

पणजी : फोंडा विधानसभा मतदारसंघासाठी येत्या ९ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार असून, या निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली.
फोंडा मतदारसंघ स्वत:च्याच हाती ठेवण्यासाठी भाजपने, तर २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी फोंडा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून भाजपला झटका देण्याचे प्रयत्न विरोधी काँग्रेसने सुरू केले असून, जिंकू शकणाऱ्या उमेदवारांनाच उमेदवारी देण्यासंदर्भात त्यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
माजी मंत्री तथा फोंड्याचे माजी आमदार रवी नाईक यांचे १५ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. त्यामुळे फोंड्याची ही जागा रिक्त झाली आहे.
या जागेसाठी येत्या ९ एप्रिल रोजी निवडणूक घेण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने निश्चित केले आहे. या पोटनिवडणुकीसाठी २३ मार्चपर्यंत अर्ज सादर करता येतील. २४ मार्च रोजी अर्जांची छाननी होईल, तर २६ मार्च रोजी अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
रवी नाईक यांच्या निधनानंतर भाजपसोबत सत्तेत असलेल्या मगोपने ‘फोंड्यातील पोटनिवडणुकीत भाजपने रवी नाईक यांचे ज्येष्ठ सुपुत्र रितेश यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणावे’, अशी भूमिका मांडली होती. तर, ‘रितेश यांना तत्काळ मंत्रिमंडळात घेऊन पोटनिवडणुकीची उमेदवारी द्यावी’, अशी मागणी अखिल गोमंतक भंडारी समाजाने केली होती.
परंतु, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी याबाबत पूर्णत: मौन बाळगले होते. अखेर दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीनंतर भाजपने रितेश नाईक आणि फोंड्याचे माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी या दोघांची नावे भाजपच्या केंद्रीय समितीकडे सादर केली आहेत.
काँग्रेसने सुरुवातीला फोंडा पोटनिवडणुकीची उमेदवारी पुन्हा एकदा राजेश वेरेकर यांना देण्याचे जवळपास निश्चित केले होते.
परंतु, मगोपला सोडचिठ्ठी देऊन काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. केतन भाटीकर यांच्यामुळे काँग्रेस उमेदवारीचा गुंता वाढला आहे. याबाबत सोमवारी प्रदेश काँग्रेस समितीची बैठक घेणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी रविवारी ‘गोमन्तक’ला दिली.
काँग्रेससोबत युतीत असलेले गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांच्याशी फोंडा पोटनिवडणुकीबाबत सोमवारी चर्चा करणार आहे. त्यांना विश्वासात घेऊनच उमेदवाराची निवड केली जाईल. आम आदमी पक्ष (आप) किंवा रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजीपी) या पक्षांनी अद्याप यासंदर्भात माझ्याशी चर्चा केलेली नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.