लक्ष्य ठरवले की ते साध्य कसे करायचे, हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना चांगलेच ठाऊक आहे. राजकारणासह क्रीडा मैदान व कॅरमबोर्डवरही. पेशाने डॉक्टर असलेल्या सावंत यांना क्रीडा क्षेत्रातही विशेष रुची आहे. क्रिकेट आणि फुटबॉलनंतर आता साखळीतील ईगल क्लबच्या उद्घाटनात त्यांनी कॅरममध्येही हात अजमावला. कुठल्या सोंगटीवर स्ट्रायकर सोडला की बाकी सोंगट्या आपोआप रेषेत येतात, या संदर्भातील त्यांचा ‘अंदाज’ पाहून उपस्थितांनीही दाद दिली. असे म्हणतात ना, हातात अनुभव असला की सोंगट्यांनाही फार हट्ट करता येत नाही! ∙∙∙
पणजी महापालिकेत बदल घडवून आणण्यासाठी गरज पडली तर काँग्रेसचा पाठिंबा घेण्याची तयारी उत्पल पर्रीकर यांनी दर्शवली होती व त्यामुळे मूळ भाजपवाल्यांना उकळ्या फुटू लागल्या होत्या. पण आता प्रदेश कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केलेल्या विधानामुळे हे सगळे औटघटकेचे ठरणार, अशी चिंता अनेकांना पडू लागली आहे. पाटकर यांनी उत्पलना जे विचारधारेबाबत जे आवाहन केले आहे, त्यामुळे हे भाजपवाले तर बिथरले आहेतच. पण खुद्द उत्पल पर्रीकरांसमोरही धर्मसंकट उभे ठाकले आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे काहींना तर बाबूश परवडला असे वाटले तर नवल नाही, असेही म्हटले जात आहे. अनेकांना उत्पलबाबत सहानुभूती आहे, पण त्यासाठी कॉंग्रेसशी सोयरीक ही गोष्ट कशीच पचनी पडत नाही म्हणे. त्यामुळे लग्नापूर्वीच फारकत, असे तर घडणार नाही ना, अशी भीतीही तयार झाली आहे. ∙∙∙
बाणावलीचे पेले फर्नांडीस हे एक उमदा व्यक्तिमत्व. सदैव आनंदीत व चेहऱ्यावर हास्य फुलवीत फिरणारी व्यक्ती. ते एक रांपणकार व सर्वांना आकर्षित करण्याची कला त्यांच्याकडे आहे, ‘everyday is a good day in Goa’ असे म्हणणारे पेले शनिवारी भलतेच खूष झालेले दिसले. रांपणकारांचा दिवस त्यांनी साजरा केला व त्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहिले म्हणून त्यांच्या आनंदाला उधाण आले होते. आम्ही मुख्यमंत्री डॉ. सावंत किंवा मत्स्यव्यवसाय मंत्री हळर्णकर यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यासाठी पर्वरीला गेलो नव्हतो. ते केवळ एका फोन कॉलवर उपस्थित राहिले म्हणून पेले खूष झाले. पेलेने रांपणकारांच्या समस्या मांडल्या. जमीन देण्याची विनंती केली व मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासनही देऊन टाकले. त्यासाठी पेले खूष हुआ. मात्र मुख्यमंत्री आश्वासनाची पूर्तता कधी करतात, ते पहावे लागेल. ∙∙∙
फोंडा पोटनिवडणूक लढविण्यासाठी डॉ. केतन भाटीकर सज्ज झाले असून त्यांनी आपली हवाही तयार केल्याने भाजपच्या गोटात हलचल माजणे साहजिकच आहे. भाटीकर यांना काँग्रेस उमेदवारी मिळाल्यास भाजपला ही निवडणूक जड जाणार, असे आता राधाराव सारखे राजकारणीही म्हणू लागले आहेत. त्यामुळे भाटीकरांचा पत्ता कट करण्याचे कारस्थान सुरू झाले असून भाजपातीलच काही नेते काँग्रेस नेत्यांना भेटून काँग्रेस उमेदवारी भाटीकर यांना न देता ती दुसऱ्यालाच द्यावी, यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जाते. ही खेळी यशस्वी होईल की, त्यातून वेगळेच राजकारण तयार होईल? काही दिवसांतच हे स्पष्ट होणार म्हणा ! ∙∙∙
