Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यालाही हवा एक जरांगे

Khari Kujbuj Political Satire: डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ यांनी २०२७ ची विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.
Goa Political Updates
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यालाही हवा एक जरांगे

गोव्यामध्ये मराठीचा विषय लावून धरण्यासाठी एक जरांगे हवा आहे. माजी आमदार नरेश सावळ यांचे हे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गावागावांत मराठीचे कार्यकर्ते आहेत. सध्या मात्र ते घरात बसून आहेत. ते गप्पा करतात, पण मराठीसाठी घराबाहेर पडून काहीच करत नाहीत. ते सारे सक्रिय झाले, तर मराठी राजभाषा करण्यासाठी सरकारकडे मागणीही करावी लागणार आहे. त्यांना सक्रिय करण्यासाठी एका जरांगेची गोव्याला गरज आहे. ∙∙∙

नरेश सावळांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा

डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ यांनी २०२७ ची विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. मगो पक्ष सोडल्यावर ते लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. सध्या ते कोणत्याही पक्षात नाहीत. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी त्यांची असलेली जवळीक दडून राहिलेली नाही. रविवारी साखळी येथील मराठी राजभाषा संमेलनात डिचोलीतून आपण निवडून आलो, तर मराठीच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देऊ असे जाहीर वक्तव्य केले आहे. यामुळे वेगळी राजकीय समीकरणे पडद्याआड आकाराला येत असल्याचे उघड झाले आहे. ∙∙∙

चर्चिल उतरणार निवडणूक आखाड्यात

आमदार, मुख्यमंत्री, मंत्री, खासदार अशा अनेक पदावर आरूढ होऊन राजकारणात पूर्ण मुरलेले वार्केचे पात्रांव चर्चिल आलेमाव बाब २०२७ ची विधानसभा निवडणूक लढणार आहेत. स्वतः त्यांनी ते जाहीर केले आहे. निवडणुकांना दोन वर्षे बाकी आहेत. त्यावेळी ते ७८ वर्षांचे झालेले असतील. निवडणूक लढविण्यासाठी कोणीही कोणाला अडवू शकत नाहीत, पण चर्चिलने हा निर्णय का घेतला असावा हा प्रश्न सर्वांनाच पडणे साहजिकच आहे. व्हेंझीबाब मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे अडचणीत आले आहेत. नेमके याचवेळी चर्चिलबाब निवडणूक लढविण्याची घोषणा करतात हा केवळ योगायोग की धोरणात्मक निर्णय हेसुद्धा कळत नाही. मध्यंतरी त्यांनी आपली कन्या वालंकाला निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले, पण तिच्या वाट्याला पराजय आला. हल्ली त्यांचा मुलगा सावियो बाणावलीत राजकीय हालचाली करताना दिसत आहे, पण लोक त्याला स्वीकारतील असे सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे चर्चिलबाब स्वतः निवडणुकीच्या आखाड्यात तर उतरू पाहात नाहीत ना अशी चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

बिबट्याला ओढ समुद्राची...

आश्वे-मांद्रे भागात बिबट्याचे दर्शन झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच गावकऱ्यांच्या चर्चेला उधाण आले आहे. समुद्राकडे बिबटा मासे खाण्यासाठी आणि किनाऱ्यावर बसून सूर्यास्त पाहण्यासाठी आला अशा खेळीमेळीच्या चर्चा भागात सुरू झाल्या. आपल्या किनाऱ्यावर पर्यटक कमी झालेत, म्हणून बिबटाच पर्यटक म्हणून आला असावा! असे टोमणे देखील ऐकू येतात. व्हिडिओतील वाघ खराखुरा आहे की कोणाच्या तरी कॅमेऱ्याच्या कौशल्याची कमाल, यावरही लोकांचे वेगवेगळे मत आहे. वन विभागाने मात्र यावर शांत राहणे पसंत केले असून ही शांतता लोकांना आणखी गोंधळात टाकत आहे. बिबटा येणार असेल, तर त्याला नारळ, फुले आणि गोडधोड हवेच असे देखील मिस्कीलपणे लोक बोलत आहेत. ∙∙∙

