राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या फोंडा शहरातील बसस्थानकाला खरे म्हणजे संजीवनीची गरज आहे. गेल्या 30 वर्षांपासून हे बसस्थानक आहे त्याच स्थितीत आहे. दोन महिन्यांपूर्वी या बसस्थानकाची दुरुस्ती व रंगरंगोटी तेवढी करण्यात आली. तसे पाहिले तर राज्यातील सर्वच बसस्थानकांची रया गेली असून, प्रवाशांना अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या बसस्थानकांची उभारणी ही काळाची गरज बनली आहे.
फोंडा बसस्थानक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हायला हवे. राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या बसस्थानकावरून कर्नाटक व महाराष्ट्रातील बसगाड्या प्रवास करतात. त्यामुळे केवळ गोमंतकीयच नव्हेत तर इतर राज्यांतील प्रवासीही या बसस्थानकावर थांबतात. मात्र त्यांना बसस्थानकाचा कटू अनुभव घेऊनच जावे लागते.
फोंडा शहरातील जुन्या बसस्थानकावर बसगाड्यांची गर्दी होत असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान कृषीमंत्री रवी नाईक यांनी फोंडा जुन्या बसस्थानकापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मैदानाचे रुपांतर कदंब बसस्थानकात केले. या बसस्थानकाची पायाभरणी १८ सप्टेंबर १९९१ रोजी करण्यात आली आणि एका वर्षानंतर १८ सप्टेंबर १९९२ रोजी उद्घाटन करण्यात आले.
दोन महिन्यांपूर्वीच तात्पुरती दुरुस्ती व रंगरंगोटी
फोंड्यात कदंब बसस्थानक उभारले खरे, पण मुख्य शहरापासून ते दूर असल्याने उद्घाटन झाले तरी कार्यरत झाले नाही. त्यामुळे या बसस्थानकाचा उद्देशच कुठे तरी भरकटला. त्यानंतर परत एकदा सहा महिन्यांनी बसस्थानक सुरू करण्यात आले. त्यानंतरही केवळ आठच दिवस कार्यरत राहिल्यानंतर पुन्हा एकदा बसगाड्या जुन्या बसस्थानकावर येऊ लागल्याने नवीन बसस्थानक विनावापर पडून राहिले. पण नंतरच्या काळात मडकई मतदारसंघाचे आमदार तथा विद्यमान वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी बसस्थानक खुले केले ते आजतागायत कार्यरत आहे.
निधीची कमतरता : सध्या या बसस्थानकाची केवळ दुरुस्ती करण्यात आली आहे. पुढील काळात या बसस्थानकावर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या जातील, असे सुदिन ढवळीकर यांनी म्हटले आहे. पण सरकारकडे पुरेसा निधी आहे का, हा खरा प्रश्न आहे. कारण या बसस्थानकाच्या दुरुस्तीकामासाठीचा ८० लाख रुपयांचा खर्च सरकारला पेलवला नाही. त्यामुळेच दुरुस्तीसाठी बंद केलेल्या या बसस्थानकाचे काम रखडले गेले आणि त्यानंतर आंदोलनाची भाषा सुरू केल्यावर दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.
आवश्यक सुविधा कधी पुरविणार?
फोंड्यातील या कदंब बसस्थानकावर प्रवाशांना मुलभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे. या बसस्थानकावर पाणपोयी नाही. एकच स्वच्छतागृह आहे, पण पैसे देऊनही योग्य सोय होत नसल्याची ओरड प्रवाशांकडून केली जातेय. बसायला आणखी बाकडे व फरशा बदलण्याची गरज आहे. बऱ्याचदा बसस्थानक परिसरात रात्रीच्यावेळी अंधार असतो. एक ना दोन, कितीतरी दुखणी हे बसस्थानक अंगावर घेऊन मिरवते आहे. ही दुखणी जेव्हा दूर होतील, तोच खरा प्रवाशांसाठी सुदिन ठरेल.
अजूनही सर्वत्र गुरांचे शेण व दुर्गंधी
फोंड्याच्या या नवीन कदंब बसस्थानकावर अजूनही बऱ्याचदा गुरांचे शेणमूत दिसते. बसायला केवळ पाच बाकडे आणि प्रवासी ढीगभर असा प्रकार आहे. स्वच्छतेसाठी केवळ एकच बाई कार्यरत असते. ती रविवारी नसली की सोमवारी सकाळी बसस्थानकावर शेणाचा खच पडलेला असतो. त्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरते.
चारही आमदारांनी घ्यावी जबाबदारी
तसे पाहिले तर हे बसस्थानक बांदोडा पंचायत क्षेत्रात अर्थातच मडकई मतदारसंघात येते. पण बसस्थानक कुठल्या मतदारसंघात येते ही बाब बाजूला ठेवली तर सर्वसाधारणपणे फोंड्यासह मडकई, प्रियोळ आणि शिरोडा या चारही मतदारसंघांसाठी ते कार्यरत राहिले आहे. त्यामुळे या बसस्थानकाला अद्ययावत सुविधा उपलब्ध करणे ही केवळ मडकईच्या आमदाराची नव्हे तर फोंडा, प्रियोळ आणि शिरोडा या तिन्ही मतदारसंघांच्या आमदारांची जबाबदारी आहे. या चारही आमदारांनी मनावर घेतले तर राज्यातील सर्वांगसुंदर आणि सुविहित असे बसस्थानक उभे राहू शकते, जे इतरांसाठी आदर्श ठरू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.