

Volker Turk UN Human Rights Chief Imran Khan Release: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र चिंता व्यक्त केली जात असून, संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी त्यांच्या तात्काळ सुटकेची मागणी केली. एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तुर्क यांनी इम्रान खान यांना योग्य वागणूक देण्याचे आणि देशातील राजकीय तणाव कमी करण्याचे आवाहन केले. सरकार आणि विरोधकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी खान यांची सुटका हा महत्त्वाचा मार्ग ठरु शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दुसरीकडे, इम्रान खान (Imran Khan) यांचे पुत्र कासिम खान यांनीही सोशल मीडियाद्वारे आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची याचना केली असून, लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील राजवटीवर छळ आणि दडपशाहीचे गंभीर आरोप करत वडिलांच्या जीवाचे रक्षण करण्याची मागणी केली.
दरम्यान, मानवाधिकार संघटना अॅम्नेस्टी इंटरनॅशनलनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. 74 वर्षीय इम्रान खान यांना डिसेंबर 2025 पासून केवळ दोन भेटींचा अपवाद वगळता कुटुंबीयांपासून दूर ठेवण्यात आले असून, मार्च 2026 पासून त्यांना मुलांशी फोनवर बोलण्यासही मज्जाव करण्यात आला. या एकांतवासामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, उच्च रक्तदाबाच्या गंभीर तक्रारी असूनही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत त्यांना स्वतंत्र डॉक्टरांचे उपचार नाकारले जात असल्याचे संघटनेने म्हटले. याशिवाय, इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांनाही डोळ्यांच्या गंभीर आजारावर योग्य उपचार मिळत नसल्याने त्यांची दृष्टी जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी 16 नोव्हेंबर रोजी अडियाला तुरुंगातून देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांना खुले पत्र लिहून तातडीच्या वैद्यकीय उपचारांची विनंती केली. 20 डिसेंबर 2025 रोजी तोशाखाना प्रकरणाचा निकाल लागल्यापासून आपल्याला दररोज बावीस तास एकांतवासात डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी या पत्रातून केला. या गंभीर परिस्थितीमुळे पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेवर आणि प्रशासनावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढताना दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.