गौरेश सत्तरकर
सध्या राज्यात 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये खेळाडू उत्तम कामगिरी करत आपल्या नावे पदक नोंदवत आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवत नेत्रावळीच्या बाबू गावकरने आपला दबदबा निर्माण केला. यामुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सुवर्णपदक मिळाल्यानंतर आमदार सुभाष फळदेसाई यांनी बाबू गावकरला 1 लाखांचे बक्षीस जाहीर केले. यानंतर त्याच्या कौतुकासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. सांगेच्या विविध क्षेत्रातील लोक तसेच आधुनिक पेंटॅथलॉन खेळातील सर्व खेळाडू या रॅलीत सामील झाले होते.
जांबावलीतील दामोदर मंदिरापासून निघालेली ही रॅली रिवण, मळकर्णे, सांगे मार्केट, भाटी, वाड्डे मार्गे निघून नेत्रावळीमध्ये संपली. यावेळी सुभाष फळदेसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बाबू गावकरच्या कामगिरीबद्दल मनापासून कौतुक केले.
ते म्हणाले की, बाबू गावकरला प्रोत्साहन म्हणून आणि अधिक सरावासाठी ते लेझर गन देणार आहेत. त्यामुळे त्याला पुढील खेळांसाठी सराव करण्यास मदत होईल. सदर लेझर गनची किंमत सुमारे 3 ते 4 लाख आहे.
सध्या सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला बाबू गावकर म्हणाला की, स्वत:च्या राज्यासाठी मी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवले याचा मला अभिमान आहे. यामध्ये ज्यांनी-ज्यांनी मला मदत केली त्या सर्वांचे मानापासून आभार.
विशेषत: आमदार सुभाष फळदेसाई यांचे मनापासून धन्यवाद करतो; कारण त्यांच्यामुळे आज सर्व स्तरातून माझे कौतुक होत आहे. तसेच त्यांनी मला लेझर गन दिली, ज्यामुळे मला भविष्यात स्पर्धेसाठी कुणाचीही लेझर गन घेण्याची आता गरज लागणार नाही.
आता वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये माझी निवड झाली आहे. माझ्या गोव्यासाठी मी तिथेही जीवाचे रान करत पदक मिळवण्यासाठी प्रयत्न करेन.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.