Balrath Employees Strike: ‘बालरथ’ बंद राहिल्याने सोमवारी (ता.१७) डिचोलीत विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे तर अक्षरशः हाल झाले. बहुतेक विद्यार्थ्यांवर पायपीट करण्याची वेळ आली. काही विद्यार्थी सकाळी उशिरा शाळेत पोहोचले. तर दुपारी घर गाठताना विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ आले.
आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी बालरथ कामगारांनी सोमवारी संप केल्याने शाळांचे बालरथ बंद होते. काही शाळांमध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. बहुतेक ग्रामीण भागात प्रवासी बसगाड्या नसल्याने विद्यार्थ्यांना बालरथवर अवलंबून राहावे लागते.
सोमवारी बालरथ नसल्याने पिळगाव, मुळगाव कारापूर, सर्वण, नार्वे, मये, कुडचिरे आदी ग्रामीण भागातील बहुतेक विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. बालरथ सेवा नसल्याने पालकही काळजीत पडले होते. सरकारने विद्यार्थ्यांच्या गैरसोयीची दखल घ्यावी, अशी मागणी पालकांनी केली.
धड नाश्ताही नाही
बालरथ नसल्यामुळे व सकाळी प्रवासी बससेवेची सोय नसल्याने शाळा गाठताना कसरत करावी लागली. जवळपास तीन किलोमीटर अंतर पायपीट करावी लागली.
पायपीट करावी लागणार, त्यामुळे लवकर घराबाहेर पडावे लागले. सकाळी धड नाश्ताही करायला मिळाला नाही, असे पिळगाव येथील आयडियल हायस्कूलची विद्यार्थिनी जान्हवी पार्सेकर हिने सांगितले.
बालरथअभावी बार्देशात विद्यार्थ्यांची गैरसोय
युनायटेड बालरथ एम्प्लॉयी युनियन संघटनेच्या अध्यक्षतेखाली संपावर गेलेल्या बालरथ कामगारांच्या आंदोलनाचे पडसाद बार्देश तालुक्यातदेखील उमटले. सोमवार, १७ रोजी सकाळी शाळेत जाताना बसेसअभावी विद्यार्थी वर्ग तसेच त्यांच्या पालकांची बरीच धावपळ उडाली.
काही ठिकाणी पर्यायी व्यवस्थेअभावी विद्यार्थी शाळेत उशिराने पोहोचल्याची माहिती मिळाली. तर काही विद्यार्थ्यांवर दांडी मारण्याची वेळ ओढवली.
दरम्यान, अनेकांवर खासगी बससेवेचा लाभ घेण्याची वेळ आली. संपाचे परिणाम विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर जास्त झाले होते. बालरथ नसल्याने मुलांना आपल्या वाहनातून शाळेत सोडावे लागले, अशी माहिती धुळेर येथील पालक फिरोज खान यांनी दिली.
शहरातील काही शैक्षणिक संस्थांतील बालरथ सेवा सोमवारी सकाळी कार्यरत होती; पण दुपारच्या वेळी शाळेतून घरी जाताना ती बंद ठेवण्यात आली होती.
पालकांची धावपळ
ग्रामीण भागातील संस्थांतील ‘बालरथ’ मात्र पूर्णपणे बंद होते. बऱ्याच पालकांना बालरथ सेवा बंद असल्याची पूर्वकल्पना नसल्याने त्यांचे हाल झाले. शेवटच्या क्षणी धावाधाव करून पर्यायी सेवेतून आपल्या पाल्यांना शाळेत सोडणे त्यांना भाग पाडले. काही विद्यार्थी पायपीट करून शाळेत जाताना दिसले.
‘बालरथ’मुळे अंतर्गत भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगली सोय होत आहे. सोमवारी ‘बालरथ’ सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. तीन ते चार किलोमीटर चालत यावे लागल्याने काही विद्यार्थी पंधरा ते वीस मिनिटे शाळेत उशिरा पोहोचले. या प्रश्नाकडे शाळा व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे.
ज्ञानेश्वर गावकर, मुख्याध्यापक, आयडियल हायस्कूल
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.