Calangute Beach
Calangute Beach Dainik Gomantak
गोवा

कोविडनंतर कळंगुट किनारा पुन्हा बहरतोय; पर्यटकांची वाढतेय रेलचेल

दैनिक गोमन्तक

शिवोली: गेली दोन वर्षे कोविड महामारीमुळे (Covid 19) आपले वैभव गमावून बसलेला बार्देश तालुक्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचा कळंगुट (Calangute) समुद्र किनारा सध्या पुन्हा एकदा बहरतोय. या किनाऱ्यावर पर्यटकांची रेलचेल वाढली असून व्यावसायिक नव्या उमेदीने पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. एकूणच पर्यटन क्षेत्रात बदल झाला असल्याचे या भागाचा दौरा केला असता दिसून आले. या किनाऱ्यावर देशी-विदेशी पर्यटकांना खाण-पानाची, विरंगुळ्याची सेवा देणारे शॅक्स (कुटिर रेस्टॉरंट्स) उभारण्याचे काम संबंधित मालकांकडून सध्या युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. 80 टक्के शॅक्स व्यवसाय आतापर्यंत पूर्ववत सुरू झाला आहे. गोव्यात येणारा पर्यटक, मग तो देशी असो अथवा विदेशी, कळंगुट किनाऱ्याला भेट दिल्याशिवाय परत जात नाही. विशेषत: गोव्याच्या इतर भागांपेक्षा पर्यटकांची किनाऱ्यांकडे अधिक ओढ असते. कळंगुट पंचक्रोशीतील सिकेरीपासून ते बागापर्यंतच्या किनारी भागात दरवर्षी 160 ते 180 च्या आसपास शॅक्स उभारण्यात येतात. सप्टेंबरचा पहिला आठवडा ते मे महिन्याच्या उत्तरार्धापर्यंत येथील शॅक व्यवसाय तेजीत असतो. मात्र, एकदा पावसाळा सुरू झाला की शॅक्सचा गाशा गुंडाळण्यात येतो. केवळ सहा ते आठ महिने चालणाऱ्या या व्यवसायावर वर्षभराची कमाई करून स्थानिक व्यावसायिक समाधानी जीवन जगतो.

गोव्याचा आर्थिक कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यटन व्यवसायाची खरीखुरी ओळख म्हणून पाहिल्या जाणाऱ्या कळंगुटमुळेच दरवर्षी सरकारी तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होतो. त्यामुळे राज्याला पर्यटनदृष्ट्या आर्थिक स्थैर्य देण्याचा मानही कळंगुटलाच जातो, हे विशेष. दुर्दैवाने गेली दोन वर्षे कोविड महामारीमुळे राज्यातील इतर व्यवसायांबरोबरच टुरिझम इंडस्ट्रीही पूर्णपणे कोलमडून पडली. या व्यवसायाशी संबंधित लोकांवर मोठे संकटच आले होते. या भागातील बहुतेक व्यवसाय ठप्प झाल्याने स्थानिकांवर कर्ज घेऊन चरितार्थ चालवण्याची वेळ आली होती.

चतुर्थीनंतर नवी पहाट

सुदैवाने यंदाच्या चतुर्थी सणानंतर राज्यात कोविडचा प्रभाव खूप कमी झाला. त्यातच सरकारकडून राज्यात जारी करण्यात आलेली संचारबंदी मागे घेतली गेल्यामुळे या भागातील व्यवसायिकांनी मोठे धाडस करीत बंद पडलेला व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची धडपड सुरू केली. आता किनाऱ्यावरील बहुतेक शॅक्समालक नव्या हंगामासाठी सज्ज झाल्याचे या भागाचा दौरा केला असता दिसून आले.

राज्य सरकारचा मदतीचा हात

सरकारकडून शॅकमालकांना यंदा प्रथमच 50 टक्के अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आल्याने लहान-मोठ्या व्यवसायिकांत पुन्हा एकदा उत्साह निर्माण झाला असल्याचे या भागातील गेस्ट हाऊसचे मालक सावियो डिसोझा यांनी सांगितले. सध्या, विदेशी पर्यटकांपेक्षा देशी पर्यटक मोठ्या प्रमाणात किनारी भागात वास्तव्यास असल्याचे दिसून आले. देशी पर्यटकांवरच यंदा भिस्त : कळंगुटला दरवर्षी भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये 70 टक्के आकडा हा देशी पर्यटकांचाच असतो. त्यातच गेली दोन वर्षे कोविडमुळे विदेशी पर्यटक गोव्यात आले नाहीत. त्यामुळे येथील स्थानिक व्यावसायिकांनी सध्या देशी पर्यटकांना गृहीत धरूनच येत्या सिझनची तयारी चालवली आहे. गेली दोन वर्षे संकटातून मार्गक्रमण करणारे स्थानिक टॅक्सीचालक, रेन्ट अ कार तसेच रेंट अ बाईक व्यावसायिकांच्याही नजरा देशातील लोकांकडे लागून राहिल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT