गोवा: गोव्यात आम्ही कमीत कमी दहा जागा तरी जिंकू असा दावा आप करीत असले तरी फक्त बाणावली वगळता अन्य कुठेही आपची डाळ शिजणार नाही असेच वाटते. बाणावली येथे मात्र आपचे व्हेंझी व्हिएगस यांची देहबोली पाहिल्यास ते जिंकून येणार असेच वाटते. व्हेंझी हे आपचे एकमेव आमदार ठरल्यास गोव्यात तेच या पक्षाचे बिनीचे नेते होऊ शकतात. गोव्यातील आपची सूत्रे पुन्हा दक्षिण गोव्याकडे येऊ शकतात याचेच हे संकेत म्हणायचे का?
मगोपचे नेते खूष!
मगो पक्षाचे नेते सुदिनराव सध्या भलतेच खूश आहेत. यावेळेला कोणत्याही राजकीय पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नाही, याची खूणगाठ सुदिनरावांनी बांधली आहे. सरकार घडवायचे असेल तर मगोचा टेकू घ्यावाच लागेल, हे सुदिनराव नव्हे तर सगळेच मगो कार्यकर्ते बोलू लागले आहेत. आता हा टेकू द्यायचा कुणाला याचा पेच सुदिनरावांना पडला आहे.
तृणमूलशी मगोने सख्य केले आहे. प्रचारावेळी काँग्रेस आणि भाजपवर मगोवाल्यांनी बेछूट आरोप केले आहेत. अशा स्थितीत आता कुणाच्या मदतीला जावे, हाच विचार मगोच्या नेत्यांना पडला आहे. खुद्द मगोचे कार्यकर्तेच उघड बोलत आहेत हे..!
सत्तेपूर्वीच महामंडळांसाठी दावे
अजून मतमोजणी व्हायची आहे. ती होऊन निकाल जाहीर होतील व त्यानंतर सरकारबाबत फैसला होईल. पण अतिउत्साही, शितापुढे मीठ खाणाऱ्यांना ते कोण सांगणार? आज मडगावात एक्झिट पोलच्या निष्कर्षांवरच चर्चा चालली. एक गट तर कॉंग्रेस सरकार सत्तेवर आल्याच्या भ्रमांतच वावरत होता. तेवढ्याने भागले नाही तर तो गट विविध सरकारी महामंडळांवरील नियुक्तीही करून मोकळा झाला.
तेवढ्यात त्या बाजूने जाणाऱ्या एकट्याने त्यांना मला जास्त काही नको रवींद्र भवन मिळाले की बस्स असे सांगून टाकले व इतरांची बोलतीच बंद केली. सरकार येणे गरजेचे का आहे ते यातून दिसून येते.
मगोप-तृणमूलला ‘अच्छे दिन’
एक्झिट पोलमुळे मगो-तृणमूल युतीच्या गोटात सध्या खुशीचा माहोल आहे. गोव्यात सर्वसाधारण सर्वांनीच या युतीकडे दुर्लक्ष केलेले असले तरी काही एक्झिट पोलने त्यांच्या पारड्यात पाच ते नऊपर्यंत जागा टाकल्याने या युतीचा भाव भलताच वधारला आहे. मगोवाले तर सुदिनरावांकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहू लागले आहेत. आता या जागात बाणावली व नावेलीचा समावेश असेल तर चर्चिल त्यांच्या मार्गात आडवे आले नाहीत म्हणजे मिळवले अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरू होती.
तीन शिलेदार
प्रत्येकवेळी गोव्यात काँग्रेसची सत्तेची वाट सासष्टी खुली करून द्यायची. यावेळी प्रथमच बार्देस तालुका धावून येण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे मायकल लोबो यांनी काँग्रेससाठी केलेले काम. गोव्यात काँग्रेसचे सरकार यावे यासाठी दिगंबर कामत आणि विजय सरदेसाई यांनीही बरेच प्रयत्न केले आहेत.
