Goa Mining Auction: देशात पोलाद उद्योगात अग्रेसर असणाऱ्या जिंदाल साऊथ वेस्ट (जेएसडब्ल्यू) कंपनी आता गोव्याच्या खनिज उद्योगात उतरली आहे.
राज्य सरकारच्या खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याच्या वतीने सुरू असलेल्या इ-लिलावात सर्वाधिक बोली लावत जिंदाल कंपनीने कुडणे खनिज ब्लॉक्सचा लिलाव जिंकला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच जिंदाल कंपनी गोव्याच्या खनिज उद्योगात दिसणार आहे.
खाण खात्याच्या पहिल्या यशस्वी इ-लिलावानंतर दुसऱ्या पाच खनिज ब्लॉक्सचा २१ एप्रिलपासून इ-लिलाव सुरू झाला आहे. यासाठी ११ कंपन्यांनी आपल्या २४ निविदा सादर केल्या आहेत. यातील पहिल्या अडवलपाल ब्लॉक्सचा लिलाव फोमेंतो कंपनीने जिंकला होता.
आज झालेल्या लिलावात अनेक खनिज कंपन्यांची चढाओढ होती. मात्र, जिंदाल कंपनीने सर्वाधिक ९६.६५ टक्क्यांची बोली लावत हा लिलाव जिंकला आहे. ही किंमत भारतीय खाण ब्युरोने निश्चित केली होती.
दरम्यान, पुढील महिन्यात होणाऱ्या खनिज लिलावाच्या तिसऱ्या फेरीत सरकारने दक्षिण गोव्यातील सात खाणींचे ब्लॉक्स निश्चित केले आहेत. त्यात कुडचडे, सावर्डे, सांगे आणि केपे या भागांतील खाण व्यावसायिकांना त्याचा फायदा होणार आहे.
खाणी सुरू कधी होणार?
खाण खात्याच्या वतीने पहिल्या ४ खनिज ब्लॉक्सचे १३ सप्टेंबर २०२२ रोजी लिलाव जाहीर करण्यात आला.
लिलाव प्रक्रिया पूर्ण करून १३ जानेवारी २०२३ ला यशस्वी लिलावधारकांना संबंधित पत्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते देण्यात आले. पण अद्यापि खाणी सुरू झालेल्या नाहीत. त्या कधी सुरू होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
उद्या अखेरचा दिवस
खनिज आणि भूगर्भशास्त्र खात्याच्या वतीने पहिल्या चार खनिज ब्लॉकची यशस्वी विक्री केल्यानंतर आता आणखी ५ ब्लॉक्सचा इ-लिलाव सुरू आहे.
अडवलपाल-थिवी, कुडणे-करमळे या ब्लॉक्सचा लिलाव झाला आहे. आता कुडणे, पिर्ण-थिवी, सुर्ल-सोनशी या तीन खनिज ब्लॉक्सचा २७ एप्रिलपर्यंत लिलाव होणार आहे.
राज्य सरकारने सुरवातीला सुमारे ४० खाण लिजांचा लिलाव करण्याची तयारी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ८८ खाण लीजचे दुसरे नूतनीकरण रद्द केल्याने सरकारकडून टप्प्याने याचा लिलाव करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे यापूर्वीच इ-लिलावामध्ये घेतलेले डम्प अद्यापही त्याच ठिकाणी पडून आहेत. ते त्वरित हलवावेत, यासाठी राज्य सरकारकडून मुदतवाढही देण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण
खाण खात्याने पहिल्या टप्प्यात डिचोली, शिरगाव-मये, मोंत द शिरगाव या उत्तर गोव्यातील तीन आणि दक्षिण गोव्यातील काले या चार ब्लॉक्सचा यशस्वी इ-लिलाव पूर्ण केला आहे.
डिचोली ब्लॉक सेसा वेदांता कंपनी, शिरगाव मये ब्लॉक साळगावकर शिपिंग प्रा. लि. कंपनी, मोंत द शिरगाव ब्लॉक बांदेकर माईन कंपनी तर काले ब्लॉक फोमेंतो कंपनीने मिळवला.
कॅपिंग मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न : सर्वोच्च न्यायालयाने 2014 मध्ये राज्यातील खनिज उत्खननाची वार्षिक मर्यादा 20 दशलक्ष टन निर्धारित केली होती.
दरम्यान, ही कॅपिंग मर्यादा 30 दशलक्ष टनांपर्यंत वाढविण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. यासाठी खनिज मंत्रालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडे प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती खाण खात्याच्या वतीने देण्यात आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.