Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; चर्चिलचे ‘अजून यौवनात मी’!

Khari Kujbuj Political Satire: केरी - पेडणे येथे बेकायदेशीररीत्या चालू असलेल्या पॅराग्लायडिंगने दोघांचा बळी घेतल्यावर कोलवा येथे चालू असलेले पॅराग्लायडिंग म्हणे मागचे दोन दिवस बंद ठेवण्यात आले आहे.

Sameer Panditrao

चर्चिलचे ‘अजून यौवनात मी’!

निवडणुका जवळ आल्या की गोव्यातील अनेक राजकीय नेते सक्रिय होत असतात. स्वतःला ‘लोकांचो मनीस’ म्हणविणाऱ्या बाणावलीतीत चर्चिल इरमावांचे तसेच असावे. त्यांनी मुख्यमंत्री ते खासदारापर्यंतची सगळी पदे उपभोगली आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेली आहे. पण अजून त्यांची राजकारणातील खुमखुमी काही कमी झालेली दिसत नाही. आगामी निवडणुकीत आपण बाणावलीतून उतरणारच, पण शेजारच्या मतदारसंघातही आपला उमेदवार असेल असे जे त्यांनी निवेदन केले आहे, त्यामुळे अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. वास्तविक २०१२ मधील निवडणुकीत त्यांच्यासकट त्यांच्या कुटुंबातील तिघांना मतदारांनी झिडकारले व तेव्हापासून ते पुन्हा निवडून येऊ शकलेले नाहीत, तरीही त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा लोप पावलेली नाही असेच राजकीय क्षेत्रात मानले जाते. आपल्या कन्येला राजकारणात आणण्याची त्यांची इच्छाही अजून सफल झालेली नाही. आता ते पुन्हा निवडणुकीत उतरणार ते कोणत्या पक्षाच्या तिकिटावर असे विचारले जाऊ लागले आहे. दुसरीकडे बाणावलीचे आमदार व्हेंझी यांनी केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कोडकौतुकामुळे विमनस्क होऊन तर चर्चिलनी निवडणूक लढविण्याचा संकेत दिलेला नाही ना अशी विचारणाही होऊ लागली आहे. ∙∙

कोलव्यात पॅराग्लायडिंग बंद?

केरी - पेडणे येथे बेकायदेशीररीत्या चालू असलेल्या पॅराग्लायडिंगने दोघांचा बळी घेतल्यावर कोलवा येथे चालू असलेले पॅराग्लायडिंग म्हणे मागचे दोन दिवस बंद ठेवण्यात आले आहे. या पॅराग्लायडिंगच्या विरोधात स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली होती, पण हे पॅराग्लायडिंग काही थांबले नव्हते. मात्र, आता केरीची ती घटना घडल्यावर या कोलव्यातील ऑपरेटरचे ऊर भरून आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला की सध्या वातावरण तापलेले आहे. ते थंड होईपर्यंत थांबुया असा विवेकी विचार त्याने केला असावा? ∙∙∙

फोंड्यात ‘लगीन घाई’

‘भाजप - म. गो. युतीचे संकेत’ या मथळ्याखाली दै. ‘गोमन्तक’मध्ये शनिवारी प्रसिद्ध झालेल्या राजकीय वृत्ताने फोंड्यात निवडणुकीकरता इच्छुक असलेल्या नवरदेवांची ‘लगीन घाई’ सुरू झाली असल्याचे पोहायला मिळत आहे. पुढील निवडणुकीत या दोन पक्षांची युती झाल्यामुळे रिंगणात एक पक्ष कमी होणार आहे. त्यामुळे आता काहींची फोंड्यात नवीन पक्ष आणून त्याची उमेदवारी मिळवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात मायावतीचा बहुजन समाज पक्ष, एकनाथ शिंदे गटाचा शिवसेनेसारख्या पक्षांची नावे घेतली जात आहेत. आता बघुया कोणता पक्ष येतो तो आणि फोंड्यात कोण कोण उमेदवारी मिळवतात ते. मात्र, गेले दोन दिवस ‘गोमन्तक’मधील या वृत्ताने खळबळ माजवली असून या वृत्ताची आणि त्यामुळे प्रेरित होऊन बाशिंग बांधू पाहणाऱ्या नवरदेवांच्या ‘लगीन घाई’ची फोंडा शहरात ‘चर्चा’ सुरू झाली आहे एवढे नक्की. ∙∙∙

