Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: बाबूंना नेमके काय पाहिजे?

Khari Kujbuj Political Satire: माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे सध्या करत असलेल्या वक्तव्यांवरून त्यांना नेमके काय अपेक्षित आहे, हेच समजेनासे झाले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

विनोद पालयेकर आहेत कुठे?

राजकारण आता हळूहळू रंगात येऊ लागले आहे. विधानसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते, या शक्यतेने इच्छुक उमेदवारांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अनेकांना आता अचानक समाजसेवेची आठवण होऊ लागली असून मतदारसंघात विविध उपक्रमांद्वारे उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये शिवोली मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी मंत्री विनोद पालयेकर नेमके कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अलिकडच्या काळात ते सार्वजनिक जीवनात फारसे सक्रिय दिसत नाहीत. भलेही ते पुन्हा सक्रिय राजकारणात उतरणार नसतील; मात्र आगामी निवडणुकीत त्यांची भूमिका काय असेल, ते कोणाच्या बाजूने उभे राहतील किंवा मतदारसंघाबाबत त्यांची नेमकी भूमिका काय असेल, याबाबतचे गूढ कायम आहे. ∙∙∙

कांदोळकर पुन्हा सक्रिय

माजी आमदार किरण कांदोळकर यांनी थिवी मतदारसंघात पुन्हा एकदा सक्रिय हालचाली सुरू केल्या असून त्यांनी मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना थेट आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. आपल्या नेहमीच्या स्वभावानुसार हळर्णकर यांनी अद्याप तिखट शब्दांत प्रत्युत्तर देणे टाळले आहे. त्यामुळेच कांदोळकर यांना अधिक चेव चढल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी आता उघडपणे हळर्णकर यांच्यावर वैयक्तिक टीका-टिप्पणी करणेही सुरू केले आहे. विशेष म्हणजे, भाजप पक्ष संघटनेकडूनही अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये उपस्थित होत आहे. कांदोळकर यांनी यापूर्वी थिवीतून भाजपची उमेदवारी मिळवण्यापूर्वीही अशाच पद्धतीने मतदारसंघात स्वतःची जागा निर्माण केली होती. सध्याच्या हालचाली पाहता, ते पुन्हा एकदा त्याच रणनीतीवर काम करत असल्याचे दिसून येत आहे. ∙∙∙

बाबूंना नेमके काय पाहिजे?

माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे सध्या करत असलेल्या वक्तव्यांवरून त्यांना नेमके काय अपेक्षित आहे, हेच समजेनासे झाले आहे. त्यांची पुन्हा निवडणूक लढविण्याची तीव्र इच्छा असून तीही पेडणे मतदारसंघातूनच असल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याशी त्यांचा छत्तीसचा आकडा झाल्याची चर्चा आहे. पेडणेत भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळणार, असा दावा ते ठामपणे करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘थोडी वाट पाहा, पिक्चर अभी बाकी है...” असे सूचक वक्तव्य केले होते. आता तर त्यांनी थेट भाजपवरच निशाणा साधला. गत साडेचार वर्षांत भाजपने पेडण्याचा विकास केला नाही, अशी टीका त्यांनी केली. त्यांचा हा रोख नेमका भाजपकडे आहे की विद्यमान आमदारांकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारची वक्तव्ये करून आणि पक्षावर टीका करून भाजप त्यांना उमेदवारी देईल का? की आपल्या राजकीय भवितव्यासाठी त्यांनी एखाद्या पर्यायी पक्षाचीही चाचपणी सुरू केली आहे? अशी चर्चा पेडणेकरांमध्ये रंगू लागली आहे. ∙∙∙

ती योग्य वेळ कोणती?

