने पुरवल्या जात आहेत.
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांचे नेटवर्क
गोव्यातील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांचे नेटवर्क कारागृहातूनच चालवले जात असल्याचे अनेकदा पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे, तसेच कारागृहातील अंतर्गत वर्चस्वावरून कैद्यांमध्ये रक्तरंजित हाणामारी आणि हल्ल्यांच्या घटना वारंवार घडल्या आहेत. यापूर्वीही कैद्यांना बेकायदेशीर मदत करताना अनेक रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे, तरीही या रॅकेटचे मूळ नष्ट करण्यात प्रशासनाला अद्याप अपयश आले आहे.
गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्यासाठी उभारण्यात आलेले कोलवाळ कारागृह आता ‘पैसा फेको, तमाशा देखो’ या तत्त्वावर चालणाऱ्या ऐशआरामी रिसॉर्टसारखे भासू लागले असून सामान्य जनतेतून आणि राजकीय वर्तुळातून यावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता कारागृह महानिरीक्षक आणि गृह खाते या संपूर्ण साखळीवर कधी आणि कशी कठोर कारवाई करणार, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
‘फूड इकॉनॉमी’ ः तंदुरी ७ हजार रुपये
कारागृहाच्या चार भिंतींच्या आत खास खाद्यपदार्थांची अनधिकृत विक्री आणि मोठी ‘फूड इकॉनॉमी’ सुरू असल्याचा प्रकारही समोर आला आहे. येथे स्वयंपाकीही कैदी आहेत, ग्राहकही कैदी आहेत आणि हे स्वयंपाकघर थेट कारागृहाच्या आतच चालवले जात आहे.
सूत्रांनुसार, कारागृहात पंचतारांकित हॉटेलपेक्षाही जास्त दराने अनधिकृतपणे खाद्यपदार्थ विकले जात असून यात तंदुरी किंवा ग्रेव्हीचे पदार्थ सुमारे रुपये ७ हजार, चिकनचे आठ तुकडे रुपये ४ हजार, फ्राइड राइस रुपये १ हजार आणि तळलेल्या अथवा शिजवलेल्या माशाचा एक तुकडा तब्बल ५०० रुपयांना विकला जात आहे असे बोलले जाते. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
‘इझी मनी’च्या हव्यासापोटी सुरक्षा धोक्यात
हा संपूर्ण काळाबाजार काही कथित भ्रष्ट कर्मचारी, रक्षक आणि बाहेर बसलेल्या दलालांच्या साखळीमार्फत चालवला जातो. बाहेरून पैशांची देवाणघेवाण झाल्यानंतरच आतील ‘व्हीआयपी’ कैद्यांपर्यंत या वस्तू पोहोचवल्या जातात. सुरक्षेच्या नावाखाली बसवलेले स्कॅनर्स आणि सीसीटीव्ही केवळ नाममात्र ठरले असून ‘इझी मनी’च्या हव्यासापोटी कारागृहाची सुरक्षा पूर्णपणे धोक्यात आली आहे.
स्थापनेपासूनच कारागृह गैरप्रकारांचे केंद्र
कोलवाळ कारागृह आणि वाद हे समीकरण नवे नाही. २०१५ मध्ये आग्वाद आणि म्हापसा येथील जुनी कारागृहे बंद करून आधुनिक सुविधांयुक्त म्हणून कोलवाळ कारागृहाची स्थापना करण्यात आली होती. मात्र, स्थापनेपासूनच हे कारागृह गैरप्रकारांचे केंद्र बनले आहे. अचानक केलेल्या तपासणीत कैद्यांच्या बराकींमधून वारंवार स्मार्टफोन्स, चार्जर आणि सिमकार्डस् सापडल्याच्या घटना घडल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.