मडगाव: गोवा मनोरंजन सोसायटीचे प्रशासन अक्षरशः कोलमडले आहे. याचा प्रत्यय कोकणी चित्रपट ‘जुझे’ला माहिती व प्रसिद्धी खात्याच्या चित्रपट वित्त योजनेत ‘क वर्ग’ देण्यात आला, यातून येतो. जुझे चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून जगभरातील अनेक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
गोवा मनोरंजन संस्थेने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केलेली यादी गोमंतकीय प्रतिभेचा जाणीवपूर्वक छळ व गळचेपी करणारी आहे, आणि अशी गळचेपी नेहमीच होत आली आहे, असा गंभीर आरोप गोवा मनोरंजन संस्थेचे माजी सदस्य विशाल पै काकोडे यांनी केला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तत्काळ हस्तक्षेप करून हा अन्याय दूर करावा, एकंदर श्रेणी प्रक्रियेत पारदर्शकता आणावी आणि प्रतिभावान गोमंतकीय कलाकारांना न्याय देऊन योग्य ते पाठबळ द्यावे, अशी मागणी विशाल पै काकोडे यांनी केली. जुझे चित्रपट दक्षिण गोव्याचे प्रतिभावान दिग्दर्शक मिरांशा नाईक यांनी दिग्दर्शित केला असल्याचे काकोडे यांनी सांगितले.
कोकणी चित्रपट जुझे हा जगातील अव्वल समजल्या जाणाऱ्या कार्लोवी व्हेरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा अधिकृत निवड विभागात होता. या चित्रपटाने मिन्स्क आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष ज्युरी पुरस्कार, इनोव्हेटिव्ह आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक, तसेच सिंगापूर साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार जिंकले.
या चित्रपटाचे २५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत यशस्वी प्रदर्शन झाले. विशेष म्हणजे जुझे चित्रपटाने दहाव्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात तब्बल १४ पुरस्कार पटकावले आहेत.
या चित्रपटाला चित्रपट वित्त योजनेत ‘क वर्ग’मध्ये घालण्यात आले आहे. प्रसिद्ध झालेल्या यादीत अनेक विसंगती व त्रुटी असून, ही वर्गवारी केवळ चित्रपट निर्मात्याचा अपमान नाही तर गोमंतकीय सर्जनशीलतेचे जाणीवपूर्वक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय यश साजरे करण्याऐवजी ईएसजी आणि माहिती-प्रसिद्धी खात्याने ते कमी लेखण्याचा मार्ग स्वीकारला आहे, असे काकोडे म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.