राज्य मंत्रिमंडळात सध्या एक जागा रिक्त आहे. त्या जागेवर कोणत्या आमदाराला संधी मिळणार, याची चर्चा आता मंदावत चालली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक याबाबत एकाच सूरात बोलताना दिसत आहेत. मंत्रिपदाची जागा कधी भरणार, असे विचारल्यावर ‘योग्य वेळी निर्णय होईल,’ असे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणूक फेब्रुवारीच्या अखेरीस होणार, अशी चर्चा होती. मात्र, भाजपची तयारी पाहता ती याच वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मग मंत्रिपदाची जागा भरण्यास विलंब का होत आहे आणि ती “योग्य वेळ” नेमकी कधी येणार, याबाबत सत्ताधारी वर्तुळातच वेगळी चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

कुंकळ्ळीत जर्सन ‘आप’चे उमेदवार

कुंकळ्ळी मतदारसंघातून होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यापूर्वी जार्सन फर्नांडिस यांनी अनेकदा निवडणूक लढविली आहे. मात्र, २०२७ च्या निवडणुकीत दुसरे एक जर्सन कुंकळ्ळीतून उमेदवारी लढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे जर्सन म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसून आम आदमी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जर्सन गोम्स हे आहेत. जर्सन गोम्स हे मुळचे वेळ्ळी मतदारसंघातील आहेत. मात्र, वेळ्ळीतून यावेळीही ‘आप’तर्फे क्रूझ सिल्वा हेच निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जर्सन यांची ‘सोय’ कुंकळ्ळी मतदारसंघातून करण्यात आल्याचे ‘आप’कडून सांगितले जात आहे. ∙∙∙

गोवा दूध संघाची निवडणूक कधी?

‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या बोधवाक्यावर देशात आणि राज्यात सहकार चळवळ उभी राहिली. मात्र, दुर्दैवाने काही तथाकथित सहकार महर्षींनी सहकाराच्या माध्यमातून स्वतःचीच प्रगती साधण्याचा प्रयत्न केल्याने या चळवळीला काळिमा फासला गेला. स्वार्थी राजकारण आणि संचालकांच्या हितसंबंधांमुळे अनेक सहकारी संस्था अडचणीत आल्या, तर काहींना टाळे लागले. सोमवारी गोवा राज्य सहकारी संघाचे नवे संचालक मंडळ निवडून आले. विशेष म्हणजे, गोवा सहकारी दूध संस्थांचे प्रतिनिधी म्हणून सहकार निबंधकांनी बडतर्फ केलेले दूध संघाचे माजी संचालक पुन्हा निवडून आले. त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सहकार निबंधकांनी बडतर्फ केलेले माजी संचालक जर राज्य सहकारी संघ आणि गोवा राज्य सहकारी बँकेचे संचालक म्हणून निवडून येऊ शकतात, तर मग दूध संघाची निवडणूक घेण्यास सहकार निबंधक वेळकाढूपणा का करत आहेत? असा सवाल दूध उत्पादकांकडून उपस्थित केला जात आहे. राज्यातील गरीब दूध उत्पादकांची हक्काची दूध संघ निवडणूक निबंधक नेमकी कधी घेणार? जे दोषी ठरले, तेच सहकार संघ आणि सहकारी बँकेचे संचालक बनले; मात्र निर्दोष दूध उत्पादकांची संघटना अजूनही सरकारच्या ताब्यात का ठेवली आहे? असा प्रश्न आता दूध उत्पादकांकडून विचारला जात आहे. ∙∙∙

...अदृश्य विकास!

