National Game Goa 2023 :बाबू गावकर ठरला राज्याचा ‘गोल्डन बॉय’; तीन पदकांची केली कमाई, महिलांचेही यश

महिलांच्या सांघिक प्रकारात नेहा गावकर, सीता गोसावी, योगिता वेळीप यांच्या संघाने ब्राँझपदक जिंकले.
National Game Goa 2023
National Game Goa 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

National Game Goa 2023 : पणजी, सांगे तालुक्यातील नेत्रावळी येथील बाबू गावकर या युवकाने या वर्षी जूनपूर्वी साधी बंदूक हाती घेतली नव्हती, लेझर गन म्हणजे काय हे त्याला ठाऊकही नव्हते. मात्र या २२ वर्षीय जिद्दी खेळाडूने कमाल केली.

मॉडर्न पेंटॅथलॉन खेळातील लेझर रन प्रकारात तो वेगाने धावलाच, त्याचवेळी अचूक नेमबाजीही केली. तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आणि ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील खेळांना सुरवात झाल्यानंतर आठ दिवसांनी मॉडर्न पेंटॅथलॉन खेळ यजमानांसाठी पदकविजेता ठरला.

फोंडा येथील क्रीडा संकुलात गुरुवारी सुवर्णपदक जिंकल्यानंतर बाबू गावकर याने सीता गोसावी हिच्यासह लेझर रन प्रकारातील मिश्र रिलेत गोव्याला रौप्यपदक जिंकून दिले, नंतर महिलांच्या सांघिक प्रकारात नेहा गावकर, सीता गोसावी, योगिता वेळीप यांच्या संघाने ब्राँझपदक जिंकले.

अशाप्रकारे मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये गोव्याला एकाच दिवशी तीन पदके मिळाली. ऑलिंपिक स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश असलेल्या मॉडर्न पेंटॅथलॉन खेळाचा प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.

पालकांचे पूर्ण पाठबळ

बाबू याची ही पहिलीच प्रमुख मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धा आहे. केपे सरकारी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतलेला बाबू गोवा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन पातळीवरील १५०० मीटर शर्यतीतील माजी सुवर्णपदक विजेता आहे.

बाबू याचे वडील अर्जुन गावकर हे ट्रॅक्टर मॅकेनिक असून त्यांची स्वतःची गॅरेज आहे. शिवाय ते बागायती शेतकरी आहेत. आई अपर्णा गृहिणी असून बहीण अर्पिता शिक्षण घेते. पालकांचे त्याला पूर्ण पाठबळ लाभले.

अडीच लाख रुपयांचे लेझर गन

1 बाबू गावकरने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनिमित्त सरावासाठी नेत्रावळी ते मडगाव हा सुमारे चाळीस किलोमीटरचा प्रवास अखंडितपणे केला, पण आता सुवर्णपदक जिंकल्यामुळे त्याची अजिबात तक्रार नाही.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मॉडर्न पेंटॅथलॉन खेळाचे नोडल अधिकारी नीलेश नाईक यांनी बाबूची प्रशंसा केला. ते म्हणाले, ‘‘जूनमध्ये गोव्यात विविध तालुक्यांत आम्ही चाचणी घेतली. सांगे तालुक्यातील बाबूमध्ये आम्हाला मॉडर्न पेंटॅथलॉन खेळासाठी आवश्यक असलेले कौशल्य दिसून आले.

2 गोवा मॉडर्न पेंटॅथलॉन संघटनेने बाबूसाठी लेझर गन विकत घेतली. या गनची किंमत सुमारे अडीच लाख रुपये आहे. सरावासाठी संघटनेकडून गन मिळविणारा तो पहिला खेळाडू ठरला. ही गन घेऊन त्याने सातत्याने सराव केला.

मला बाबूच्या कामगिरीबद्दल अभिमान वाटतो, त्याच्या यशाबद्दल मी आनंदी आहे. गोव्यातील एका दुर्गम भागातील तो रहिवासी असून मडगाव येथे प्रशिक्षणासाठी दररोज ४० किलोमीटरचा प्रवास करीत असे, पण त्याने एकही दिवस चुकवला नाही.’’

