Shravan Barve Murder: आदल्यादिवशी शिजला 'श्रवण'च्या खुनाचा कट! कामगाराला पैसे, भूखंडाचे आमिष दाखवून काढला काटा

Valpoi Sattari Murder Case: आंबेडे-नगरगाव येथील श्रवण बर्वे याचा सोमवारी पूर्वनियोजितरित्या कट रचून वडिलांनी खून घडवून आणल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
Shravan Barve murder Update
Shravan Barve murder UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नेहमीच कुटुंबामध्ये उडणारे खटके आणि मारहाणीच्या प्रकारांमुळे श्रवणचे वडील देविदास बर्वे कंटाळले होते. त्यामुळेच त्यांनी श्रवणचा काटा काढण्यासाठी त्यांच्याच फार्म हाऊसवर कामाला असलेल्या वासुदेव ओझरेकर याला पैशांचे तसेच भूखंड देण्याचे आमिष दाखवल्याचे पोलिस चौकशीत समोर आले असून त्याची पडताळणी सुरू आहे.

आंबेडे-नगरगाव येथील श्रवण बर्वे याचा सोमवारी पूर्वनियोजितरित्या कट रचून वडिलांनी खून घडवून आणल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. श्रवण याच्याविरुद्ध वडिलांनी वाळपई पोलिस स्थानकात मारहाणीच्या पाच तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यात त्याला अटकही झाली होती.

श्रवणच्या खुनामागील कारण स्पष्ट झाले नसले तरी आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

या दोघांनाही न्यायाधीशांसमोर हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडी बजावण्यात आली. उद्या (ता.२१) रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. श्रवण बर्वे याच्या खूनप्रकरणी त्याचे वडील देविदास बर्वे आणि मोठा भाऊ उदय बर्वे याच्यासह वासुदेव ओझरेकर याला अटक करण्यात आली आहे. या खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, महत्त्वाची माहिती समोर येत असून त्याची पडताळणी केली जात आहे. देविदास बर्वे हे वासुदेव ओझरेकर याला फार्महाऊसवर अधूनमधून रोजंदारीवर कामाला बोलावत होते.

घटनेच्या दिवसापासून श्रवणच्या मारेकऱ्यांची माहिती मिळत नव्हती. मात्र, गावातील लोकांमध्ये या खुनामागे त्याचे वडील देविदास हेच असण्याची शक्यता व दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

परंतु त्यांच्याविरुद्ध ठोस माहिती मिळत नव्हती. आंबेडे येथे श्रवण राहात असलेल्या घरापासून काही अंतरावर एक मंदिर आहे. या मंदिराशेजारीच घटनेच्या रात्री त्या गावातील एका तरुणाचा वाढदिवस होता.

त्याला अनेकांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे त्या उपस्थितांमधून माहिती मिळवण्यासाठी काही अल्पवयीनांसह १५ जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यातून वासुदेव ओझरेकर याचे नाव पुढे आले. त्याला ताब्यात घेऊन इतरांना सोडून दिले. त्याची सखोल चौकशी केली असता, या कटामागे श्रवणचे वडील आणि भाऊ असल्याचा उलगडा झाला. पोलिसांनी त्वरित वेगवान हालचाली करत शनिवारी रात्री त्या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली.

आदल्यादिवशी शिजला खुनाचा कट

खुनाच्या घटनेच्या आदल्या रात्री देविदास बर्वे हे वासुदेवला रात्रीच्यावेळी भेटण्यास गेले होते. त्याच रात्री खुनाचा कट शिजला होता. कुटुंबातील सदस्यांशी वारंवार उडणाऱ्या खटक्यांमुळे गेल्या पाच वर्षांपासून श्रवणला आंबेडे येथील जुन्या घरामध्ये वेगळे ठेवण्यात आले होते, तर बर्वे कुटुंब होंडा येथे नव्याने बांधलेल्या घरामध्ये राहात होते.

याचा श्रवणला होता राग...

१ बर्वे कुटुंबीयांकडून श्रवणला कधीतरीच जेवण पुरविले जात होते. त्यामुळे श्रवण जो कोणी काही देईल, त्याने पोट भरत असे.

२ देविदास हे श्रवणच्या या वागणुकीला कंटाळले होते. त्याच्या या वागणुकीमुळे समाजामध्ये त्यांची मानहानी होत होती.

३ त्याला ज्या घरामध्ये ठेवले होते, ते घर पडीक होते. आतमध्ये साफसफाई केली जात नव्हती. त्याच स्थितीत श्रवण तेथे राहायचा.

४ बर्वे कुटुंबाकडून श्रवणची दखल घेतली जात नव्हती. वेगळे ठेवल्याने श्रवणला कुटुंबीयांचा राग येत होता.

५ कधी तरी तो गावातील लोकांशी बोलताना हा राग व्यक्त करायचा, अशी माहिती गावातील लोकांशी चर्चा केल्यानंतर पोलिसांना मिळाली.

पोलिसांच्या विशेष पथकाने लावला छडा

पोलिस साहाय्यक अधीक्षक अरुण बलगत्रा, पर्वरीचे पोलिस उपअधीक्षक विश्‍वेश कर्पे, पोलिस निरीक्षक राहुल परब, उपनिरीक्षक मंदार परब, डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी, पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर तसेच तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावला.

Shravan Barve murder Update
Sharavn Barve Murder: पाचवेळा मुलाविरुद्ध तक्रार, एकदा अटक! श्रवण बर्वेचा खून का झाला? पोलिसांनी दिली मोठी अपडेट

श्रवण स्वत: विभक्त राहिला की...

अधूनमधून वडील देविदास हे श्रवणला आंबेडे येथे जाऊन जेवण देत होते. कुटुंबापासून विभक्त ठेवल्याने त्याचे मानसिक संतुलन ढळले होते. मात्र, वडिलांनी त्याला वेगळे ठेवले, की तो स्वतःहून वेगळा राहात होता, याचा उलगडा झाला नसल्याचे कौशल यांनी सांगितले.

Shravan Barve murder Update
Shravan Barve Murder: वडील, भावाने 'श्रवण'चा काटा का काढला? आंबेडेवासीयांची उडाली झोप

दिशाभूल करण्यासाठी गळ्याभोवती दोरी

प्रत्यक्षात श्रवणचा गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर दिशाभूल करण्यासाठी त्याच्या गळ्यासभोवती दोरी गुंडाळून ठेवली होती. शवचिकित्सा अहवालातच हे कटूसत्य उघड झाले आहे. कोणताही पुरावा वा धागेदोरे नसल्याने या प्रकरणाचा छडा लावणे आव्हान होते. त्यासाठी पर्वरी, डिचोली व वाळपई पोलिसांच्या मदतीने विशेष तपास पथके स्थापन केली, अशी माहिती कौशल यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com