Bhutani Infra Project Sancoale Panchayat Meeting
मडगाव,कुठ्ठाळी: सांकवाळ पंचायत क्षेत्रात येणाऱ्या भूतानी प्रकल्पावरुन आज पुन्हा एकदा सांकवाळ पंचायतीत गदारोळ माजला. या प्रकल्पाला लोकांकडून विरोध होत असून यापूर्वी पंचायतीने या प्रकल्पाला कारणे दाखवा नोटीस जारी केली होती.
आज या नोटिशीला उत्तर देताना भूतानी प्रवर्तकांनी या कामासाठी अजूनही आपल्याला नगरनियोजन खात्याकडून डोंगर कापणीचे तसेच ईसीचा परवाना मिळालेला नाही, हे मान्य केल्यावर या प्रकल्पाच्या बांधकामाला दिलेली मान्यता मागे घेण्यात यावी, अशी मागणी विरोधी गटातील पंचसदस्यांनी केली. पण ती मागणी मान्य न करता यासंबंधी कायदेशीर सल्ला घ्यावा असा प्रस्ताव उपसरपंच डेरीक वालीस यांनी आणल्यावर एकच गदारोळ माजला. त्यामुळे ही बैठक कुठलाही निर्णय न घेता स्थगित करण्यात आली.
भूतानी प्रकल्पावर आज चर्चा होणार, हे समजल्यावर मोठ्या प्रमाणावर सांकवाळचे नागरिक पंचायतीत हजर झाले होते. ही बैठक महत्त्वाची असतानाही सरपंच या बैठकीला गैरहजर राहिल्याने उपसरपंच वालीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू झाली. भूतानीचा प्रश्न महत्त्वाचा असतानाही त्यावरची चर्चा इतर कामकाजात घालण्यात आल्याने हा मुद्दा अगदी शेवटी चर्चेला आला.
परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी गटाकडून मान्य होत नसल्याने विरोधी गटाचे तुळशीदास नाईक व आणखी एका सदस्याने सभात्याग केल्याने शेवटी तीन पंचसदस्यच बैठकीच्या ठिकाणी उपस्थित राहिले. मात्र ही संख्या गणपूर्तीसाठी आवश्यक एवढी नसल्याने कुठलाही निर्णय न घेता ही बैठक शेवटी आटोपती घेण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.