वास्को: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळाची शक्यता निर्माण झाल्याने राज्यातील पारंपरिक मच्छीमाऱ्यांनी मासेमारी बंदीची वाट न पाहता आपल्या लहान होड्या तसेच मच्छीमार ट्रॉलर सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बंदी कालावधी सुरू होण्याच्या पंधरा दिवस अगोदरच मच्छीमार व्यावसायिकांना आपला गाशा गुंडाळावा लागला.
१ जूनपासून ३१ जुलैपर्यंत ६१ दिवसांच्या बंदी कालावधीत यांत्रिक साधने बसवलेल्या जहाजाद्वारे मासेमारी, ट्रॉल-नेट आणि पर्स-सिन नेटद्वारे मासेमारी करण्यास मनाई आहे. गोवा सागरी मासेमारी नियम १९८० च्या कलम ४ च्या उपकलम (१) आणि (२) अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात मासेमारी बंदी असलेल्या काळात ट्रॉलरवर काम करणारे परराज्यातील कर्मचारी आपल्या घरी परततात. ३१ मेनंतर ट्रॉलर्स मालकांना मच्छीमारी बोटींचा वापर व्यवसायासाठी करता येत नाही. २१ मेपर्यंत मच्छीमार होड्यासह, ट्रॉलर्स व विविध साहित्यांची आवराआवर सुरु झाली आहे.
यंदा मान्सूनपूर्व पावसाने राज्यात थैमान घातल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे मुरगाव बंदरासह समुद्रात इतर ठिकाणी असलेल्या बार्ज व मोठ्या बोटी सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अवकाळी पावसाने गेले पाच दिवस थैमान घातल्याने यंदा मच्छीमारांना पंधरा दिवस अगोदरच आपला गाशा गुंडाळावा लागला. राज्यातील पारंपरिक मच्छीमारांनी मासेमारी बंदीची वाट न पाहता आपल्या लहान होड्या व ट्रॉलर्स सुरक्षित ठिकाणी नेले आहेत.
खारीवाडा मच्छीमार जेटीवर मच्छीमार सामानांची आवराआवर सुरू करण्यात आली आहे. मच्छीमार ट्रॉलर्स जेटीवर परतले असून जाळे व इतर साहित्य ट्रॉलर्स मधून इतरत्र हलवण्याचे काम जोरात सुरू आहे. मच्छीमार ट्रॉलर्स १० दिवस अगोदरच बंद करावे लागल्याने मच्छीमार ट्रॉलर्स व्यावसायिकांत नाराजी पसरली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.