रवींची कल्पकता दामूंना लाभ

भारतीय जनता पक्षाने राज्यातील सर्वात मोठ्या असलेल्या भंडारी समाजाच्या प्रतिनिधीकडे पक्षाची धुरा सोपवली असे म्हटले, तर अतिशयोक्ती ठरणार नाही. तसे पाहिले, तर दामू नाईक हे या पदाला योग्य व्यक्ती आहेत, पण काहींच्या मते असे वर्तवले जाते की, राज्यात भंडारी समाजाचे मोठे नेते असलेले रवी नाईक यांनी देव रूद्रेश्‍वराची रथयात्रा सुरू केली त्याचा लाभ दामूंना मिळाला. रवी पात्राव तसेच कल्पक. भंडारी समाजाला एकत्रित आणण्यासाठी त्यांनी देव रूद्रेश्‍वराचे साहाय्य घेतले आणि त्याला चांगला प्रतिसाद केवळ भंडारीच नव्हे, तर इतर समाजातील लोकांकडूनही मिळत आहे. आता रूद्रेश्‍वर हा देव केवळ भंडारी समाजाचा नाही तर तो सर्वांचा आहे, ही गोष्ट अलाहिदा. पण रवी पात्रावांकडून रथयात्रेच्या निमित्ताने भंडारी समाजाची चाचपणी होत आहे आणि देव रूद्रेश्‍वर दामू नाईक यांना पावला अशीच चर्चा सध्या होताना दिसत आहे. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्याच्या प्रेमात पडलेला आमदार

गोष्ट पॅराग्लायडिंगची!

केरी समुद्रकिनारी बेकायदा पॅराग्लायडिंग करताना दोघे मृत्युमुखी पडले. यावर पर्यटन विभागाने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, या पॅराग्लायडिंगला परवानगी दिली नव्हती. मग इतके दिवस हा गैरप्रकार सुरू असताना, कुठल्याच शासकीय यंत्रणांनी कारवाई का केली नाही? या गैरप्रकाराबाबत इतके दिवस सरकारी विभागाची चुपी का? हा प्रश्न अनुत्तरित राहतो. पण यामागे मोठे अर्थकारण असल्यानेच या अनधिकृत पॅराग्लायडिंगकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात होते का? हा संशय बळावतो. मध्यंतरी याच पॅराग्लायडिंगमुळे एका पोलिसावर निलंबनाची कारवाई झाली होती! वेळीच या बेकायदा पॅराग्लायडिंगवर कारवाई झाली असती, तर दोन जीव वाचले असते! ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: 'दामूं'ना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार का जाहीर केले नाही? भंडारी समाजाला 'लॉलीपॉप' दाखवल्याचा चोडणकरांचा आरोप

साखळीत जनता ‘रोजगार’

साखळी येथे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. या दरबारला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. विविध सरकारी खात्यांमध्ये विविध पदांसाठी जाहिराती देण्यात येत आहेत, तसेच काही पदांसाठी पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेतल्या जात आहेत. त्यामुळे ‘कॅश फॉर जॉब’कडे धावणारे आता आमदार व मंत्री यांच्याकडे धावू लागले आहेत. ज्यांचा कोणी नाही तेसुद्धा जनता दरबारमध्ये उपस्थिती लावून आपल्या समस्या मांडत आहेत. हे सरकार अंत्योदय तत्त्वावर चालणारे सरकार असून कोणावरही अन्याय होणार नाही. ‘भिवपाची गरज ना’ असे नेहमीप्रमाणे सांगून त्यांची समजूत काढत होते. बहुतेकांनी या जनता दरबारला उपस्थिती लावण्याचे मूळ कारण सरकारी खात्यामध्ये नोकऱ्यांसाठीचे होते. नोकऱ्यांची भरती राज्य कर्मचारी निवड आयोगामार्फत होत असली तरी या आयोगावर असलेले अधिकारी हे एकेकाळी सरकारी सेवेतीलच आहेत. त्यामुळे ही नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक असल्याचे सांगितले जात असले तरी लोकांचा त्यावर भरवसा नसल्याने जनता दरबारला गर्दी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com