Ajit Pawar Passed Away : महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक धगधगते नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. ही हृदयद्रावक घटना समोर येताच संपूर्ण महाराष्ट्रासह देशात शोककळा पसरली. अजित पवार हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आपल्या खासगी विमानाने मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. मात्र, बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी विमानाला तांत्रिक अडचण आल्याने ते दुर्घटनाग्रस्त झाले. या भीषण अपघातात अजित पवार यांची प्राणज्योत मालवली असून राज्याच्या राजकीय इतिहासातील एका मोठ्या अध्यायाचा असा करुण अंत होईल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती.
अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरातील राजकीय नेत्यांनी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, "महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने मला अत्यंत दुःख झाले आहे. महाराष्ट्राने एक कर्तबगार नेतृत्व गमावले. तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीने महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मी पवार कुटुंबिय आणि त्यांच्या हितचिंतकांच्या दुःखात सहभागी आहे."
मुख्यमंत्री सावंत यांच्यासह गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही श्रध्दांजली अर्पण करताना पवारांच्या कार्याचा गौरव केला. गोव्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही या घटनेबद्दल धक्का व्यक्त केला असून, "हा केवळ एका नेत्याचा मृत्यू नसून महाराष्ट्राने आपला एक कणखर आवाज गमावला आहे," अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
अजित पवार यांची ओळख ही एक कामाचा उरक असलेला आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असलेला लोकनेता म्हणून होती. बारामती या त्यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांच्या आयुष्याची अखेर व्हावी, हे मनाला चटका लावणारे आहे. सलग सहा वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. शेती, सिंचन आणि अर्थकारण या विषयांवर त्यांची मोठी पकड होती. कार्यकर्त्यांसाठी ते नेहमीच 'दादा' होते, ज्यांच्या शब्दाला पक्के महत्त्व असायचे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून विशेषतः ग्रामीण भागातील विकासकामांवर त्यांचा जो प्रभाव होता, तो भरुन काढणे अशक्य आहे.
या भीषण अपघातात विमानातील अन्य सहकाऱ्यांचाही मृत्यू झाला असून त्याबद्दलही सर्व स्तरांतून संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्र आपल्या लाडक्या नेत्याच्या अशा जाण्याने सुन्न झाला आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वच पक्षांच्या नेत्यांनी अजित पवार यांना "लोकनेता" म्हणून गौरवले असून त्यांच्या निधनाने राज्याच्या विकासाचे एक इंजिन थांबले आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. पवारांच्या निधनामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि बारामतीकरांमध्ये अत्यंत दुःखाचे वातावरण असून संपूर्ण राज्य आज या घटनेमुळे पोरके झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.