वाळपई: आंबेडे-सत्तरी येथील श्रवण बर्वे (२४) याच्या खूनप्रकरणी वाळपई पोलिसांनी त्याचे वडील देविदास बर्वे व मोठा भाऊ उदय बर्वे याला अटक केल्यामुळे समस्त गोमंतकीयांना धक्का बसला आहे. १५ एप्रिल रोजी हा खुनाचा प्रकार समोर आला. त्यानंतर १६ रोजी शवचिकित्सा झाली आणि त्याच संध्याकाळी त्याच्या कुटुंबीयांनी श्रवणचा मृतदेह गावात न नेता सांतिनेज-पणजी येथे बाहेरच्या बाहेर अंत्यविधी उरकले. त्यामुळे त्याचवेळी श्रवणच्या कुटुंबीयांवर संशय बळावला होता.
आपल्या पोटच्या मुलाचा खून झाला तरी त्याचा मृतदेह वडील अंत्यविधीसाठी घरी आणत नाहीत, ही बाब आंबेडेवासीयांना आश्चर्यकारक आणि संशयास्पद वाटली होती. श्रवण गावात सर्वांचा लाडका होता. त्यामुळे त्याच्या अंतिम दर्शनासाठी गावातील लोक, मित्र परिवार जमला होता. मात्र त्याच्या वडिलांनी सर्वांची निराशा केली आणि तेथेच संशयाची सुई त्यांच्याकडे वळली.
या प्रकरणी वासुदेव वझरेकर (४२, आंबेडे-नगरगाव) याला काल तपासाअंती ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली. तसेच श्रवणचे वडील आणि भावाला काल रात्री अटक केली. वासुदेवच्या मदतीने श्रवणचा खून केल्याचे समोर आले आहे. मात्र असे असले तरी पोलिसांनी या प्रकरणी अजून काहींना अटक होण्याची शक्यता वर्तवली आहे.
वडील देविदास यांनी पोलिसांना जबानीत सांगितले की, श्रवणचे त्यांच्यासोबत पटत नव्हते. त्यामुळे तो एकटा राहायचा. मात्र त्याचा खून त्यांनी का केला?, गेल्या पाच वर्षांपासून श्रवण एकटाच का राहायचा?, होंडा येथे तो जात नव्हता, तरीसुद्धा त्यांच्यात भांडण का व्हायचे? आणि काहीही असले तरी स्वत:च्या पोटच्या मुलाचा खून करणे योग्य होते का? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.
श्रवण हा आंबेडे येथे ज्या घरात राहत होता, ते घर व इतर मालमत्ता त्याचे वडील विकण्याच्या तयारीत होते. त्यास श्रवणचा विरोध होता. त्यामुळे भांडण वाढले होते.
कुटुंबीयांना त्याचा अडथळा नको म्हणून त्याच्या खुनाचा कट रचला असावा असे बोलले जात आहे.
श्रवणचा फसवून किंवा त्याला गाफील ठेवून खून केला असावा. कारण तो शरीराने दणकट होता. एका-दोघांना ऐकणारा नव्हता.
त्याचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच अंगावर जखमाही होत्या. त्याच्यावर कोणी कशा प्रकारे वार केले हे अजून स्पष्ट झालेले नाही.
श्रवणला मारून घराच्या गेटजवळ टाकून खुनाचा प्रकार घडल्याचे दाखविण्यात आले.
सोमवारी रात्री उशिरापर्यंत श्रवण मंदिर परिसरात होता. तेथे असलेल्या १५ जणांना चौकशीसाठी बोलावले आणि या खुनाचा उलगडा झाला.
श्रवण हा देविदास यांचा लहान मुलगा. वय जेमतेम २४ वर्षे. तरीसुद्धा गेल्या पाच वर्षांपासून तो कुटुंबापासून दूर एकटाच राहायचा. वडिलांबरोबर त्याचे पटत नव्हते. पण आईचे काय? तिच्याबरोबरही श्रवणचे पटत नव्हते का? श्रवण शिकत होता तेव्हा घरातून त्याला कोणीच सहकार्य केले नाही. त्यामुळे त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. मात्र गावात तो सर्वांशी चांगला वागायचा.
त्याला वाचनाची आवड होती. वाळपईत ग्रंथालयात जाऊन पुस्तके आणून वाचायचा. श्रवण सर्वांना सांगायचा, मला कसलेही काम मिळाले तरी मी ते आवडीने आणि मेहनतीने करेन. कोणाकडे काही काम असेल तर सांगा.
श्रवण हा श्रद्धाळू होता. देवावर त्याचा खूप विश्वास. ज्या रात्री त्याचा खून झाला, त्या दिवशी तो हनुमंत मंदिरात होता. कदाचित त्याचवेळी त्याच्या खुनाचा कट रचला गेला असावा. वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेल्यांमध्येच त्याचा खुनी उपस्थित होता.
दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तपास सुरू झाल्यानंतर शेवटचे त्याला कोणी पाहिले, त्याच्यासोबत कोण होते, याची चौकशी सुरू झाली आणि अवघ्या पाच दिवसांत आरोपींना पकडण्यात आले. श्री हनुमंताच्या कृपेनेच आरोपी सापडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, देविदास बर्वे यांचा मोठा मुलगा उदय हा आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.