डिचोली: एरवी नोव्हेंबर महिन्यात कंदमुळांची रेलचेल असते. अळूची माडी, काटेकणगी, सुरण, काराणे या हंगामी कंदमुळांच्या सुगंधाने बाजार भरून जातो. मात्र यंदा चित्र अगदी उलटे दिसत आहे. असंतुलित हवामान आणि अवकाळी पावसामुळे या पिकांवर मोठा परिणाम झालाय. परिणामी बाजारात कंदमुळांची आवक अत्यल्प असून दरवाढीचा भडका उडाला आहे.
गेल्या काही वर्षांत या डिचोलीच्या बाजारात कंदमुळे डोंगराएवढ्या राशीत दिसत असत. पण यंदा बाजारात या कंदमुळांची अक्षरशः शोधाशोध सुरू आहे. विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अळूची माडी आकारानुसार १०० ते २०० रुपये नग, काटेकणगी १०० ते २०० रुपये वाटा तर काही ठिकाणी ६० रुपये किलो या दराने विक्री होत आहे.
आवक कमी असल्याने दरात झपाट्याने वाढ होत असून, पुढील काही दिवसांत भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे.
विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, यंदा पावसाचे प्रमाण असंतुलित होते. काही ठिकाणी अतिवृष्टी, तर काही भागात पावसाचा लांबलेला खंड; त्यामुळे बरीच कंदमुळे जमिनीतच कुजली. उत्पादन घटल्याने बाजारात माल पोहोचत नाही, असे स्थानिक विक्रेते सांगतात.
दिवाळीत कंदमुळांशिवाय जेवण अपूर्ण!
डिचोलीत अळूची माडी आणि काटेकणगी यांचा वापर दिवाळीच्या पारंपरिक पदार्थांत मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र यंदा कंदमुळांच्या तुटवड्याने गृहिणींची चांगलीच पंचाईत झाली. दिवाळीत अळूची माडी नसली तर फराळाची चवच फिकी वाटते, असे एका ग्राहकिणीने सांगितले. व्यापाऱ्यांचे मत आहे की, हंगामी पिकांची स्थिती पाहता दर आणखी वाढू शकतात.
डिचोली आणि सत्तरी तालुक्यातील काही भागातून जरी काही प्रमाणात कंदमुळे बाजारात येत असली तरी गेल्या काही वर्षांपासून कर्नाटकातील जांबोटी, रामनगर, कणकुंबी आदी भागातील कंदमुळांनी या बाजारपेठेत आपला ठसा उमटवला आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी तर कर्नाटकातील विक्रेते मोठ्या प्रमाणात माल घेऊन येतात आणि कंदमुळांचा खास बाजार भरवतात. स्थानिक विक्रेतेही ही कंदमुळे घाऊक दराने विकत घेऊन किरकोळ विक्री करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.