पणजी: राज्यात भंडारी समाजाची ताकद मोठी आहे. भंडारी समाजाची जातनिहाय जनगणनेची आणि ओबीसी आरक्षणाचा विषय निकालात निघण्यासाठी सर्व नेत्यांनी पक्ष आणि मतभेद सोडून एकत्रित यावे, असे आवाहन भंडारी समाजातील नेते गिरीश चोडणकर यांनी केले आहे. त्यामुळे चोडणकर यांनी केलेल्या या आवाहनानुसार आता विविध राजकीय पक्षात विखुरलेली नेतेमंडळी एकत्रित येणार काय? हा मूळ प्रश्न आहे.
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील निमंत्रित सदस्य असलेले आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी ‘गोमन्तक''कडे रोखठोक भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, भंडारी समाजातील काही नेत्यांनी जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्याला हात घातला आहे, परंतु त्यांच्याबरोबर इतर नेते पक्षबाजूला ठेवून या मुद्द्यासाठी एकत्रित येणे अपेक्षीत आहेत.
भंडारी समाजाचा केवळ आतापर्यंत राजकारणासाठी वापर होत आला आहे, सर्व नेत्यांनी जाणून घेणे आवश्यक आहे. भंडारी समाजाची मागणी पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी पक्षात असणाऱ्या नेत्यांनी सत्ताधारी सरकारशी झगडणे आवश्यक आहे. एकत्रित आल्यास समाजाची ताकद दिसेल. केवळ समाजाचा वापर होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे, आणि ते टाळण्यासाठी सर्व नेत्यांनी जागृतपणे एकत्रित यावे, असे आपले आवाहन असल्याचे चोडणकर म्हणाले.
आमदार सरदेसाई यांनी राज्यात जातनिहाय जनगणना होणे आवश्यक असल्याचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडल्यानंतर राज्याच्या राजकारणात आपली जागा (स्पेस) तयार करण्यासाठी माजी आमदार कांदोळकर व मांद्रेकर सरसावले.
सध्या दयानंद मांद्रेकर यांचे दौरे सुरू झाले असून, त्यांच्या गावोगावी भंडारी समाजाच्या बैठका सुरू झाल्या आहेत. भंडारी समाजाच्या संघटनेत अगोदरच दोन गट आहेत. एका गटाला संघटनेच्या कार्यकारिणीची सत्ता मिळाल्याने राजकीय वरदहस्त लाभला आहे, तर दुसरा राजकीय गट सत्ताधारी गटाची सत्ता खेचण्यासाठी आसुसलेला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.