Canacona Bus Accident: खासगी प्रवासी बसने दुचाकीला समोरून धडक दिल्याने चापोली येथील दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
गुळे-काणकोण मडगाव-कारवार हमरस्त्यावर हा अपघात घडला. पायक काटू वाघोणकर (45) व प्रियांका वाघोणकर (35) असे या मृत पती-पत्नीचे नाव आहे.
आज सकाळी चापोली येथील वाघोणकर दाम्पत्य दुचाकीवरून (जीए ०९ जे १२२५) चावडीच्या दिशेने येत होते. गुळेजवळ मडगावच्या दिशेने जाणाऱ्या आंतरराज्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसने समोरून येणाऱ्या त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
हा अपघात एवढा भीषण होता, की दुचाकीवर मागे बसलेल्या प्रियांका रस्त्यावर आदळल्या आणि बसचे चाक त्यांच्यावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. तर गंभीर जखमी पती पायक वाघोणकर यांना तत्काळ काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दाम्पत्याला अपत्य नाही. पोलिसांनी बसचालक एन. नागराज (रा. कर्नाटक) याला ताब्यात घेतले आहे.
रस्त्याची दुरवस्था : करमलघाट जवळचा हा महामार्ग मृत्यूचे द्वार ठरत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांनी आवाज उठविला असून आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी गांभीर्याने लक्ष घालून निधी मंजूर करून घेतला.
मात्र, कागदी सोपस्कार पूर्ण होणे आवश्यक असल्याने वेळ वाया जात आहे. या ठिकाणी गत आठवड्यात ट्रक कोसळल्याने तीन तास वाहतूक बंद होती. देवळाजवळ रम्बलर्स घालून तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दगड आणि मातीचा भराव घालावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
कार्यक्रम बेतला जीवावर
सोमवारी गुळे येथे स्नेहसंमेलन असल्याने प्रियांका आपल्या नातेवाईकांकडे थांबल्या होत्या. मंगळवारी पहाटे पायक हे चापोली येथून गुळे येथे गेले होते. दुचाकीवरून परत येत असताना मंगळवारी सकाळी काळाने त्यांच्यावर घाला घातला.
या अपघातात बस रस्ता सोडून शेतात कलंडली. त्यामुळे बसमधील दोन प्रवाशी जखमी झाले. त्यांच्यावर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.