Amthane Dam Gate Repair Work Progressing Rapidly
डिचोली: आमठाणे धरणाच्या मुख्य ‘गेट’ची दुरुस्ती करण्यात येत असून सध्या दुरुस्तीकाम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे ''लक्ष्य'' जलस्रोत खात्याने ठेवले असून, त्याच्यानंतरच धरणातील जलसाठा नियंत्रित होणार आहे, अशी माहिती जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
‘आमठाणे’धरण (Amthane Dam) बांधल्यानंतर आतापर्यंत धरणाच्या गेटची देखभाल करण्याकडे दुर्लक्ष झाले होते. गेल्या जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातील कुडासे परिसरात ‘तिळारी’चा कालवा फुटल्यानंतर ''तिळारी''तून गोव्याला पाणी पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे उत्तर गोव्यात ''पाणीबाणी'' निर्माण झाली होती. आपत्कालीनवेळी आमठाणे धरणातील पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात सोडण्याची वेळ आली तेव्हा धरणाची ''गेट'' उघडता उघड नव्हती.
जवळपास चार दिवस अथक परिश्रम केल्यानंतर ''गेट'' एकदाची उघडली खरी, मात्र बार्देश तालुक्यातील जनतेचा ''घसा'' कोरडा पडला होता. या प्रकारानंतर जलस्रोत खात्याचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला होता. आपत्कालीन वेळी पुन्हा असा प्रसंग निर्माण होऊ नये. यासाठी आता ''गेट''ची दुरुस्ती करण्यात येत आहे.
आमठाणे धरणातील जलसाठा कमी होऊन सभोवतालचे पात्र कोरडे पडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पात्र कोरडे पडूनही जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. त्यामुळे जनतेकडून प्रश्न उपस्थित होत होते. मात्र ‘गेट’च्या कामासाठी धरणातील जलसाठा कमी करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ''गेट''चे काम पूर्ण होताच, साळ बंधाऱ्यातून पाणी सोडून आमठाणे धरणातील जलसाठा नियंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.