पणजी: विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय गट-तट समोरासमोर भिडत असून, प्रकरणे हातघाईपर्यंत जात आहेत. मुरगाव येथील काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर ठाकल्यानंतर आता परस्परविरोधी तक्रारी येऊ लागल्या आहेत. भाजपची दादागिरी वाढली असून पक्षाचे गुंड काँग्रेस कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहेत. पोलिसांनी त्यांना संरक्षण देण्याऐवजी सामान्य जनतेला संरक्षण द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे माध्यम विभागप्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
पणजीकर म्हणाले की, भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करत आहेत. त्याला आळा घालण्याचे काम पोलिसांचे आहे. चिखली इस्पितळात दाखल झालेल्यांनीच आमच्या एका कार्यकर्तावर वाहन घातले. सामान्य माणसावर वाहने चढवण्याची भाजपची संस्कृती असून उलट आमच्या विरोधातच वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जात आहेत. गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे चिखली इस्पितळात जाऊन तथाकथित रुग्णांची विचारपूस करण्याचे राजकीय नाटक करत आहेत. त्यापेक्षा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचा सल्ला द्यावा, असेही पणजीकर म्हणाले.
भाजपचे पराभूत उमेदवार सूड उगवताहेत
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे उमेदवार आता वैफल्यग्रस्त झाले आहेत. आपणाला पाठिंबा न दिलेल्यावर सूड उगवण्याचा आणि दमदाटी करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. विविध मतदारसंघांत भाजपच्या कार्यकर्त्यांची दादागिरी वाढली आहे. या प्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते फक्त बघ्याची भूमिका घेणार नाहीत. पोलिसांनी या प्रकरणांची वेळीच दखल घ्यावी आणि नागरिकांना संरक्षण द्यावे अशी मागणीही पणजीकर यांनी केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.