Beach Noise Pollution Committee Case
पणजी: हणजूण व वागातोर येथील किनारपट्टी भागात रात्री उशिरा कर्कश आवाजात संगीत वाजवणाऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून समिती खासगी सदस्यांच्या नावांवर एकमत होत नव्हते. आज अखेर या समितीसाठी दोन खासगी सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
या ध्वनिप्रदूषण देखरेख त्रिसदस्यीय समितीवर या दोन व्यक्तींसह उत्तर गोवा पोलिस उपअधीक्षकांचा समावेश असणार आहे. रात्रीच्यावेळी अचानक भेटी देऊन उल्लंघनकर्त्यांविरुद्ध कारवाई केलेला अहवाल वेळोवेळी सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले आहेत.
गोवा खंडपीठाने निश्चित केलेल्या या ध्वनिप्रदूषण देखरेख समितीवर कमलाकर मनोहर नाईक (शेळण-म्हापसा) व कॅप्टन जेराल्ड जॉन फर्नांडिस (टेंबावाडी-मोरजी) या खासगी सदस्यांचा समावेश आहे. ही समिती रात्रीच्यावेळी हणजूण व वागातोर किनारपट्टी परिसरात उत्तर गोवा पोलिस उपअधीक्षकांसमवेत अचानक पाहणी करून आपला अहवाल खंडपीठाला सादर करील. त्यांच्या या अहवालानुसार पुढील कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित खात्यांची राहणार आहे.
गोवा खंडपीठाने किनारपट्टी परिसरातील ध्वनिप्रदूषणासंदर्भात कारवाईची मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याची अवमान याचिका डेस्मंड आल्वारिस यांनी दाखल केली होती. या याचिकेवर गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी होती. ध्वनिप्रदूषण केलेल्या काही रेस्टॉरंट्स तसेच पब्सविरोधात वेळेचे तसेच मर्यादा असलेल्या परवान्यापेक्षा अधिक कर्कश आवाजाने संगीत वाजवून उल्लंघन केल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी कारवाई केली होती. यावर देखरेख ठेवण्यासाठी मूळ याचिकेत त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याची निर्देश दिले होते त्याप्रमाणे ती करण्यात आली होती. मात्र या समितीवरच आरोप झाल्याने ती कार्यरत नव्हती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.