भारतीय जनता पक्षाने बिहारमधील निवडणुकीमध्ये नेत्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. जे विद्यमान आमदार, खासदार आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळणार नाही. भाजपने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे, त्याचे स्वागत सर्वत्र केले जात आहे. आता गोव्यातही जिल्हा पंचायत, नगरपालिका व विधानसभा निवडणुका होणार आहेत. बिहारमधील हा फॉर्मुला गोव्यातही लागू केला जाणार आहे का? असे लोक आता विचारू लागले आहेत. गोव्यात भारतीय जनता पक्षाचे पती-पत्नी आमदार असलेल्या तीन जोड्या आहेत. काहीचे पुत्र, पत्नी नगराध्यक्ष, सरपंच सुद्धा आहेत. आता काही विद्यमान आमदार आपल्या पुत्रांना, कन्यांना आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळावी म्हणून खटाटोप करीत आहेत. बिहारमधील फॉर्मुला गोव्यात लागू करणार असाल? तर त्याचा निर्णय पक्षाने आताच घ्यावा, जाहीर करावे, अशी मागणी भाजपाचेच कार्यकर्ते करू लागले आहेत. ∙∙∙
खड्डेमय रस्त्यांची समस्या सोडवा यासाठी लाखभर सह्यांचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या आपच्या नेत्यांना भेट देऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडवले आहे. कॉंग्रेसने याआधी मोर्चात सहभाग घेतला होता. त्यांनी पोलिस मुख्यालय, भाजप कार्यालय व मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री भेटले नाहीत. आपच्या नेत्यांना त्यांनी भेट दिली. मोजके १४ जण घेऊन आपचे नेते अमित पालेकर गेले होते. त्यांना भेट देऊन विरोधकांनाही मुख्यमंत्री भेटतात. त्यांनी निवेदनातून मांडलेली मागणी मान्य करतात असा सकारात्मक संदेश मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन स्वतः स्वीकारून दिला. ∙∙∙
‘तुझ्यासारखो गुंडाक काबार करपी आयज जाय सर’. आपचे बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांचे रवी नाईकांना उद्देशून म्हटलेले हे उद्गार. खरंतर विषय होता रस्त्यावरील खड्ड्यांचा. सध्या आपने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याविरुद्ध सह्यांची मोहीम उघडली आहे. आणि याच संदर्भात आपचे आमदार व्हेंझी यांनी फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांची भेट घेतली. फोंड्यातील खड्ड्या संबंधी बोलत असताना व्हेंझीची गाडी रवींच्या जुन्या कारकिर्दीकडे वळली. तुम्ही असताना मोठ्या मोठ्या गुंडांना आत टाकले होते, असे म्हणत आज तुमच्यासारखा हवा असे प्रशस्तिपत्र देऊन सर्वांना चकितच करून सोडले. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला असून फोंड्यातील प्रत्येकाच्या ओठावर व्हेंझी चे ते प्रशस्तिपत्र खेळताना दिसत आहे. आता खरेच हे प्रशस्तिपत्रक ''आहे का वेगळाच डाव आहे हे मात्र कळत नाही. शेवटी राजकारण्यांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात हेच खरे. नाही का? ∙∙∙
काणकोणात परतीच्या पावसाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामाचे पितळ उघडे पाडले आहे. तेथे कामापेक्षा कॉन्ट्रॅक्ट मजबूत असल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे.काणकोणात पावसानंतर रस्त्यालगतची संरक्षक भिंत कोसळल्याने केवळ मातीच नाही, तर कामाच्या “गुणवत्तेचा” देखील मुखवटा उघड पडला आहे. रस्त्यालगत बसवण्यात आलेल्या रेलिंग्ससह या बांधकामाची गुणवत्ता किती “मजबूत” होती, हे आता सर्वांनाच दिसून आले आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम खात्याला आरसे दाखवले आहेत. “पावसाने दाखवलेले काम जर असे असेल, तर उन्हाळ्यात काय होईल?” असा सवाल नागरिक करत आहेत. जवळच शाळा असल्याने मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे, तरीही संबंधित अधिकारी ‘तपास सुरू आहे’ या पारंपरिक घोषणेत रमलेले दिसतात. काम पूर्ण झाले तेव्हा रिबन कापणारे सर्वजण दिसले, पण आता भिंत कोसळल्यावर जबाबदारी उचलणारे कोठे आहेत, असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. एकंदरीत, पावसाने पुन्हा एकदा दाखवून दिले रिटेनिंग वॉलपेक्षा ठेकेदारांचे ‘कॉन्ट्रॅक्ट’च अधिक टिकाऊ असतात! ∙∙∙
माजोर्डा येथील धिरयोला आता पंधरवडा उलटला, पण ते प्रकरण तडीस नेणे संबंधित यंत्रणेला जमलेले नाही. गोव्यात या दिवसात विविध घटनांमुळे पोलिस यंत्रणा लक्ष्य होत असून त्याकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. धिरयोमधील मास्टमांईंड असलेला रुई पोलिसांना सापडत नाही, की पोलिसांनीच त्याला पलायनासाठी मदत केली, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे. सदर धिरयोसाठी मोठा जमाव असतानाही त्याची कसलीच खबर कोलवा पोलिसांना कशी मिळाली नाही, असा मुद्दाही आता पुढे येऊ लागला आहे. अशा प्रकारांत हयगय केल्याप्रकरणी ठपका ठेवून संबंधित अधिकाऱ्याला घरी पाठवल्याशिवाय अशा प्रकारांना पायबंद बसणार नाही, असाही सूर उमटू लागला आहे, तर काही जण या धिरयोत एक मानवी बळी जाऊनही या भागांतील नेते त्याविरुध्द तोंड बंद करून असल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत. ∙∙∙
आपचे अमित पालेकर यांनी खाण प्रकरणात अधिक खनन करणे सुरू केले आहे. कोणाच्या कंपनीला कोठे काम मिळाले होते याची पोलखोल करणारी माहिती माध्यमांपर्यंत पोचवण्यासाठी त्यानी पुढाकार घेतला आहे. भाजप विरोधात सारे एकवटणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना विरोधकांच्या तंबूतच वैयक्तिक हेवेदावे काढणे, हिशेब चुकते करण्याचे राजकारण सुरू झाले आहे. विधानसभेला दीड वर्ष असताना राजकारण का तापवले जात आहे अशी चर्चा आहे. ∙∙∙
समाज माध्यमांवर प्रभावशाली म्हणून कार्यरत असलेल्या गौरव बक्षी यांनीही प्रुडंट, गोवन आणि गोवा न्यूज हब यांनी कोणाला तरी वाचवण्यासाठी रामा काणकोणकर मारहाण प्रकरणातील चुकीच्या बातम्या दिल्याचा काणकोणकर यांची पत्नी रती यांच्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. काणकोणकर यांना भेटून आल्यानंतर जारी केलेल्या व्हिडिओत त्यांनी हे आरोप केले आहेत. याआधी काणकोणकर यांच्या पत्नी रती यांनीही असेच आरोप केले होते. या मारहाणीमागे राजकीय कारण असल्याचे बक्षी यांचे म्हणणे आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.