डिचोली: येथील ‘फूड कोर्ट’मध्ये गेल्या दीड महिन्यांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले असून, हातगाडेधारकांचा व्यवसाय संकटात सापडला आहे. संपूर्ण परिसरातील एकही वीज दिवा सुरू नसल्याने रात्रीच्या वेळी ग्राहकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे.
खवय्यांना विविध खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या उद्देशाने डिचोली पालिकेने सुमारे तीन वर्षांपूर्वी शहरातील मासळी व भाजी मार्केटलगतच्या मोकळ्या जागेत ‘फूड कोर्ट’ सुरू केले होते. येथे वडापाव, भेळ, ऑम्लेटसह विविध खाद्यपदार्थांचे १५ हून अधिक हातगाडे कार्यरत आहेत. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत येथे ग्राहकांची मोठी गर्दी होत असे.
मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून फूड कोर्ट परिसरातील सर्वच वीज दिवे बंद असल्याने रात्री परिसर अंधारमय बनतो. त्यामुळे अनेक ग्राहकांनी या ठिकाणाकडे पाठ फिरवली आहे. परिणामी हातगाडेधारकांचा व्यवसाय मंदावला आहे.व्यावसायिकांना चार्जिंग बल्बच्या प्रकाशात खाद्यपदार्थ तयार करावे लागत आहेत. मात्र, ग्राहकांची संख्या घटल्याने तयार केलेले पदार्थही वाया जात असून नुकसान सहन करावे लागत आहे. अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
व्यावसायिकांची कैफियत
ग्राहक नसल्याने तयार केलेले खाद्यपदार्थ खराब होतात आणि मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. पालिका नियमितपणे ‘सोपो’ वसूल करते; मात्र आमच्या अडचणीकडे कोणीच लक्ष देत नाही, अशी कैफियत पुरण खारोल व राम नारायण या हातगाडे व्यावसायिकांनी मांडली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.