
वाळपई: आंबेडे येथील श्रवण बर्वे (वय २४ वर्षे) याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी त्याचे वडील देविदास आणि भाऊ उदय यांना आज रात्री उशिरा अटक केली. यापूर्वी याप्रकरणी अटक केलेल्या वासुदेव नकुळ वोझरेकर (वय ४३ वर्षे) याला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. घरच्यांनीच घात केल्याने या खून प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.
श्रवणचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पाच दिवसांनी पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली वासुदेव नकुळ वोझरेकर याला अटक केली आहे. वासुदेवला पोलिसांनी वाळपई न्यायालयात हजर केले असता त्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी बजावण्यात आली. मात्र, या गुन्ह्यात आणखी काहीजणांचा समावेश असल्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी स्पष्ट केले होते. अखेर रात्री उशिरा श्रवणचे वडील देविदास बर्वे आणि त्याचा मोठा भाऊ उदय बर्वे यांना अटक करण्यात आली. मात्र, या दोघांनी श्रवणचा काटा का काढला , हा मोठा प्रश्न आहे. हा खून का केला, याची माहिती मिळू शकली नाही.
मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी श्रवण आणि देविदास यांचे मोठे भांडण झाले होते. त्यात दोघांनी एकमेकांना मारल्याचीही माहिती आहे. याच रागातून बापाने मुलाला संपवले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देविदासना दोन मुले, मोठा उदय, तर लहान श्रवण. उदय हा अभियंता असून नोकरी करत होता. पाच वर्षांपूर्वी देविदास यांनी आजोबानगर-होंडा येथे नवीन घर बांधल्यानंतर तेथेच स्थायिक झाले. तेथे देविदास हे पत्नी आणि मुलगा उदयसोबत राहायचे. मात्र, श्रवणचे वडिलांसोबत पटत नव्हते. त्यामुळे ते आंबेडे येथे राहात होता.
कधी कधी पौरोहित्यासाठी जायचा. स्वत:च्या कुळागारात काम करून मिळणाऱ्या पैशांतून तो गुजराण करत होता. मात्र, दररोज स्वत:च जेवण बनवायचे त्याला कठीण व्हायचे. गावातील प्रत्येक घरात तो जायचा. त्यामुळे आंबेडे गाव हे त्याचे कुटुंबच होते.
गावात कोणाकडेही गेला तरी कोणीही त्याला उपाशी पाठवत नव्हते. प्रत्येक घरात तो जेवायला-खायचा. कोणाकडेही लग्नकार्य किंवा इतर कार्य असो, तो आवर्जून जायचा. गावात तो सर्वांशी खेळीमेळीने वागायचा. त्यामुळे वडील त्याच्यावर रागवायचे. कोणाकडे काहीही खातो, म्हणून त्यांच्यात भांडण व्हायचे. मंगळवार, १५ रोजी त्याचा खून झाला. त्याची माहिती देविदास यांनीच पोलिस व इतरांना दिली होती.
पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, उपअधीक्षक जीवबा दळवी, विश्वेश कर्पे, पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर, दिनेश गडेकर, उपनिरीक्षक प्रथमेश गावस, खुशाली नाईक, सनिषा नाईक तसेच इतरांनी या तपासकार्यात भाग घेतला.
जेव्हा पोलिस घटनास्थळी तपासासाठी पोचले, त्यावेळी देविदास आणि उदय हे दोघे बिनधास्त होते. आपला मुलगा गेला, याचे त्यांना दु:ख नव्हते. गावातील प्रत्येकजण घटनास्थळी येऊन श्रवण गेल्याबद्दल दु:ख व्यक्त करायचा. मात्र, हे दोघे बिनधास्त होते. त्यामुळे त्याचदिवशी पोलिसांना त्यांच्यावर संशय होता. मात्र, कोणत्याही प्रकारचा ठोस पुरावा नव्हता.
गेले पाच दिवस या प्रकरणाचा गुंता सुटत नव्हता. पोलिसांनी चांगली टिम या कामासाठी जुंपली होती. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबच्या पथकांनी वेगवेगळे नमुने घेतले. त्याचबरोबर घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. होंडा येथे देविदास राहात असलेल्या ठिकाणचेही सीसीटीव्ही फुटेज घेतले. त्यामुळे हा खुनाचा गुंता सुटण्यास मदत झाली.
देविदास आणि श्रवण यांचे रोज भांडण व्हायचे. त्यामुळे यापूर्वी श्रवण याने वाळपई पोलिसांत वडिलांविरुध्द तक्रार केलेली आहे. तसेच देविदास यांनीही श्रवणविषयी होंडा पोलिस स्थानकात तक्रार केली आहे.
...अन् खुनाचे बिंग फुटले
श्रवण सोमवारी रात्री उशिरापर्यंत हनुमान मंदिर परिसरात होता. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्यांची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी १५ जणांना बोलाविले होते. त्यावेळी चौकशीदरम्यान वासुदेव पोलिसांच्या कचाट्यात सापडला. वासुदेवची कसून चौकशी केली असता त्याने या दोघांची नावे सांगून खरे काय झाले, याची माहिती पोलिसांना दिली.
आंबेडेवासीयांची उडाली झोप
श्रवणच्या खुनामागील रहस्य अधिकच गहिरे बनले आहे. मात्र, त्याचा खून करण्यासारखे एवढे टोकाचे पाऊल का कोणी उचलावे, याबाबत सध्या नगरगाव पंचक्रोशीत उलट सुलट चर्चा सुरू आहे. सध्या आंबेडेवासीयांची या घटनेमुळे झोपच उडाली आहे.
आंबेडे गावातील २४ वर्षीय तरुण श्रवण देविदास बर्वे याचा सोमवारी मध्यरात्री गळा दाबून खून करण्यात आला होता. या घटनेमुळे संपूर्ण सत्तरी तालुका हादरला असून सध्या वाड्या-वाड्यांवर, घरा-घरांत याच घटनेची चर्चा सुरू आहे. श्रवण हा एकटाच आंबेडे येथे मारुती मंदिराजवळील घरात राहात होता. त्याचे वडिलांशी पटत नसल्याची चर्चा लोकांत सुरू आहे. त्यामुळे श्रवणचे जीवन एकाकीच बनले होते.
श्रवणचे आई-वडील होंडा येथे राहात होते. वडील काहीबाही मदत करीत होते; पण दररोज काय अन्न शिजवून खावे, हा ज्वलंत प्रश्न श्रवणला पडत असे. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता. एकटेपणामुळे त्याचे जीवन असह्य बनले होते. आंबेडे गावात त्याची दररोज भटकंती असे. कुणाच्या घरी जायचा, एखाद्या दुकानात बसून रहायचा. जे मिळेल ते खायचे, असा त्याचा दिनक्रम होता. शांत, संयमी स्वभावाने त्याने आंबेडे गावातील लोकांना आपलेसे केले होते. दुकानात बसून तो लोकांशी गप्पागोष्टी करायचा. कोणाच्याही घरी गेल्यावर त्याला हमखास काहीतरी खायला मिळत असे. तरुण वयातच वडिलांशी पटत नसल्यामुळे घरी एकटे राहण्याची वेळ श्रवणवर आली होती. त्यामुळे त्याची मानसिक स्थिती खचली होती. तो कधीही कोणाच्या वाटेला जात नसे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.