

म्हापसा: ‘बर्च बाय रोमियो लेन’ या क्लबमधील भीषण आग दुर्घटनेप्रकरणी हणजूण पोलिसांनी १३ जणांवर म्हापसा न्यायालयात तब्बल ४,१५० पानांचे अवाढव्य दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दुर्घटनेत पर्यटक आणि कर्मचारी मिळून २५ निष्पापांचा मृत्यू झाला होता. तपासादरम्यान पोलिसांनी ३०५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले.
दरम्यान, कोलवाळ कारागृहातून संशयितांना म्हापसा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयात लुथरा बंधूंचे नातेवाईक उपस्थित होते.
सविस्तर वृत्तानुसार, ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११.४५ च्या सुमारास हडफडे येथील या क्लबमध्ये ‘फायर शो’चे आयोजन केले होते. कोणताही परवाना नसताना तसेच सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून हा कार्यक्रम सुरू होता.
यावेळी लागलेल्या भीषण आगीत २५ जणांना जीव गमवावा लागला, तर अनेक पर्यटक आणि कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर यांनी तक्रार दाखल केली होती.
तसेच दुर्घटनेच्या दिवशी क्लबस्थळी डान्स परफॉर्मन्सवेळी वापरलेल्या ‘कोल्ड पायरो’मुळे (विद्युत फटाके) छतावरील बांबू आणि लाकडाने पेट घेतला. हा क्लब पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अशा मिठागरातील जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधला होता.
खोसला अद्याप फरारच
या प्रकरणातील १३ वा आरोपी सुरिंदर कुमार खोसला (वय ७८ वर्षे) हा अद्याप फरार आहे. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट आणि जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ही बजावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया आता सुरू झाली असून, पीडितांच्या कुटुंबीयांना न्यायाची प्रतीक्षा आहे.
या कारणांवर दोषारोपपत्रात ठेवले बोट
क्लबमध्ये ना अग्निशमन उपकरणे होती, ना आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्यासाठी दरवाजे.
हा क्लब कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी किंवा परवाना न घेता चालवला जात होता.
प्रारंभी भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १०५, १२५ आणि २८७ नुसार गुन्हा नोंदवला होता. तपासाअंती त्यात ३३८, २४१ आणि ६१(२) सारखी महत्त्वाची कलमे जोडली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.