पणजी: काँग्रेसच्या समित्यांमध्ये समावेश करूनही माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, यांच्याबरोबर दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनीही गाभा समितीच्या आजच्या बैठकीला दांडी मारली. यावरून अजूनही पाटकर आणि विरियातो यांची मनधरणी करण्यात स्थानिक नेतृत्वाला अपयश आल्याचे स्पष्ट होत आहे.
काँग्रेसच्या गाभा समितीची आज पक्षाच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कार्यकारी अध्यक्ष आमदार ॲड. कार्लोस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्ता, एम. के. शेख आणि खजिनदार दत्ता नायक यांची उपस्थिती होती.
प्रदेशाध्यक्ष बदलानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ नये यासाठी श्रेष्ठींच्या सूचनेनुसार माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना पक्षाच्या विविध समितीमध्ये स्थान देण्यात आले, परंतु त्यांनी बैठकांना उपस्थित राहण्यात किंवा काँग्रेस भवनात जाण्याचे टाळले असल्याचे दिसून आले आहे.
आपण काँग्रेसचेच कार्यकर्ते असल्याचे त्यांनी दाखवून दिले असले तरी त्यांची भूमिका पक्षविरोधी नसल्याने पक्षाच्या शिस्तभंग समितीलाही त्यांच्याविरोधात काहीही पावले उचलता येत नाहीत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गोवा दौऱ्यानिमित्त मार्गदर्शन मेळाव्याचे निमंत्रण देण्यावरून मागील काही आठवड्यांपूर्वी पाटकर आणि समितीच्या नेत्यांमधील भिन्नता जनतेसमोर आली होती.
बालिशपणा थांबवा : पाटकर
जीपीसीसीचे माजी अध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले की, त्यांना आजच्या गाभा समितीच्या बैठकीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. बैठकीचा निरोप नेमका कधी आणि कोणत्या क्रमांकावर पाठवला गेला, हे गोवा प्रभारी माणिकारव ठाकरे यांनी दाखवून द्यावे. स्थानिक काँग्रेस नेतृत्व ठाकरे यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत, हा ‘बालिशपणा’ थांबला पाहिजे. यापूर्वी ६ सप्टेंबरच्या ‘राजकीय कामकाज समिती’च्या (पीएसी) बैठकीचा निरोप मिळाला, तोही कर्मचाऱ्याच्या फोनवरून, याचीही आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
त्यांनी सभांना उपस्थित रहावे : ठाकरे
पाटकर यांच्या अनुपस्थितीवर गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले की, माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पाटकर यांना प्रत्येक समितीच्या बैठकीत आमंत्रित केले जाते आणि त्यांचे नाव समित्यांमध्ये समाविष्ट केले जाते. पाटकर यांनी बैठकीला उपस्थित राहणे, सूचना देणे आणि त्यांचे विचार मांडणे अपेक्षित आहे. आम्ही त्यांना सभांमध्ये आदराने बोलावतो; आता त्यांनी यावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.