Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; डिचोलीत भाजपला हुकमी एक्का

Khari Kujbuj Political Satire: डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये हे सत्ताधारी भाजपचेच झाल्यासारखे आहेत. विधानसभेतही खासगीत बोलताना माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांची आठवण काढली.

Sameer Panditrao

डिचोलीत भाजपला हुकमी एक्का

डिचोलीचे अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचा सरकारला पाठिंबा आहे. त्याबदल्यात सरकारने त्यांना माहिती तंत्रज्ञान महामंडळाचे अध्यक्षपद दिले आहे. भाजपने त्यांना प्रवेश दिला, तर ते प्रवेश करतील असे वातावरण आहे. तांत्रिक कारणास्तव ते मनाने भाजपमध्ये असूनही भाजपमध्ये नाहीत याची जाणीव भाजपच्या नेत्यांना आहे. २०२७ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी डिचोलीत नवा उमेदवार शोधावा लागणार नाही. कारण तेथे डॉ. शेट्ये आहेत असे सांगण्यात येते. पहिल्यांदाच आमदार होऊनही शेट्ये यांनी विधानसभेतही राज्याचे विषय उपस्थित करून वैद्यकीय क्षेत्राबाहेरही आपला अभ्यास आहे याची चुणूक अनेकदा दाखवली आहे. भाजपच्या प्रकृतीशी ते मिळते जुळते असल्याने त्यांच्या रूपाने भाजपला हुकमी एक्का मिळेल असे दिसते. ∙∙∙

चंद्रकांत शेट्ये जोशात...

डिचोलीचे अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये हे सत्ताधारी भाजपचेच झाल्यासारखे आहेत. विधानसभेतही खासगीत बोलताना माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मंगळवारी त्यांची आठवण काढली. ते आज दिसत नाहीत असे म्हटल्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शेट्ये यांचा आज वाढदिवस असे सांगितले. केक कुठे कापुया अशी कामत यांची विचारणा त्यावर केक कापण्यास तेथेच जाऊया असे मुख्यमंत्र्यांचे उत्तर. यावरून डॉ. शेट्ये यांच्याविषयी सत्ताधारी भाजपमध्ये किती आपुलकी आहे हे लक्षात येते. वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विधानसभा अधिवेशन असतानाही मुख्यमंत्री लवाजम्यासह उपस्थित राहिले यावरून शेट्ये किती जोशात याची चर्चा रंगली आहे. ∙∙∙

आशा फोल ठरल्या!

अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर मंत्री झालेले आणि पुन्हा भाजपच्या उमेदवारीवर निवडून आल्यानंतरही मंत्रिपदाची माळ गळ्यात घालून घेण्यास यशस्वी ठरलेले गोविंद गावडे या अधिवेशनात आमदार म्हणून आज बोलले. अर्थसंकल्पावर ते सरकारचे कौतुक करणार की सरकारला आरसा दाखवणार, याकडे सर्वांचेच लक्ष होते. सुमारे वीस मिनिटांच्या भाषणात त्यांनी सरकारला सूचना करण्याचेच काम केले. त्यासाठी कारखान्यात कसे व्यवस्थापन चालते, त्याप्रमाणे सरकारातही काम केले जावे असा त्यांचा व्होरा. त्याशिवाय त्यांनी आपल्या मनातील ओठावर आणताना सावधगिरी बाळगल्याचे दिसले. एक कलाकार असल्याने त्यांनी तो अभिनय अत्यंत लकबीने पार पाडला, त्यांची बोलण्याची देहबोलीत कलाकाराची छबी झळकत होती. सरकारी व्यवस्थापनात महत्त्वाच्या वित्त खात्यात अधिकाऱ्यांच्या ‘इगो’चा कसा फटका बसतो, यावर त्यांनी नेकमेपणाने बोट ठेवले आहे. आता वित्त खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यामुळे कदाचित त्यांना असे ‘इगो’वाले अधिकारी गावडे यांच्याकडूनच जाणून घ्यावे लागतील, असे सध्या तरी दिसते. ∙∙∙

मतदारांमुळेच आमदारांच्‍या उड्या?

नुवे हा मतदारसंघ पूर्णत: काँग्रेस धार्जिणा. किंबहुना हा मतदारसंघ भाजप पक्षाला दोन हात दूरच ठेवणारा, अशी परिस्‍थिती असतानाही मागच्‍या दोन निवडणुकात काँग्रेस पक्षाच्‍या तिकिटावर निवडून आलेल्‍या आमदारांनी भाजपात उडी घेतली. या पार्श्‍वभूमीवर २०२७ ची निवडणूक नुवेतून लढविण्‍याची तयारी करणारे लिंडन मोन्‍तेरो यांना भाजपविरोधी मतावर निवडून येऊनही नुवेचे आमदार भाजपात जातात त्‍याचे काय? असे विचारले असता, याला मतदारच कारणीभूत, असे उत्तर लिंडन यांनी दिले आहे. लिंडन म्‍हणतात, जर एका पक्षावर निवडून आलेला आमदार दुसऱ्या पक्षात जाताे आणि मतदार ते गप्‍प राहून पाहू लागतो, तर याचा दोष मतदारांना जात नाही का? लिंडन यांच्‍या या उत्तरात दम आहे, असे वाटत नाही का? ∙∙∙

‘पीओपी’मूर्ती रोखण्याची कृती यंदा तरी होणार?

