Bicholim Fire Brigade: डिचोली बाजारात लागलेल्या भीषण आगीत मालमत्तेच्या हानीचा आकडा एक कोटीच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर जवळपास एक कोटीची मालमत्ता वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
दुसऱ्याबाजूने अग्निशमन दलाची तत्परता आणि लोकांनी केलेल्या तातडीच्या मदतकार्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या आगीत तीन दुकाने पूर्णतः खाक झाली. तर एका उपाहारगृहासह अन्य दोन दुकानांना आगीची झळ बसली.
काल (गुरुवारी) रात्री उशिरा लागलेल्या या आगीमुळे बाजारात गोंधळ पसरला. ही आग शॉर्ट सर्किट की अन्य कारणांमुळे लागली त्याबद्दल नेमकी माहिती स्पष्ट झालेली नाही. या आगीत शारदा एंटरप्राइजेसचे सर्वाधिक ३५ लाख, तर जेम्स बॉण्ड दुकानातील २० लाखांचा ऐवज जळून खाक झाला.दरम्यान, आगीत भस्मसात झालेल्या ‘जेम्स बॉण्ड’ या कपड्यांच्या दुकानाला काही वर्षांपूर्वी आग लागली होती,अशी माहिती मिळाली आहे.
अन् आगीने पेट घेतला...
रात्री १०.३० वा.च्या सुमारास जुन्या मार्केटमधील ‘जेम्स बॉण्ड’ या कपड्यांच्या दुकानाच्या छपरातून आगीच्या ज्वाला बाहेर सुटल्या. बघता-बघता हे दुकान पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या दुकानालगतच्या शारदा एन्टरप्रायझेस हे भांड्यांचे दुकान आणि चणेकर हे भुसारी दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मागील बाजूच्या एका उपाहारगृहासह अन्य दोन दुकानांना आगीची झळ बसली.
सहा बंब घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच, डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबांसहित घटनास्थळी येऊन मदतकार्य सुरू केले. आग मार्केट परिसरात लागल्याने म्हापसा, फोंडा येथून मिळून आणखी चार बंब बोलावण्यात आले. जवळच असलेल्या सरकारी शाळेच्या हायड्रन्डचाही वापर करण्यात आला. बऱ्याच प्रयत्नानंतर मध्यरात्रीपर्यंत आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. तेव्हा बाजारातील लोकांनी सुटकेचा श्वास घेतला.
सिलिंडर हटवल्याने दुर्घटना टळली
अग्निशमन दलाच्या जवानांसह नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्यासह नगरसेवक, इतर व्यापारी आणि बाजारातील लोकांनी मदतकार्यात भाग घेतला. घटनास्थळी पोलिसही हजर होते. जळीत तीन दुकानातील सामान लोकांनी बाहेर काढले. त्यातच आगीची झळ बसलेल्या उपाहारगृहातील सिलिंडर वेळीच हटविल्याने मोठी दुर्घटना टळली.
आमदार शेट्ये रात्रीच घटनास्थळी
आगीची माहिती मिळताच डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये रात्रीच बाजारात दाखल झाले. त्यांनी उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, मामलेदार राजाराम परब यांच्यासह घटनास्थळी दाखल झालेले अग्निशमन दलाचे उपसंचालक अजित कामत तसेच अधिकारी राहुल देसाई यांच्याशी चर्चा करून घटनेचा आढावा घेतला. लवकरात लवकर नुकसानीचा अहवाल तयार करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नुकसानग्रस्त दुकानदारांना मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार,अशी ग्वाही आमदारांनी दिली आहे. आज (शुक्रवारी) सकाळीही आमदार डॉ. शेट्ये यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.