Anupam Kher in IFFI : चित्रपटाशी संबंधित कोणतीही पार्श्वभूमी नसलेले अनेक कलाकार आपण बॉलीवूडमध्ये पाहिले आहेत. त्यापैकीच एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे अनुपम खेर. 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त विविध विषयांवर दिग्गज व्यक्तींचे मास्टरक्लासेस आयोजित करण्यात येत आहेत. आजच्या दिवशी Performing for Screen & Theatre या विषयावर ज्येष्ठ नेते अनुपम खेर यांच्या मास्टरक्लासचे आयोजन करण्यात आले होते. या सत्राचे सूत्रसंचालन पंकज दुबे यांनी केले.
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याची पार्श्वभूमी सांगताना अनुपम खेर यांनी त्यांचा पाचवीतला किस्सा सांगितला. ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला त्यावेळी त्यांची कशाप्रकारे फजिती झाली, हे सांगत प्रत्येक कलाकाराने कधीही अपयशाला घाबरलं नाही पाहिजे असा संदेश त्यांनी दिला. ते म्हणाले, जोपर्यंत तुम्ही अपयश पचवू शकत नाही तोपर्यंत तुम्ही उत्तम कलाकार होऊ शकत नाही. (Anupam Kher in IFFI)
कोणत्याही व्यक्तीला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आधार. जेव्हा त्यांना त्यांच्या वडिलांचा आधार मिळाला त्यावेळेला त्यांनी कधीही मागे वळून न पाहता येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक आव्हानाला तोंड देत इथवरची मजल गाठली. ते नेहमी म्हणतात, माझ्या प्रत्येक यशामागे माझ्या कुटुंबीयांचा आणि त्यातल्या त्यात माझ्या वडिलांचा सगळ्यात मोठा वाटा आहे.
या मास्टरक्लासला सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणारे नवोदित कलाकार उपस्थित होते. या कलाकारांना फिल्म क्षेत्रातील अभिनय आणि नाट्य क्षेत्रातील अभिनय यातला अचूक फरक समजावून सांगत त्यांनी एक मुद्दा सांगितला की, क्षेत्र कोणतेही असो उत्तम अभिनेता नाट्य क्षेत्र आणि सिनेक्षेत्र या दोन्हींमध्ये उत्तमच असतो. तुमच्याकडे प्रेक्षकाला तुमच्या भावना पोहोचवण्याची ताकद असेल तर तुम्ही नक्कीच उत्तम अभिनेते म्हणून उदयास येतात.
पंकज दुबे यांनी अनुपम खेर यांना त्यांच्या आजवरच्या प्रवासातील अनेक गोष्टींवर प्रश्न विचारले असता अनुपम यांनी त्यांच्या कारकिर्दीतले असे मजेशीर किस्से सांगितले की प्रेक्षक गृहातले अगदी सर्वजण पोट धरून हसू लागले. जसे हे सत्र पुढे सरकू लागले, तसे या संवादाला आणखी रंगत येऊ लागली. (Anupam Kher Masterclass in IFFI)
फक्त अभिनयच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही अनुपम खेर अनेक वर्ष कार्य करत आहेत. याबाबत आयुष्यामध्ये आलेल्या. आव्हानांना कसं तोंड द्यायचं, या गोष्टीतून स्वतःला कसं सावरायचं आणि पुढे कसं जायचं याबाबत त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. या दरम्यान ते प्रेक्षकांशी इतके समरूप झाले की अक्षरश: सर्वांनी त्यांना डोक्यावर घेतलं. गमतीचा भाग म्हणून सत्रादरम्यान जांभई देणाऱ्या एका तरुणाच्या तोंडावर त्यांनी चक्क पाणी शिंपडलं आणि सर्वत्र हास्याची लाट उमटली.
अनेकदा कलाकारांमध्ये ठराविक कलानंतर गर्विष्ठ भावना रुजायला लागतात. यावर भाष्य करत ते म्हणाले, कधीही स्वतःच्या बाबतीत इम्प्रेस होऊ नका, जर तुम्ही असं केलं तर उत्तम अभिनेता किंवा कलाकार होण्याचा रस्ता तुम्ही बंद करता. स्वत:ला सतत शिकण्याची सवय लावा, कारण हे क्षेत्र एका महासागरासारखं आहे. तुम्ही यातून जेवढे शिकाल तेवढं अनेक खोल गोष्ट तुम्हाला जाणवत राहतील.
कोणताही अभिनेता वयाचे बंधन न जुमानता कुठल्याही वयामध्ये कोणत्याही वयाच्या व्यक्तीची भूमिका कशाप्रकारे साकारू शकतो याचे उदाहरण देत असताना अनुपम यांनी एक छोटसं सादरीकरण करून दाखवलं. आपल्या भावना आपल्या अभिनयातून कशाप्रकारे व्यक्त करायच्या हे सांगताना त्यांनी एका चित्रपटातील एक भावनिक सादरीकरण केलं आणि ते स्टेजवर ते सादरीकरण करत असताना रडू लागले. काही सेकंदात अभिनयासाठी त्यांनी आपल्या डोळ्यात आणलेले अश्रू पाहून संपूर्ण प्रेक्षकगृह त्यांच्या सन्मानासाठी उभं राहीलं.
बदलत्या जमान्यासोबत आपल्या आयुष्याबरोबरच सिने सृष्टीतील झालेल्या बदलांवर त्यांनी भाष्य केलं. या बदलामुळे झालेला परिणामांवर सांगताना आपल्या आयुष्यावर आणि एकंदरीत आपल्या मानसिक स्वास्थ्यावर होणाऱ्या गोष्टींवरही ते बोलले. आपण अनेकदा आपल्या मनातील भावना कोणाला सांगतच नाही. त्यामुळे मानसिक आजारांचे आपण शिकार होतो आणि याला आजच्या प्रत्येक वर्गातील व्यक्तीला सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुमच्या मनातील भावना सांगायला सुरुवात करा. भावना सांगितल्यामुळे तुम्ही कधीही कमजोर ठरत नाही पण याचा फायदा होऊन तुम्ही त्या कोषातून नक्कीच बाहेर पडू शकता. अतिशय मजेशीर पद्धतीने त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या. अभिनय क्षेत्र असो किंवा आपलं सामान्य आयुष्य प्रत्येक व्यक्तीचं सकारात्मक राहणं किती गरजेचे आहे हे त्यांनी यावेळी नमूद केलं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.