म्हापसा नगरपालिकेचा कार्यकाळ मंगळवारी (२६ मे) संपला. आता लवकरच पालिकेवर सरकारकडून प्रशासक नियुक्त केला जाणार आहे. या काळात पालिकेत भाजप आघाडीची सत्ता होती खरी; मात्र गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांमध्ये ना ताळमेळ दिसला, ना समन्वय. उलट त्यांच्यातील हेवेदावे आणि अंतर्गत मतभेदच अधिक चर्चेत राहिले. कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या कामांचा लेखाजोखा मांडला. मात्र, पत्रकारांनी थेट प्रश्न विचारला ‘तुम्ही विकासाचा दावा करत आहात; पण म्हापशातील जनता मात्र या कामांवर समाधानी नाही, असे का?’ या प्रश्नाने नगराध्यक्ष काहीशा अडचणीत आल्याचे दिसून आले. सारवासारव करताना त्यांनी सांगितले की, ‘अंडरग्राउंड केबलिंग’, पाईपलाईन आणि रस्त्यांचे डांबरीकरण अशी अनेक कामे आमदारांच्या सहकार्याने करण्यात आली. ‘अधिकतर विकास हा अंडरग्राउंड झाला आहे. शहराचा विकास झाला आहे; पण तो लोकांना का दिसत नाही, हे मी सांगू शकत नाही,’ असेही त्या म्हणाल्या. आता विकास झाला असेल, तर तो जनतेला का दिसत नाही, हा खरा संशोधनाचा विषय ठरला आहे. पालिका आणि आमदारांनी केलेला विकास नेमका गेला कुठे? आणि डोळ्यांना न दिसणाऱ्या या कामाला आता ‘अदृश्य विकास’ म्हणायचे का? अशी चर्चा आता म्हापशात रंगली आहे. ∙∙∙

फोंड्यात ‘मगो’चा उमेदवार कोण?

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते आणि विद्यमान वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पक्षातर्फे फोंडा मतदारसंघात काम सुरू करण्यात येणार असून त्यासाठी फोंड्यात मगो पक्षाची कचेरी उघडली जाईल, असे जाहीर केले आहे. डॉ. केतन भाटीकर यांच्या निधनानंतर फोंडा मतदारसंघावर मगोचा दावा अधिकच मजबूत झाल्याची चर्चा सुरू आहे. मगो पक्षाला फोंडा, प्रियोळ, मडकई आणि शिरोडा हे मतदारसंघ तुलनेने सुरक्षित वाटत आहेत. मात्र, अलीकडेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ‘प्रियोळ हा भाजपचाच मतदारसंघ आहे,’ असे स्पष्टपणे सांगितले. याचा अर्थ भाजप-मगो युती कायम राहिली, तर प्रियोळ मगोच्या वाट्याला येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच ढवळीकर आता फोंडा मतदारसंघावर आपला दावा मजबूत करण्याच्या तयारीत आहेत का, अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, खरा प्रश्न अजूनही कायम आहे, तो म्हणजे फोंड्यात ‘मगो’चा उमेदवार नेमका कोण असणार? ∙∙∙

...म्‍हणून खुटकरांची वर्णी

राज्‍याच्‍या वाहतूक खात्‍याच्‍या संचालकपदी राज्‍य सरकारने काही वर्षांपूर्वी आयएएस अधिकारी प्रविमल अभिषेक यांची वर्णी लावलेली होती. वाहतूक खाते सर्वसामान्‍य जनतेसाठी महत्त्‍वपूर्ण असल्‍याने या खात्‍याच्‍या संचालकाने दररोज कार्यालयात येऊन जनतेसाठी वाहतूक व्‍यवसायाशी संबंधित असलेल्‍यांच्‍या समस्‍या सोडवाव्‍या, अशी जनतेची अपेक्षा असते. परंतु, अभिषेक अनेक दिवस कार्यालयातच जात नव्‍हते. त्‍यामुळे त्‍यांच्‍याविरोधातील रोष वाढत होता. राज्‍यातील वाहतुकीसंदर्भातील समस्‍या स्‍थानिक अधिकाऱ्यांनाच माहीत असतात. त्‍यामुळे या खात्‍याच्‍या संचालकपदी नागरी सेवेतील वरिष्‍ठ अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी अनेकांनी लावून धरलेली होती. त्‍यामुळेच सरकारने या जागी अरविंद खुटकर यांची नेमणूक केल्‍याची चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

ढवळीकरांचा ‘बाण’ भाजपवर?

