Vijay Sardesai statement on BJP: गोवा फॉरवर्ड पार्टीचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी भारतीय जनता पक्षावर नैतिक अध:पतनाचा आरोप करत जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपच्या काही आमदारांसोबत वावरणारी माणसे ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली असल्याचा खळबळजनक दावा सरदेसाई यांनी केला आहे. एकेकाळी सुशिक्षित आणि प्रतिष्ठित लोकांचा असलेला भाजप आता 'गुंडांचा पक्ष' बनला असल्याची टीका त्यांनी केली.
सरदेसाई म्हणाले की, "एकेकाळी भाजपमध्ये महिला, डॉक्टर आणि वकिलांचे वर्चस्व होते, मात्र आता हा पक्ष गुंड आणि फसवणूक करणाऱ्यांच्या हातात गेला आहे. हे भाजपच्या नैतिक घसरणीचे प्रतीक आहे." राज्यात भाजपच्या छुप्या पाठिंब्यामुळे 'गुंडगिरी' वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आमदारांच्या सोबत वावरणाऱ्या गुन्हेगारांमुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सरदेसाई यांनी दावा केला की, हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लबमधील भीषण आगीच्या घटनेचा मोठा फटका भाजपला बसला आहे. विशेषतः हडफडे-हणजूण परिसरात भाजपच्या मतांची टक्केवारी कमालीची घटली आहे. "लोकांमध्ये या दुर्घटनेमुळे मोठा संताप आहे, जो मतदानातून दिसून येईल. विरोधी उमेदवारांना मिळणारे मताधिक्य हे सरकारविरुद्धच्या जनक्षोभाचे लक्षण आहे," असे ते म्हणाले.
राज्यातील खालावलेली कायदा आणि सुव्यवस्था ही चिंतेची बाब असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. भाजप आपली ताकद वाढवण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जवळ करत असल्याची टीका त्यांनी केली. आगामी निकालांमध्ये जनतेचा हा रोष स्पष्टपणे दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.