केवळ विधानाच्या आधारावर जर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते, तर गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या विधानावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांना अटक करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेसनेही सहा दिवसांपूर्वी माजी राज्यपाल मलिक यांनी केलेल्या विधानाचा आधार घेऊन मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नीस अटक करण्याची मागणी केली होती.
आम आदमी पक्षाच्या येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसगी भंडारी समाजाच्या डिचोली समितीचे सचिव राजेश कळंगुटकर उपस्थित होते. नाईक म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आमचे नेते अरविंद केजरीवाल यांना अटक केली, परंतु त्यांना जामीन मिळू नये, यासाठी गोव्यातील निवडणुकीसाठी पैसा वापरले, त्यासाठी गोव्यातील चार उमेदवारांना ताब्यात घेतल्याचे ईडीने न्यायालयास सांगितले आणि त्यांची कोठडी मिळविली.
ईडीच्या वकिलांनी न्यायाधीशांची दिशाभूल करून ही कोठडी मिळवली आहे. गोव्यात ईडीने ज्यांना समन्स बजावले, त्यात केवळ २०२२ च्या निवडणुकीतील ॲड. अमित पालेकर आणि रामराव वाघ हेच दोन उमेदवार होते. जे दुसरे दोघे होते ते अशोक नाईक व दत्तप्रसाद नाईक हे भंडारी समाजाचे नेते आहेत.
ईडीने या नेत्यांना चौकशीसाठी बोलावल्याचे कारण देत न्यायालयाकडून ईडीने केजरीवाल यांची कोठडी मिळविली. त्याविरोधात आता देशभर आम आदमी पक्षाने मोहीम राबविली आहे. ज्यांना आपला पाठिंबा द्यावयाचा आहे, ज्यांना आपले दुःख व्यक्त करावयाचे आहे, त्यासाठी मोबाईल व्हॉट्सॲप क्रमांकही (९७००२९७००२) जाहीर केला आहे.
भंडारी समाजाच्या सतावणुकीचे कारस्थान
राज्यात गुरुवारी चौघांची झालेली ईडीची चौकशी ही निव्वळ भंडारी समाजाची सतावणूक करण्याचे कारस्थान आहे. २०२२ मध्ये जो पक्ष भंडारी समाजाचे अधिक उमेदवार देतील, त्यांच्या मागे संघटना राहील असे त्यावेळी संघटनेने जाहीर केले होते. त्यानुसारच आपने अधिकाधिक भंडारी समाजाचे उमेदवार दिले होते.
कालच्या भंडारी समाजाच्या नेत्यांच्या चौकशीचा माजी आमदार किरण कांदोळकर, राजेश दाभोळकर यांनी निषेध केला आहे. भंडारी समाज हा गरीब व कष्टाळू आहे, कुणीही या समाजाला गृहीत धरू नये नाहीतर हा समाज प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवेल, असेही कळंगुटकर यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.