Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरणात संशयित गौरव बिद्रे याने वापरलेल्या वाहनाच्या मालकाचा जबाब का घेतला नाही, याची विचारणा वारंवार गौरीच्या वडील अनिल आचारी यांनी पोलिसांकडे केली. अखेर त्या अलिशान वाहनासाठी ज्या बँकेकडून कर्ज घेतले होते, त्या बँकेच्या कर्जाच्या हप्त्यांचे गौरव व बीना (कृष्णन) बिद्रे दाम्पत्याने दिलेले १४ धनादेश वटले नसल्याची व महाराष्ट्रातील आणखी चार बँकांचे डिफॉल्टर असल्याची बाब त्यांच्या सीबील रिपोर्टवरून निदर्शनास आली आहे.
गौरी आचारी खून प्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल झाले, त्यामागे तिचे वडील अनिल आचारी यांनी घेतलेल्या कष्टाला यश आले, असे म्हणावे लागेल. आपल्या कर्त्या मुलीच्या खुनाचा धसका अनिल आचारी यांना बसला, पण ज्याने के कृत्य केले त्याला जास्तीतजास्त शिक्षा झाली पाहिजे, यासाठी पोलिसांना हवे ते पुरावे गोळा करून देण्यासाठी ते झटत राहिले. ज्या-ज्या ठिकाणी गौरव बिद्रे मुंबईत राहिला त्या-त्या ठिकाणी ते जाऊन आले, त्यातून बरीच माहिती त्यांच्या हाती आली, ती त्यांना पुरवणी आरोपपत्रासाठी उपयोगी पडली.
म्हापसा आरटीओ कार्यालयात नोंदणी असलेले हे वाहन घेऊन गौरव बिद्रे मुलींना आपल्या जाळ्यात ओढत असे, अशीही आता चर्चा आहे. खूनप्रकरणात वापरल्या गेलेल्या वाहनाच्या मालकाचा जबाब पोलिसांनी तत्काळ घेणे गरजेचे होते, असे आचारी यांना वाटत होते.
दरम्यान, संशयित वापरत असलेल्या वाहनाची सर्व माहिती घेतल्यानंतर ते कर्जातून वाहन घेतल्याचे आचारी यांच्या निदर्शनास आले. ज्या बँकेकडून हे वाहन घेतले, त्याची सर्व माहिती आचारी यांनी मुख्य कार्यालयात व्यवस्थापकास ई-मेलद्वारे मागविली.
ते दोघे मुंबईत ‘बंटी-बबली’च होते
अनिल आचारी यांच्या मते मुंबईमध्ये हे दोघे बंटी-बबली म्हणून वावरत असल्याचे दिसून आले. गौरव बिद्रे आणि त्याची पत्नी बीना या दोघांनी आठ ठिकाणी राहण्याचा पत्ता बदलला आहे. डिफॉल्टर असलेल्या या दोघांनी गोव्यात आल्यानंतर अग्रगण्य बँकेकडून १५ लाखांचे अलिशान वाहन घेतले, ही बाब आश्चर्यकारक नक्कीच आहे. अलिशान गाडी घेऊन इतरांवर छाप पाडून बस्तान बसवण्याचा गौरवचा प्रयत्न सुरू झाला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.