

मडगावच्या नगरपालिकेत पुष्कळ उंदीर झाले आहेत. त्यामुळे फाईल कुरतडण्याचे प्रकार वाढले आहेत. या उंदरांना पकडण्यासाठी पालिकेतर्फे अनेक उपाय करण्यात येतात. एक मांजरीसुद्धा पाळली आहे, पण गेल्या काही दिवसांपासून तीही गायब झाली आहे. त्यामुळे उंदरासाठी पिंजरे ठेवले आहेत. काही प्रमाणात त्यांना यश मिळाले व पिंजऱ्यात उंदीर सापडले. पण आता प्रश्न निर्माण झाला आहे तो दोन पायांच्या उदरांचा. पालिकेतील महत्त्वाच्या फाईल्स गहाळ होतात. हे प्रकरण गाजले व गाजत आहे. या प्रकरणात हात असलेल्या या दोन पायांच्या उंदरांना कसे रोखणार, हा प्रश्न सध्या मठग्रामस्थ एकमेकांना विचारू लागले आहेत ∙∙∙
राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ६ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील रवी नाईक यांची जागा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कधी भरणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेले आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंत या जागी रवींचे ज्येष्ठ सुपुत्र रितेश नाईक की आणखी कोण, याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. सरकारने राजीव गांधी कला मंदिराचे अध्यक्षपद रितेश यांना दिल्याने गेल्या तीन वर्षांपासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या तीन आमदारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. ते वारंवार मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील सरकारी बंगल्याच्या पायऱ्याही झिजवत आहेत. आता यात मुख्यमंत्री काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्याच्या नजरा लागून आहेत. ∙∙∙
मुरगावातील जनतेने विरोध केल्यानंतर सरकारने आता आयआरएफ फॉर्म्युला ४ शर्यत १४ आणि १५ फेब्रुवारीला मोपा विमानतळावर आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. परंतु, मोपातील नागरिकांनीही या शर्यतीला विरोध दर्शवला आहे. तरीही गोवा मोटरस्पोर्ट संघटनांनी या शर्यतीला पाठिंबा देत, यामुळे राज्यातील क्रीडा पर्यटनाला चालना मिळण्याचा तसेच राज्यातील तरुण रायडर्स व ड्रायव्हर्सना प्रोत्साहन मिळण्याचा दावा केलेला आहे. पण, काहीही झाले तरी मुरगाववासीयांप्रमाणेच या शर्यतीसंदर्भातील भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतल्याची चर्चा सुरू आहे. ∙∙∙
गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर सध्या बरेच फॉर्मात आहेत. बुधवार-गुरुवारी ते दिल्लीला होते. तेथे त्यांनी दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियातोंची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी ते मडगावात वीज नियामक मंडळ म्हणजे जेईआरसीच्या सार्वजनिक सुनावणीला हजर राहिले. शनिवारी दुपारी नवी दिल्लीत गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्याबरोबर काँग्रेसच्या राष्ट्रीय पत्रकार परिषदेला हजर राहिले. त्यात त्यांनी भाजपकडून होणारा गोव्याचा विनाश यावर पत्रकारांना संबोधितही केले. त्यामुळे गोव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा तयार होण्यास मदत होईल. पाटकरांनी हीच गती राखली तर २०२७ मध्ये राज्यात काँग्रेसला सत्ता काबीज करणे सोपे होईल, असे राजकीय जाणकारांना सध्या तरी वाटते. ∙∙∙
फॉर्मुला रेस होणार की नाही, यावर सध्या एवढी धूळ उडतेय की रेस झाली तरी इतकी उडणार नाही. विरोधक म्हणतात, आम्ही स्थानिक. आमच्या जमिनी मोपा विमानतळाला गेल्या, पण योग्य मोबदला मिळाला नाही. आणि त्याच श्वासात मोटर स्पोर्टस् असोसिएशन ठामपणे सांगते, या विरोधाचा आणि रेसचा काहीही संबंध नाही. मग प्रश्न पडतोच ना, संबंध नाही तर एवढा ताप का? गरज नाही, अडचण नाही, थेट नुकसानही दिसत नाही. तरीही विरोध का? यामागे एखादी राजकीय खेळी आहे का? कुणी तरी नेता लोकांना पुढे करून ‘पॉलिटिक्स’ खेळतोय का? की काहींना थेट स्पोर्टस् पर्यटनच नको आहे? कारण ठोस नाही, मुद्दे धूसर, पण विरोध मात्र फुल! त्यामुळे रेस होणार की नाही, यापेक्षा ही राजकीय रेस नेमकी कोण जिंकणार? अशी चर्चा अधिक. ∙∙∙
सरकारी उत्सवांना योग्य नियम व शिस्त नसली की, त्याचा कसा फज्जा उडतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोव्यात सरकारी निधीतून साजरे होणारे शिगमोत्सव. राज्य सरकारच्या पर्यटन खात्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या शिगमोत्सव मिरवणुकीत रोमटामेळ, लोकनृत्य व चित्ररथ स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत भाग घेणारी मंडळे खरोखरच अथक परिश्रम घेतात. आपला वेळ खर्च करतात. मात्र, या स्पर्धा उशिरा सुरू होतात व मध्यरात्रीपर्यंत उशिरा संपत आल्यामुळे लोकांना राज्यातील अनोख्या व अथक परिश्रमाने सादर करण्यात येत असलेल्या रोमटामेळ व इतर स्पर्धांचा आनंद उपभोगता येत नाही. या स्पर्धांत भाग घेणाऱ्या रोमटामेळ पथकांना त्यांची कला सादर करण्यासाठी वेळ घालून दिली व स्पर्धा वेळेवर सुरू केल्या तर ‘सोने पे सुहागा’ होऊ शकते.आपले पर्यटन खाते याबाबत विचार करणार का? नाही तर खर्च केलेला पैसा व कलाकारांचे श्रम पाण्यात गेल्या सारखे होणार हे निश्चित! ∙∙∙
राधाराव ग्रासियस यांची ओळख गोव्याच्या राजकारणात काँग्रेसविरोधक अशीच आहे. पण अधूनमधून ते काँग्रेसच्या बाजूनेही उभे राहिलेले हल्लीच्या काळात दिसून आले आहे. कारण ते म्हणतात, मला भाजप परत सत्तेवर आलेले आवडणार नाही. याच राधारावांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकून, फोंड्यात केतन भाटीकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली तर भाजपला ते महागात पडू शकतात’ असे म्हटले आहे. यावर एकाने, तुम्ही काँग्रेसच्या प्रेमात कधी पडलात?, असा प्रश्न राधावारांना केला असता, ‘मी काँग्रेसच्या प्रेमात नव्हे तर भाजपच्या विरोधात आहे’ असे राधाराव यांचे उत्तर. काही का असेना, राधारावांनी आपला नैतिक पाठिंबा केतन भाटीकर यांना दिला आहे, हेही नसे थोडके. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.