मार्गदर्शक पाठीशी नसतानाही...

बाबू म्हणाला, ‘मी धावण्याचे कोणतेही शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतलेले नाही. धावणे एवढेच माहीत होते. राज्यस्तरीय स्पर्धांत सहभागी होताना सेनादलाच्या धावपटूंना पाहिले. त्यांच्याकडून धावण्याबाबत माहिती घेतली, त्या जोरावर स्वतःच्या शैली व कौशल्यात बदल करत गेलो.

National Game Goa 2023
National Games Goa 2023 : गोमेकॉला भेट देऊन क्रीडामंत्र्यांनी केली जखमी खेळाडूंची विचारपूस

नंतर मी सेनादलाच्या धावपटूंनाही पराभूत केले. लेझर गन कधी हातात घेतले नव्हते. नीलेश नाईक सरांनी तसेच कीर्तन वैझ सर यांनी प्रोत्साहन दिले. अल्पावधीत नेमबाजीत कसब आत्मसात केले.

आता प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यामुळे खूप आनंदित आहे. मेहनतीला गोड फळ मिळाले.’

तीन महिन्यांतच लक्ष्य साधले

सुवर्णपदक जिंकल्यानंतर बाबू गावकरने सांगितले, की ‘‘एवढी मोठी प्रतिष्ठेची स्पर्धा गोव्यात होत असल्याने मला उत्तम कामगिरी करायची होती. वयाच्या तेराव्या वर्षीपासून मी मिनी मॅरेथॉन, क्रॉस कंट्री शर्यतीत धावत आहे.

शर्यती जिंकल्या, पण मॉडर्न पेंटॅथलॉन खेळाबाबत मला विशेष माहिती नव्हती. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनिमित्त गोवा मॉडर्न पेंटॅथलॉन संघटनेने निवड चाचणी घेतली. तेव्हा मी या चाचणीत सहभागी झालो, मात्र मी कधी बंदूकही हातात घेतली नव्हती. प्रशिक्षक नीलेश नाईक सर, कीर्तन वैझ सर यांनी माझी गुणवत्ता जाणली.

National Game Goa 2023
National Games 2023 Goa: धावता-धावता थेट सुवर्णपदकापर्यंत!

मॉडर्न पेंटॅथलॉन संघटनेनेही प्रोत्साहन दिले. मॉडर्न पेंटॅथलॉन खेळ आत्मसात केला.’’ गुरुवारी त्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी अभिनंदन केले.

बाबू गावकरला एक लाख रुपयांचे बक्षीस

सुवर्णपदक जिंकलेल्या बाबू गावकर याला मंत्री सुभाष फळदेसाई यांनी एक लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले.

नेत्रावळीच्या पंचसदस्य राखी नाईक यांनी बाबू गावकर याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि येत्या १९ डिसेंबरला ५० हजार रुपये देऊन बाबू याला गौरविण्यात येईल असे जाहीर केले.

गोव्याच्या खेळाडूंची लेझर रनमधील कामगिरी

पुरुष वैयक्तिकक ः बाबू गावकर ः १२ मिनिटे २६.२७ सेकंद - सुवर्णपदक

मिश्र रिले ः सीता गोसावी व बाबू गावकर ः १६ मिनिटे ०१.५० सेकंद - रौप्यपदक

महिला सांघिक ः सीता गोसावी (१५ मिनिटे ५५.५५ सेकंद), नेहा गावकर (१८ मिनिटे १०.८६ सेकंद), योगिता वेळीप (१८ मिनिटे २५.६३ सेकंद) - ब्राँझपदक

रवी यांच्याकडून बाबूचे कौतुक!

कृषिमंत्री रवी नाईक यांनी बाबू गावकर याचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातून आलेल्या बाबूने आपले कर्तृत्व सिद्ध करून गोव्याची क्षमता दाखवली आहे.

अशाप्रकारचे नेत्रदीपक कार्य करणाऱ्यांना सरकार नेहमीच प्रोत्साहन देत आला असून बाबू गावकर याच्या या कामगिरीमुळे प्रेरणा घेऊन आणखी नवे खेळाडू घडतील, अशी आशाही रवी यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com