रिव्‍हॉल्‍यू‍शरी गोवन्‍स (आरजीपी) हा पक्षच नाही. ज्‍या मोठ्या पक्षांना मगो नको होता, त्‍यांनीच आरजीपीला पाठिंबा दिलेला होता, असे वक्तव्‍य भाजपसोबत सत्तेत असलेल्‍या मगो पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी केले. मुळात राज्‍यात मते फोडण्‍यासाठी भाजपकडूनच आप आणि आरजीपीला छुपा पाठिंबा दिला जात असल्‍याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्‍यामुळे ढवळीकर यांना हा ‘बाण’ भाजपवर तर मारायचा नसेल ना? असा प्रश्‍‍न अनेकजण विचारत आहेत. ∙∙∙

विश्‍वनाथ दळवी यांचा रुद्रावतार...

फोंडा पालिकेत व्यावसायिक परवाने अडवून ठेवण्याच्या प्रकारावरून माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विश्‍वनाथ दळवी चांगलेच संतापले. त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. लोक आपली कामे घेऊन पालिकेत येतात; मात्र कर्मचाऱ्यांकडून त्यांना योग्य प्रतिसाद मिळत नाही, असा थेट आरोप त्यांनी केल्याने उपस्थित सगळेच अवाक झाले. वास्तवही काहीसे तसेच असल्याची चर्चा आहे. छोट्या-छोट्या कामांसाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे घालावे लागत असल्याने लोक वैतागले आहेत. पालिका मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष कितीही चांगले काम करत असले, तरी इतर कर्मचाऱ्यांनीही त्यांना साथ द्यायला हवी ना, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शेवटी कंटाळलेला नागरिक नगरसेवकांकडे धाव घेतोच. अखेरीस पालिका मुख्याधिकाऱ्यांनी “सर्वांना समज दिली जाईल,” असे सांगत हा विषय शांत करण्याचा प्रयत्न केला. ∙∙∙

मोदींचा ‘उदो उदो’

आखाती युद्धामुळे सध्या देशात महागाई भडकली असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होत असली, तरी मोदी समर्थकांकडून मात्र पंतप्रधानांचा ‘उदो उदो’ सुरू आहे. या आणीबाणीच्या परिस्थितीतही पंतप्रधानांनी देशाची सूत्रे कणखरपणे सांभाळली असून मोदी हे खरेखुरे युगपुरुष आहेत, असा दावा केला जात आहे. मडगावातील ज्येष्ठ वकील ॲड. माधव बांदोडकर यांनी तर आपल्या घराच्या आवारात एक मोठा फलक लावला असून, त्यावर मोदींची छबी आणि खाली ‘युगपुरुष’ असा उल्लेख केला आहे. सध्या हा फलक फातोर्डा भागात चर्चेचा विषय ठरत आहे. ∙∙∙

कुंकळ्ळी व्यापारी संघटनेचा ‘संशय कल्लोळ’

‘आप पाप भटा माथ्यार थाप’ अशी कोंकणीत एक म्हण प्रचलित आहे. कुंकळळी पालिका क्षेत्रातील एका व्यापाऱ्याला स्थानिक पालिका अधिकाऱ्यांनी व्यापारी कर दाखला रद्द करण्याची नोटीस बजावल्याने व्यापारी संघटना संतप्त झाली आहे. ‘वेल्डिंग वर्कशॉप’ मालकाने आवश्यक असलेला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ना हरकत दाखला घेतला नसल्याने पालिका अधिकाऱ्यांनी त्या वर्कशॉप मालकाला ‘ट्रेड लायसन्स’ रद्द करण्याची नोटीस दिली आहे. मात्र, हा व्यापारी स्थानिक आमदारांविरोधात बोलत असल्याने सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप व्यापारी संघटनेकडून केला जात आहे. दुसरीकडे, व्यापारी संघटनेच्या संशयात कोणताही तथ्य नसून पालिका अधिकारी कोणत्याही दबावाखाली काम करत नसल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. व्यापाऱ्यांच्या संशयाला आपल्याकडे औषध नसल्याची मिश्कील प्रतिक्रियाही काही पालिका अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. ∙∙∙