महानगरपालिकेच्या नगरसेवकाने अपक्ष निवडून आल्यानंतर सत्ताधारी गटात प्रवेश करीत आपण बाबूश मोन्सेरात यांचे खंदे समर्थक असल्याचा दावा करण्यास सुरुवात केली. शिवाय त्यांच्या कार्यालयात त्यांचे वजनही वाढले, तो मागेल ते काम पूर्ण होत होते. गेली चार वर्षे त्याचा दबदबा राहिला पण येणाऱ्या निवडणुकीत त्याच्या उमेदवारीवर फुली मारली गेली असल्याने त्याची अस्वस्थता बरीच वाढली. अखेर त्याने आपल्या काही समर्थकांना घेऊन म्हणे आमदारांकडे लोटांगण घालायचे ते घातले आहे. हे लोटांगण फलदायी ठरल्याची चर्चा आता सुरू आहे. या प्रभागात महिला आरक्षण पडल्यास तो सांगेल त्या महिलेला उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जाते. शिवाय केवळ याच नाहीतर काही मर्जीतल्या नगरसेवकांनाही पत्नीच्या उमेदवारीच्या तयारीला लागा, असा संदेश पोहोचवण्यात आला असल्याची चर्चा पाटोपुलावरून रायबंदरपर्यंत होऊ लागली आहे.∙∙∙
राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो व कोण कोणाचा कायमचा मित्र नसतो. जो फायद्याचा ठरतो तो मित्र जो आपल्या फायद्याचा नाही, तो शत्रू हे तत्व राजकारणी अंगिकारतात. आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या खांद्याला खांदा लावून वावरणारे काही कार्यकर्ते व हितचिंतक आता युरीच्या विरोधात गेले आहेत. युरी आलेमाव यांच्या गटातून निवडून आलेले एक नगरसेवक, युरी यांच्याबरोबर निवडणुकीत व निवडून आल्यावर युरी बरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेले व युरी आलेमाव यांच्या ‘पे लिस्ट’ वर राहिलेले एक मार्गदर्शक व युरी आलेमाव यांचे सोशल मीडिया हँडलर म्हणून वावरणारे एक कार्यकर्ते हे तिघे ही सोशल मीडियावर युरी आलेमाव यांचे अपयश उघड करण्यासाठी धडपडत आहेत. यावर काँग्रेस गटाध्यक्ष व त्यांची टीम ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न करीत आहे. ∙∙∙
मडगावचे आमदार व सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबरबाब कामत यांनी आपण केव्हाही नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयार असल्याचे सांगून मडगावातील विरोधकांना जागृत केले आहे. गेल्या एक दोन दिवसांपासून त्यांचे मडगावातील विरोधक हळूहळू एकत्र येऊ लागले आहेत व त्यांच्यामध्ये खलबते सुरू झाली आहेत, असे संकेत मिळत आहेत. यात केवळ कॉंग्रेस किंवा इतर पक्षांचेच नव्हे तर भाजपमधील त्यांचे विरोधकांनीही हालचालींना सुरवात केल्याचे भाजपमधील कार्यकर्तेच बोलत असताना दिसत आहेत. यात कोणाला किती यश संपादन करता येते हे पहावे लागेल. तात्पर्य काय तर या परिस्थितीत दिगंबरबाब कामत यांची खरी कसोटी आहे, असे लोक आता बोलत आहेत. ∙∙∙
फोंड्यातील ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्र्यासमवेत सहकारमंत्री सुभाष शिरोडकर आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर उपस्थित होते. या कार्यक्रमात ॲग्री बाजार प्रकल्पातील नवीन सोलर वीज यंत्रणेचे उद्घाटनही करण्यात आले त्यानंतर मंत्री सुभाष शिरोडकर यांनी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची स्तुती करताना वीज खात्यातर्फे शिरोड्यात खूप चांगली कामे झाल्याचे नमूद करताना त्याचे सारे श्रेय ढवळीकरांना दिले. पूर्वीसारखा विजेचा लपंडाव आता होत नाही, असे सांगताच सुदिनरावांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.