कुंकळ्ळी: मुलांना शाळेची ओढ लागावी व प्रत्यक्ष अनुभवाने शिक्षण ग्रहण करावे, या उद्देशाने कुडचडे येथील श्रीमती चंद्रभागा तुकोबा नाईक शाळा संकुलात पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी शाळेने गेल्या दोन वर्षांपासून सुरू केलेल्या ‘बिन दप्तराच्या शाळे’चा आनंद विद्यार्थी घेत आहेत.
दप्तराच्या ओझ्याखाली दबणाऱ्या मुलांना आनंददायी शिक्षणाची गोडी लागावी म्हणून आता शिक्षण खात्याने यंदापासून शालेय वर्षात दहा दिवस बिनदप्तराची शाळा भरवावी, असा आदेश काढला आहे. श्रीमती चंद्रभागा तुकोबा नाईक विद्यालयात ही प्रथा २०२३ पासून सुरू करण्यात आली असून या पद्धतीचा मुलांना फायदा होत असून प्रत्यक्ष अनुभवातून मुले शिकत आहेत.
यंदा प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कुडचडे येथील रोपवाटिकेला भेट देऊन विविध वनस्पती व रोपांची माहिती घेतली. मुलांनी कुडचडे येथील बाजाराला भेट देऊन ग्राहक व विक्रेत्यांशी संवाद साधून बाजारभाव व बाजारात देवाण-घेवाण कशी होते याचा अभ्यास करून घेतला.
माध्यमिक स्तरावरील मुलांनी येथील सरकारी वाचनालयाला भेट देऊन पुस्तकांशी मैत्री जोडली व वाचकांशी संवाद साधला. अशा प्रकारची बिनदप्तराची शाळा महिन्यातून दोनवेळा भरते. दरम्यान, नव्या शिक्षण धोरणात मुलांची आकलन क्षमता वाढविण्यासाठी विविध कार्यकलाप सांगितले असून अशाप्रकारे चार भिंतीआडच्या शाळेतून मुलांना सकारात्मक शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होते, असे शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार कोप्रे यांनी सांगितले.
या प्रकल्पाअंतर्गत टपाल खात्याला, रेल्वे स्टेशन, पोलिस स्टेशन, अग्निशमन दल, विविध सरकारी खाती, बँका व स्थानिक स्वराज्य संस्थांना व गावांना भेटी देण्याची आखणी शिक्षकांनी केली असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. राज्यात असलेल्या विविध पारंपरिक उद्योगांची माहिती करून घेणे, शेती व्यवसाय, पोदेर, कुंभार व बांबू काम उद्योगाबरोबर आधुनिक उद्योगांची माहिती या उपक्रमाद्वारे मुलांना करून दिली जाणार आहे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.