आपल्या शहरात किंवा गावात सुंदर जागा तयार झाल्या की आपोआपच आपल्याला आपल्या शहराचा किंवा गावाचा अभिमान वाटायला लागतो. अशा सुंदर जागा फक्त बाग-बगीचे किंवा मैदाने यामुळेच निर्माण होत नाहीत तर सुंदर रंगवलेली घरे किंवा नुसती सुंदर कुंपणे यातूनही त्या तयार होऊ शकतात. कंपाउंड वॉलच्या सुंदर रंगवलेल्या भिंतीदेखील लोकांची नजर आकर्षून घेतात. लोकांना आनंदीत आणि रोमांचित होण्यासाठी तेवढेही कारण पुरेसे असते.
डिचोली नगरपालिकेने आपल्या नागरिकांना असे एक सुंदर कारण पुरविले आहे. नगरपालिकेच्या इमारतीच्या भिंतींवर चित्रे रंगवण्यासाठी त्यांनी कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना निमंत्रण दिले आणि या विद्यार्थ्यांनी शहरातील दोन ठिकाणांचा नूर बदलून टाकायला सुरुवात केली.
नगरपालिकेच्या इमारतीची कंपाउंड वॉल आणि डिचोली बाजारातील नगरपालिकेच्या आख्यातरीत येत असलेल्या एक उंच भिंतीवर त्यांनी ही रंगबिरंगी जादू केली आहे.
डिचोली नगरपालिकेने, कला आणि संस्कृती संचालनालयाला या जागेच्या सौंदर्यकरणाचा प्रस्ताव दिला होता. कला आणि संस्कृती संचालनालयाने त्यासंदर्भात गोवा कला महाविद्यालयाकडे विचारणा केली.
गोवा कला महाविद्यालयाने तत्परतेने हा प्रस्ताव स्वीकारून, 'विकसित भारत' या विषयावरील संकल्पित म्युरलचे रेखाचित्र तयार केले. या रेखाचित्राला डिचोली नगरपालिकेकडून मान्यता मिळाल्यानंतर कला महाविद्यालयाने गोपाळ कुडास्कर या अध्यापकाच्या नेतृत्वाखाली आपल्या विद्यार्थ्यांना त्या जागी पाठवले.
म्युरल हा विषय घेऊन कला महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला सुमारे 21 विद्यार्थ्यांचा हा चमू गेले तीन दिवस या भिंतीवर चित्रे रंगवण्यासाठी झटतो आहे. गोपाळ कुडासकर यांच्या मते, ‘या भिंतींचे स्वरूप संपूर्ण पालटण्यासाठी त्यांना आणखीन किमान दोन दिवस लागतील.’
या दोन म्युरलपैकी एक म्युरल सुमारे 15X3 फुट तर दुसरे म्युरल सुमारे 15X20 फूट अशा भव्य आकाराचे आहे.
गोपाळ कुडासकर सांगतात, 'बाह्यस्थळावर काम करणे हे विद्यार्थ्यांसाठी हे एक प्रकारचे आव्हानच आहे त्याचबरोबर त्यांच्यासाठी ते प्रत्यक्ष शिक्षणही आहे.'
शहराच्या सौंदर्यीकरणासाठी डिचोली नगरपालिकेने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहेच त्याचबरोबर ते इतर शहरांनादेखील प्रेरित करणारे आहे. इतर शहरांकडून अशाच प्रकारचा प्रस्ताव आल्यास कला महाविद्यालय त्यावर विचार करेल काय असा प्रश्न विचारता, हो. 'त्यावर महाविद्यालय नक्कीच विचार करू शकते', असे उत्तर गोपाळ कुडासकर यांनी दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.