काल कामत यांच्या वाढदिवशी हे तिन्ही नेते एकत्र आले. वास्तविक 2017 मध्ये मायकल लोबो यांनी विजयला भाजप बरोबर नेऊन काँग्रेसच्या तोंडाचा सत्तेचा घास पळविला होता. यावेळी त्याच मायकलमुळे सत्ता पुन्हा काँग्रेसच्या दारात येऊ शकते. दिगंबर मुख्यमंत्री झाल्यास मायकल उपमुख्यमंत्री होऊ शकतात. विजय सरदेसाई यांनाही एखादे दमदार खाते मिळू शकते, असे सांगितले जाते.
बंद लॉकरमागील गूढ
लिक्विडेशनमध्ये गेलेल्या मडगाव अर्बन बँकेचे सुमारे अडिचशे लॉकर संबंधित लॉकरधारक कोणताच प्रतिसाद देत नसल्याने ते फोडण्याची पाळी बँकेवर आली आहे. सदर लॉकर बँकेला परत करावेत म्हणून दिलेली मुदत संपून कित्येक महिने उलटले. लॉकरधारक प्रतिसाद का देत नाहीत याचा शोध घेतला असता अनेकांचा ठावठिकाणाच लागलेला नाही त्यामुळे त्या लॉकरात खरोखरच मौल्यवान वस्तू असतील की काय, नसल्यास काय करावयाचे असा मुद्दाही उपस्थित झाला आहे.
डोंगरकापणी अन् रेती वाहतूक
फोंडा तालुक्यात बेकायदा डोंगरकापणी सर्रासपणे सुरू आहे. केवळ फोंड्यातच नव्हे सबंध राज्यात हा गैरप्रकार सुरू आहे. पण याकडे सरकारी यंत्रणा सोयीस्करपणे डोळेझाक करते. फ्लाईंग स्क्वॉड अर्थातच भरारी पथक नावाचा जो काही प्रकार आहे, तो काही लवकर पोचत नाही, बऱ्याचदा सरकारी यंत्रणेकडून अशाप्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. सामाजिक कार्यकर्ते तक्रार करतात, पण सरकारी यंत्रणेकडून तसे सहकार्य पाहिजे ना. डोंगरकापणीप्रमाणे बेकायदा रेती उत्खनन आणि वाहतुकीच्याबाबतीतही तोच प्रकार आहे.
एका पर्यावरणप्रेमीने तर तीव्र नाराजी व्यक्त करताना या लोकांचे हातच खिशात आहेत, आणि हप्तापण सुरू ना, त्यामुळे तक्रारींकडे नजरअंदाज केली जाते, असा आरोप केला. काहीवेळा तशाच दमदार तक्रारी आल्यानंतर सरकारी यंत्रणा जागी होते, अन्यथा ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’. काय चालले आहे हे राज्यात..!
दिगंबरबाब फॉर्मात
दिगंबर कामत यांचा काल झालेला वाढदिवस जरा जास्तच झोकात झाला. या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांच्या कार्यकर्त्यानी भरपूर गर्दी केली होती. आता एकाच दिवसानंतर गोव्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे. जे संकेत मिळतात ते पाहिल्यास काँग्रेसचेच सरकार स्थापन होणार असे वाटते. तसे झाल्यास मुख्यमंत्री म्हणून दिगंबर कामत यांचे एकमेव नाव पुढे येण्याची शक्यता आहे. काल त्यांच्या वाढदिनी त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये हाच विश्वास जाणवत होता. पुढचे मुख्यमंत्री आमचे बाबाच असे त्यांचे कार्यकर्ते एकमेकांना सांगत असताना दिसत होते.
22 अधिक ऐवजी 20 अधिक!
राज्यातील मतदानापूर्वी व नंतरही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच भाजपने 22 अधिक जागा मिळतील असा ठाम विश्वास व्यक्त केला होता व त्याच्याशी ते कालपर्यंत ठाम होते. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन केलेल्या चर्चेनंतर भाजपला 20 अधिक जागा मिळणार असे वक्तव्य केल्याने त्यांचा आत्मविश्वास ढळू लागला की काय अशी चर्चा आहे. सरकारमध्ये असलेल्या मगोला भाजपने अपमानित करून व विश्वासात न घेता मंत्रिमंडळातून काढून टाकले होते.