बोडगेश्‍वर जत्रोत्सवात पार्किंगच्या नावावर लूट

म्हापशातील देव बोडगेश्‍वराच्या जत्रेला गेलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांची पार्किंगच्या नावाखाली लूट करण्यात आली. मात्र, या लुटीकडे सरकार आणि देवस्थान समितीने गांभीर्याने पाहिले नाही असा आरोप करण्यात येत आहे. बोडगेश्‍वर देवालयाजवळील शेतात पार्किंगसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, ही व्यवस्था खासगीरीत्या करण्यात आली होती. या जागेत पार्क करणाऱ्या दुचाकीस्वारांना तीस रुपये, तर चारचाकी वाहनचालकांना पन्नास रुपये आकारण्यात आले. दहा मिनिटांसाठी तीस आणि पन्नास रुपये आकारण्यात येत असल्याने अनेकांनी संबंधितांकडे हुज्जत घातली, पण तुम्ही काय करायचे ते करा, असा पवित्रा या पार्किंगवाल्यांनी घेतल्याने काहीजणांनी तर म्हापसा पोलिस स्थानकाला फोन केला, पण कुठेच दखल घेतली गेली नाही. देवाच्या नावावर पार्किंगसाठी चाललेल्या या लुटीमुळे भाविकांचा हिरमोड झाला. पार्किंगची जागा खासगी असली तरी त्यावर सरकार किंवा देवस्थान समितीचे नियंत्रण हवे होते. दर नियंत्रित केले असते, तर या वाहनचालकांना देवदर्शनाचे समाधान तरी मिळाले असते, अशाच प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसल्या. ∙∙∙

पणजीत दलाली

पर्यटन उद्योगातील बेकायदेशीर व्यवहार केरी येथील दुर्घटनेतून उघड झाल्यानंतर सरकारला जाग आली. आता कारवाई जरी केली जात असली तरी ती दीर्घकाळ चालणार, याची आशा कमीच दिसते. त्यात राजधानी पणजीत दलाल खुलेआमपणे वावरताना दिसूनही पोलिसांकडून काहीही कारवाई केली जात नाही. पोलिस खात्यात मोठ्या संख्येत नोकरभरती होऊनही पोलिस शिपाईंचा तुटवडा आहे की काय असा सवाल लोकांना पडतोय. पोलिसांची कमतरता असल्याचे कारण अनेकदा पुढे केले जात होते. मात्र, नोकरभरती होऊनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. पणजीतील हे दलाल महाराष्ट्र, कर्नाटक किंवा इतर राज्यांतील वाहन दिसल्यास पाठलाग करून त्रास देतात. त्यामुळे कारवाई करण्यासंदर्भात सरकार खरोखरच गंभीर आहे, की नाही हा चर्चेचा विषय झाला आहे. ∙∙∙

पर्यटनात गैरकारभार

गोव्यातील पर्यटनाची चर्चा चुकीच्या कारणांसाठी राष्ट्रीय पातळीवर होत असताना केरी येथे झालेल्या पॅराग्लायडिंग दुर्घटनेत दोन मृत्यू झाल्यानंतर सरकारला जाग आली. मुख्य म्हणजे परप्रांतीय व्यक्ती येथे येऊन नियम धाब्यावर बसवून खुलेआम कारभार करत असल्याने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परवाना, सुरक्षा आणि प्रशिक्षण नसताना पर्यटनाच्या नावाआड हे प्रकार कोणाच्या आशीर्वादाने चालतात असे प्रश्न लोकांना पडले आहेत. अखेर परप्रांतीयांच्या लुडबुडीमुळे राज्यातील पर्यटन उद्योगातील बेकायदेशीर व्यवहार समोर येत असून ‘ब्रँड गोवा’ची बदनामी होते. हे कारभार थांबणार काय? असेच सुरू राहणार हा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. ∙∙∙

‘फिल्म सिटी’ला विरोध ४४ जणांचा!

लोलये हा गोव्याच्या अगदी दक्षिण टोकावरील गाव. या गावाने गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामात तसेच गोवा मुक्तीनंतरच्या राजकीय व सामाजिक घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे व अजून बजावताना दिसत आहे. मागे या गावातील शेंद्रे येथील समुद्रकिनारी भागात होऊ घातलेले शहा यांचे निसर्गोपचार केंद्र व त्यानंतर अगदी हल्लीच भगवती पठारावर होऊ घातलेली आयआयटी तेथील स्वतःस जागृत म्हणविणाऱ्या लोकांनी विरोध करून पिटाळून लावली. आता तसाच विरोध तेथे ‘फिल्म सिटी’ला होत आहे. कोमुनिदाद संस्थेने या प्रकल्पास आवश्यक जमीन देण्याचे मान्य केले आहे, पण त्याला लोक विरोध करत आहेत. परवा रविवारी झालेल्या ग्रामसभेत तसा ठराव संमत केला गेला. बैठकीस ७५ ग्रामस्थ उपस्थित होते. त्यातील ४४ जणांनी विरोध केला. त्या घटनेला व्यापक प्रसिध्दीही दिली गेली, पण मुख्य मुद्दा म्हणजे गावातील मतदारांची संख्या किती, त्यातील अवघे ७५ उपस्थित राहिले व ४४ जणांनी विरोध करून बाजी मारली व संपूर्ण गावाचे भवितव्य ठरविले आता बोला. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT