Attack after Accident : म्हापसा येथील नवीन बसस्थानकावर भाडे सोडायला आलेल्या पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला केल्याने दोघेही जखमी झाले. चंद्रकांत शिरोडकर व पुत्र ब्रिजेश शिरोडकर (दोघेही रा. कांदोळी) अशी जखमींची नावे आहेत. किरकोळ अपघाताच्या कारणास्तव हा सुरीहल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी समीर पेडणेकर (38) व सुरेश कुंभार (38) या दोघा खोर्ली-म्हापसा येथील संशयित युवकांना अटक केली.
उपलब्ध माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (28 ऑक्टोबर) सायंकाळी 4 च्या सुमारास घडली. जखमी चंद्रकांत शिरोडकर व पुत्र ब्रिजेश शिरोडकर (रा. बामणवाडा - कांदोळी) हे आपल्या पर्यटक टॅक्सीतून म्हापसा येथे नवीन कदंब बसस्थानकावर पर्यटकांना सोडण्यासाठी आले होते.
यावेळी संशयितांनी अचानक आपली दुचाकी शिरोडकर पिता-पुत्राच्या कारसमोर घेतली. त्यामुळे कारची धडक या दुचाकीला बसली. यावेळी संशयितांनी त्यांना शिवीगाळ करत नुकसान भरपाईची मागणी केली व समीर पेडणेकर याने ब्रिजेश शिरोडकर याच्यावर सुरीहल्ला केला. त्याच्या छातीवर व तोंडावर सुऱ्याचे घाव पडले, तर मुलाला वाचविण्यासाठी आलेल्या चंद्रकांत शिरोडकर यांच्या पाठीवरही संशयितांनी सुऱ्याचे वार केले व तेथून पोबारा केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचारासाठी जिल्हा इस्पितळात नेले. तेथे त्यांच्यावर उपचार करून घरी पाठविण्यात आले.
दोघा संशयितांना अटक
जखमी ब्रिजेश याच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भादंसंच्या 341, 504, 427, 506(2), 307 व 34 कलमान्वये गुन्हा नोंद केला. या गुन्ह्याखाली दोन्ही संशयितांना पकडून अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील पाटील हे करीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.