मोरजी: 'तुका मायकल लोबो जाय', असे म्हणत पाच अज्ञात व्यक्तींनी तोंडाला मास्क लावून मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर खुनी हल्ला करण्याची घटना बुधवार, ४ रोजी सकाळी आस्कावाडा-मांद्रे मठाजवळ घडली. कोनाडकर हे आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेले होते आणि ते घरी परतत असताना काही अंतरावरच त्यांच्यावर हा हल्ला झाला. हल्लेखोर लगेच तेथून पसार झाले. हल्ल्यामागे आमदार आरोलकर यांचा हात असल्याचा आरोप माजी आमदार दयानंद सोपटे यांनी केला असून, मांद्रेतील वातावरण तापले आहे.
मांद्रे येथील घटनेचे वृत्त पसरताच सर्वत्र खळबळ माजली. जखमी कोनाडकर यांना तातडीने सुरुवातीला तुये हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत म्हापसा जिल्हा हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले.
दरम्यान, तुये येथे हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत असलेले महेश कोनाडकर यांची तातडीने भेट घेत कळंगुटचे आमदार मायकल लोबो, मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे, मांद्रेचे सरपंच मिंगेल फर्नांडिस, माजी सरपंच अॅड. अमित सावंत, माजी सरपंच प्रशांत ऊर्फ बाळा नाईक, माजी सरपंच प्रदीप हडफडकर, बाबूसो हडफडकर, उपसरपंच तारा हडफडकर, धारगळचे माजी सरपंच भूषण ऊर्फ प्रदीप नाईक, पंच किरण सावंत, सुदेश सावंत, जि.पं. सदस्य सतीश शेटगावकर, देवेंद्र प्रभुदेसाई आदी नागरिकांनी विचारपूस केली.
यावेळी मांद्रे पंचायत मंडळाने २४ तासांच्या आत कारवाई करावी नाही तर थेट मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर धडक देऊ असे सांगितले.
मांद्रेमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती बोकाळली आहे. खुलेआम धमकावण्याचे प्रकार होत आहेत. जी व्यक्ती चारवेळा पंच, दोनदा सरपंच होते, अशा कोनाडकरांवर भर दिवसा जीवघेणा हल्ला होतो, हे धक्कादायक आहे. या प्रकारामागे स्थानिक आमदाराचा हात आहे.- दयानंद सोपटे, मांद्रेचे माजी आमदार
मांद्रे येथे घडलेली घटना अत्यंत खेदजनक आहे. यामागे कोण आहेत, याचा शोध तातडीने पोलिसांनी घ्यावा व संबंधितांवर कडक कारवाई करावी. हे प्रकरण क्राईम ब्रांचकडे देण्यात यावे. राजकीय हेतूने असे प्रकार होणे चिंताजनक आहे. मी या हल्ल्याचा निषेध करतो.मायकल लोबो, आमदार, कळंगुट
महेश कोनाडकर यांच्या हल्ल्याचा मी निषेध करतो. कोनाडकर आमच्या गटात आहेत. मायकल व माझ्यात हल्ली जी राजकीय वक्तव्ये झाली, त्याचा कुणीतरी गैरफायदा घेत आहे. हल्लेखोरांना शोधून प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय मी गप्प राहणार नाही.जीत आरोलकर, मांद्रेचे आमदार
'त्या' वक्तव्याच्या रागातून हल्ला?
1) मांद्रे येथील प्रसिद्ध सप्ताहाला कळंगुटचे आमदार मायकल आले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत एका टी स्टॉलवर चहा घेण्यासाठी माजी सरपंच महेश कोनाडकर, माजी सरपंच प्रशांत ऊर्फ बाळा नाईक हे बसले होते.
2) त्याचवेळी काही पत्रकारांनी तुम्ही मांद्रे मतदारसंघातून २ विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहात का? असा सवाल केला असता, त्यांनी त्यावेळी योग्य उत्तर दिले होते.
3) आणि त्याच अनुषंगाने अधूनमधून मायकल लोबो हे मांद्रे मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहणार, अशी चर्चा रंगत होती. त्याचाच कुणीतरी राग माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर हल्ला करत काढला, असेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
पोलिस ठाण्यावर मोर्चा
हल्लेखोरांना पोलिसांनी तत्काळ शोधावे, त्यासाठी आम्ही शांततापूर्वक मांद्रे पोलिस ठाण्यावर मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती देवेंद्र प्रभुदेसाई यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.