राज्यात चवथ अर्थात गणेश चतुर्थी हा सर्वच गोमंतकीयांच्या उत्साहाचा आणि जिव्हाळ्याचा सण. या उत्सवाची लगबग राज्यातील विविध भागातील चित्रशाळांमध्ये दिसू लागली आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही प्लास्टर आॅफ पॅरीसच्या (पीओपी) मूर्ती मूर्तिकारांनी आणू नयेत, असे प्रशासनाने निर्देश दिले आहेत. पण दरवर्षी कितीही कंठशोष ओरड केली तरी पीओपी मूर्तींचे अवशेष विसर्जनानंतर नदी,समुद्र किनारी दिसून येतात. गणरायाचे ते रुप कुणाही भाविकाला पाहवत नाही. त्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अन् पीओपी मूर्तींची विक्रीच रोखण्याची कृती करता येईल का, हे यंदातरी पहावे नाही का? ∙∙∙

तोंड उघडायचं की गप्प बसायचं?

मंत्री सुभाष फळदेसाई यांनी अधिवेशनात रो-रो फेरीवरील व्हायरल व्हिडिओवर केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात एकच चर्चा सुरू झाली आहे. ‘जर घाण असेल तर दोन मिनिटे स्वच्छतागृहात राहून कोण व्हिडिओ काढेल का?’ या त्यांच्या प्रश्नामुळे लोकांना आता प्रश्‍न पडला आहे की, सरकारच्या चुका आणि त्रुटी समोर आणायच्या की नाही. एकीकडे नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की, प्रशासनातील उणिवा निदर्शनास आणून द्याव्यात. पण मंत्र्यांच्या या भूमिकेनंतर, जर आपण काही चुकीचं दाखवलं, तर ‘आम्हीच ते मोडले’ असा आरोप आमच्यावर होणार का, अशी भीती आता लोकांना वाटू लागलीय. काहीजण म्हणतात की, ‘यापुढे कॅमेरा बंद आणि तोंडही’ अशी भूमिका घ्यावी लागेल. जर समस्या मांडली तर ती मान्य करण्याऐवजी उलट समस्या मांडणाऱ्यालाच लक्ष्य केले जात असेल, तर लोकांनी व्यक्त तरी कसं व्हायचं? यामुळे आता लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येतंय का, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. ∙∙∙

मडगावातील राजकारण

विधानसभा निवडणुकीला साधारण दीड वर्ष आहे, पण अनेक ठिकाणी राजकारण जोर पकडू लागले आहे. गोव्याची व्यापारी व सांस्कृतिक राजधानी गणले जाणारे मडगावही त्याला अपवाद नाही. तेथे मडगावच्या बाबांना शह देण्यासाठी अनेक जण तोंडाला रंग लावू लागले आहेत. हल्लीच मडगाव नगरपालिकेने घेतलेल्या काही धोरणात्मक निर्णयांना काहींनी विरोध करून पालिका निवडणुकीस अवघेच महिने असताना ही घाई का असा प्रश्न केला आहे. त्यामुळे अनेकांना २०१५ मधील निवडणुकीस काही दिवस असताना व कोणतेही सोपस्कार झालेले नसताना शिलान्यास केलेल्या बहुमजली पार्किंग प्रकल्पाची आठवण झाली. कारण अजून तो प्रकल्प साकारलेला नाही. यात मुद्द्याची गोष्ट म्हणजे आता प्रश्न करणाऱ्यांचे नातेवाईकच तत्कालीन नगराध्यक्षांचे निकटवर्तीय होते व त्यांचाच त्यावेळी शिलान्यासासाठी पुढाकार होता.आता विरोध करणा-यांना त्यावेळी या सर्व बाबी कशा लक्षांत आल्या नाहीत की त्यामागेही राजकारण आहे अशी विचारणा होऊं लागली आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये यशस्वी जयस्वालचा नवा इतिहास! 50 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्डवर घडवला 'हा' पराक्रम

Mobile Addiction: स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आला, 'कोडॅक' नावाची कंपनी धोक्यात आली; मोबाइल नावाचा 'ब्रह्मराक्षस'

Video: 'ढवळीकर झोपले त्यांना जागे करा'; मुख्यमंत्री कुसुमाग्रजांची कविता सादर करताना युरींची मिश्किल टिपण्णी अन् सभागृहात हशा पिकला

Goa Assembly Session: गोव्यात आता रॉटवेलर, पिटबुलला 'नो एन्ट्री'! विधानसभेत विधेयक संमत, बंदीचा मार्ग मोकळा

Goa Assembly Session: 'गोवा दावे मूल्यांकन विधेयक, 2025' विधानसभेत संमत; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT