डिचोली: धावस्करवाडा-कारापूर येथे दोन गटांमध्ये झालेल्या राड्यात सुमारे आठजण जखमी झाले. या राड्यावेळी एका गटाकडून आठ दुचाकींची मोडतोड करण्यात आली. सायंकाळी धावस्करवाडा येथे भर रस्त्यावर झालेल्या या हाणामारीत गौरीश घाडी याच्यावर कोयत्याने तर सतीश घाडी याच्यावर अन्य शस्त्राने हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात गौरीश घाडी हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू राम उर्फ पप्पू धावस्कर हेही जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारापूर येथील युवकांचा एक गट पूर्वीच्या वादातून सागर धावस्कर याला जाब विचारण्यासाठी आज सायंकाळी धावस्करवाडा येथे आला. याचवेळी धावस्करवाडा येथील युवकांनी कारापूर येथील युवकांच्या गटावर अचानक हल्ला केला. यावेळी प्रचंड धुमश्चक्री झाली.
एका गटाने केलेल्या हल्ल्यात कारापूर येथील सहाजण तर धावस्करवाडा येथील एक मिळून सात युवक जखमी झाले. धावस्करवाडा येथील राम धावस्कर यांना दगड लागल्याने ते जखमी झाले. अन्य पाचजण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यानंतर दुचाकी तेथेच सोडून कारापूर येथील युवकांनी पळ काढला. त्यानंतर प्रतिस्पर्धी गटाने कारापूर येथील युवकांच्या दुचाकींची मोडतोड केली. या हल्ल्यात शिवम सातार्डेकर, अजित नार्वेकर, निखिल मुंजी, विष्णू मुंजी हे युवक जखमी झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा अथवा कोणालाही अटक केली नव्हती.
प्रकल्पविरोधी कार्यकर्ते लक्ष्य : शेर्लेकर
देवस्थानचा वाद असला तरी प्रकल्पविरोधी सक्रिय कार्यकर्ते गौरीश घाडी यांना लक्ष्य करून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर आणि कारापूरवासीयांनी केला आहे. स्वप्नेश शेर्लेकर आणि ॲड. अजय प्रभुगावकर यांच्यासह कारापूर येथील युवकांचा एक गट डिचोली पोलिस स्थानकाबाहेर तळ ठोकून होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.