‘लंबी रेस का घोडा’

आरजी पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांचा पक्ष जरी नवा असला आणि त्यांचीही ही पहिलीच टर्म असली, तरी गेल्या चार वर्षांत त्यांनी राजकारणाचे बारकावे चांगलेच आत्मसात केल्याची चर्चा सुरू आहे. मनोज परब यांनी ज्या प्रकारे तडाखेबाज भूमिका घेतल्या आणि आक्रमक विरोध केला, तसा मार्ग वीरेश बोरकर यांनी स्वीकारला नाही. उलट त्यांनी अनेकदा मनोज परब यांची उघडपणे स्तुतीच केली. एखादा विषय शांतपणे हाताळणे, परिस्थिती अधिक चिघळू न देणे आणि विनाकारण आरोप-प्रत्यारोप टाळणे, या त्यांच्या भूमिकेतून त्यांची राजकीय परिपक्वता दिसून येते. याच कारणामुळे बोरकर हे ‘लंबी रेस का घोडा’ ठरू शकतात, अशी चर्चा सुरु आहे. राज्यातील प्रश्नांकडे शांतपणे पाहण्याची आणि संयमाने निर्णय घेण्याची त्यांची शैली अनेकांच्या पसंतीस उतरू लागली आहे. ∙∙∙

कुंकळ्ळीत पुन्हा क्लाफास?

राजकारणात ‘ट्राय अँड एरर’ चालत नाही. यशस्वी व्हायचे असेल, तर सक्षम नियोजन आणि अथक परिश्रमाची गरज असते. कुंकळळी मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाला सक्षम उमेदवार मिळणे कठीण झाले आहे काय, असा प्रश्न आता भाजपाचे कार्यकर्तेच विचारू लागले आहेत. काँग्रेसचे आमदार युरी आलेमाव यांना थेट आव्हान देऊ शकेल असा उमेदवार भाजपाकडे नाही काय, असा सरळ सवालही कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले माजी आमदार क्लाफास डायस यांनाच भाजप पुन्हा एकदा युरी आलेमाव यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपाच्या ‘व्हॉट्सॲप गटांवर आणि सोशल मीडियावर ‘#फिरएकबारक्लाफासडायस’ हे वाक्य सध्या गाजत आहे. आता पाहायचे म्हणजे, भाजपासाठी ‘ट्राय ट्राय टिल यू सक्सीड’ ही रणनीती फायदेशीर ठरते की नाही. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: गोव्यातील भाजी उत्पादनात मोठी वाढ; राज्याला आत्मनिर्भरतेकडे पाऊल; बेळगावातून येणाऱ्या आवकीत दरदिवशी तब्बल 40 टनची घट

Margao Railway Station: दारुड्याला वाचवण्‍यासाठी दोन पोलिसांमध्‍येच जुंपली! मडगाव रेल्‍वे प्‍लॅटफॉर्मवर ‘फ्रिस्‍टाईल’ हाणामारी

Goa Transport Ministry: नवे वाडे येथील ५४४ घरे संबंधितांच्या नावावर होणार, गोवा गृहनिर्माण मंडळाच्या जागेबाबत मंत्र्यांचा मोठा निर्णय, नागरी हिताला प्राधान्‍य

South Goa District Hospital: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात औषधटंचाईचे ग्रहण कायम; आता 'डी-25' ड्रिप्‍स उपलब्‍ध नसल्‍यानं रुग्‍णांचं हाल

June Horoscope 2026: जून महिन्यात 5 मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन; 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस, लव्ह लाईफमध्ये राहणार गोडवा!

SCROLL FOR NEXT