Goa Assagao House Demolition Case Dainik Gomantak, Canva
गोवा

Goa Assagao: आसगाव घर मोडतोड प्रकरणाचा तपास मंदावला; क्राईम ब्रँचचा बचावात्मक पवित्रा

गोमन्तक डिजिटल टीम

आसगाव घर मोडतोड प्रकरण बरेच गाजले. या घटनेमुळे पोलिस खात्यात स्वच्छ प्रतिमा तसेच प्रामाणिक म्हणून नावलौकीकप्राप्त‍ पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांना गोव्यातून गाशा गुंडाळावा लागला. ते गोव्यातून गेल्यापासून या प्रकरणाचा तपासही मंदावला आहे.

आगरवाडेकर कुटुंबाच्‍या घराची बाऊन्‍सर्सद्वारे बेकायदा मोडतोड करण्‍याची महिन्यापूर्वीची घटना गोव्‍यात चांगलीच गाजली. या घटनेमुळे पोलिस खात्यात स्वच्छ प्रतिमा तसेच प्रामाणिक म्हणून नावलौकीकप्राप्त‍ पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांना गोव्यातून गाशा गुंडाळावा लागला. ते गोव्यातून गेल्यापासून या प्रकरणाचा तपासही मंदावला आहे. तपास यंत्रणेलाही अधिक खोलवर चौकशीसाठी प्रयत्न करण्याचे स्वारस्य राहिलेले नाही.

जसपाल सिंग यांना गोव्यातच सेवानिवृत्त व्हायचे होते. मात्र एका पोलिस अधिकाऱ्याने त्यांनीच घर मोडायला भाग पाडल्‍याची कबुली चौकशीवेळी मुख्य सचिवांना देऊन खळबळ उडवून दिली. आगरवाडेकर यांच्या घराचा काही भाग जमीनदोस्त केल्याप्रकरणी स्थानिक आमदार तसेच मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच त्‍या कुटुंबाला धीर दिला.

मात्र तक्रारदार आगरवाडेकर कुटुंबाने २४ तासांच्या आतच ही तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेत घूमजाव केल्याने या प्रकरणाकडे संशयाने बघितले गेले. तरीसुद्धा या बेकायदेशीररीत्या केलेल्या कृतीची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी देत हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपविले व या तपासकामासाठी एसआयटी स्थापन केली.

यापूर्वी अशी अनेक प्रकरणे घडली आहेत, मात्र सरकारने इतकी गंभीर दखल घेतली नव्हती. या प्रकरणी आगरवाडेकर राहत असलेली जागा मुंबईस्थित पूजा शर्मा हिने खरेदी केली होती व ती खाली करून देण्याची जबाबदारी विक्रीप्रकरणातील दलाल अर्शद ख्वाजा याने घेतली होती.

पूजा शर्मा ही एका भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची पत्नी असल्याने पोलिसांचे अभय तिला मिळाले हे निलंबित निरीक्षकाने दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. क्राईम ब्रँचने या प्रकरणाचा तपास सुरूवातीला जोरात सुरू केला, मात्र समन्स पाठवूनही ती चौकशीला उपस्थित न राहिल्याने हा तपास काही प्रमाणात मंदावला.

पोलिसांनी वारंवार समन्सचा सपाटा लावल्याने पूजा शर्माने न्‍यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. या प्रकरणाची मुख्‍य सूत्रधार पूजा शर्मा हिच असल्याचा पवित्रा सत्र न्यायालयात पोलिसांनी घेत तिच्या अर्जाला विरोध केला. न्यायालयानेही तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. मात्र पोलिसांनी जे मुद्दे सत्र न्यायालयात उत्तर देताना दिले होते, तेच मुद्दे पुन्हा उच्च न्यायालयात दिले.

हे उत्तर गुळमुळीत होते. त्यामुळे क्राईम ब्रँचने बचावात्मक पवित्रा घेतला आहे. संशयित अर्शद ख्वाजा याने या घटनेची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. त्यामुळे पूजा शर्मा यांची भूमिका सिद्ध करण्यासाठी पोलिसांना पुरावे जमा करून त्यांची सांगड घालण्याची गरज भासणार आहे.

उच्च न्यायालयात पूजा शर्मा हिच्या अर्जावरील सुनावणीवेळी तिची चौकशी करण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. तिची कोठडीतील चौकशीची आवश्‍यकता तूर्त वाटत नाही अशी बाजू पोलिसांनी मांडल्याने न्यायालयाने तिला सशर्त अटकपूर्व जामीन दिला. त्‍यामुळे क्राईम ब्रँचच्या एसआयटीने सुरू केलेल्या तपासाची हवाच निघून गेली आहे. उद्या २२ जुलैला पूजा शर्मा ही न्यायालयाच्या निर्देशानुसार न्‍यायालयात हजर राहणे आवश्‍यक आहे. मात्र तिला मिळालेल्या अटकपूर्व जामिनामुळे या प्रकरणातील हवाच निघून गेली आहे, हे खरे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

SCROLL FOR NEXT