मगोनेही सावंत यांच्या नेतृत्वाला स्पष्टपणे नकारघंटा दर्शविली आहे. त्यामुळे या सत्तास्थापनेच्या शर्यतीत भाजपचे मंत्री विश्वजित राणे यांनी बाजी मारली आहे. तेच नेतृत्व करण्यास समर्थ असल्याचे ढवळीकरांनी पोचपावती दिली आहे. सावंत हे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग तसा खडतर आहे त्यामुळे निवडणूक जिंकणारे हुकूमी एक्का असलेले राणे हे स्वतःचे घोडे पुढे दामटण्यासाठी ढवळीकरांच्या नथीतून तीर मारत असल्याची चर्चा भाजप वर्तुळात आहे.
बाबूंच्या मनात लाडू !
‘मन मे लड्डू फुटा’ या हिंदी वाक्यप्रचाराचा अर्थ आपले उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांना चांगलाच माहीत असणार. राज्यात त्रिशंकू विधानसभा आली तर भाजपाला सत्ता बनविण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागणार. मात्र, अशाने विद्यमान मुख्यमंत्र्याचे चान्सेस कमी होणार आणि इतरांचा पाठींबा घेऊन सरकार बनविण्यासाठी बाबू कवळेकर हाच एकमेव पर्याय असल्याचे काही भावी आमदार म्हणायला लागले आहेत.
आता हे ऐकून बाबूच्या मनात आनंदाचे लाडू फुटायला लागले आहेत. असे झाले तर बाबूचे उजवा व डावा हात मानले जाणारे दोनी खुशालीचे हात निश्चितच स्वर्गाला टेकणार.
वजन काटा सांगेत कशाला?
कचरा प्रकल्प काकोडा कुडचडेत साकारतोय; पण कचरा घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा वजन काटा सांगेत कशाला बसविला जातो हा प्रश्न सांगेवासीयांना पडलेला आहे. सत्ताधारी पालिका मंडळ भाजपचे. पण, अचानक कोणालाही विश्वासात न घेता पालिकेने कचरा मोजण्याचा वजन काटा सांगे आरोग्य केंद्रात बसविण्याचा आणि तो सुद्धा सांगे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बसविण्याचे कारण तरी काय? कचरा प्रकल्प कुडचडेत मग वजन काटा सांगेत करण्याचे खास कारण काय? हे सांगेवासीयांना सांगण्याची जबाबदारी कोणाची. यात असं काय दडलंय कोणालाही न कळविता चुकीच्या जागी वजन काटा बसविण्यामागे असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहे.
जनतेला विश्वासात न घेता कुडचडेतील कचरा वजन करण्यासाठी सांगेची निवड करण्यामागे काहीतरी छुपा रुस्तम असावा असा दाट संशय लोकांना येऊ लागला आहे. आता निवडणूक निकाल लागल्यानंतर हा वाद उफाळून येणार हे नक्की असून या माघे कोणाचा हात आहे हे जनतेला कळायला हवे.
मतपेट्या खरंच सुरक्षित आहेत?
मतदानाच्या निकालाला अवघा एक दिवस उरला असताना गोव्यात मतपेट्या फोडल्याची खबर राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचली अन् उमेदवारांपासून सामान्य कार्यकर्ते चिंताग्रस्त बनल्याने प्रशासनाकडे लोक बोट दाखवू लागली आहे.
आता राज्यातील मतपेट्याकडे सवशयाने पाहू लागले आहे. इतका कडेकोट बंदोबस्त असताना मतपेट्या फोडल्या जातात मग निकाल लागल्यावर काय होणार त्याची प्रचिती गोमंतकीय जनतेला आली असल्याने लोकशाही निर्धोक व्हावी म्हणून जनता अपेक्षा करीत असताना असले मतपेट्या फोडण्याचे प्रकार म्हणजे ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ असेच म्हणावे लागेल.
इट्स फिफ्टी फिफ्टी!
गोव्यात सत्ता कोण स्थापणार? मुख्यमंत्री कोण बनणार? हे अजून गुलदस्त्यात असले तरी अनेक उमेदवार आपण आमदार बनलो व आता आपणच मंत्री बनणार, मुख्यमंत्री बनणार अशा थाटात वागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
यात त्या एक्झिट पोलवाल्यानी गोंधळ अधिकच वाढविला आहे.जर काही एक्झिट पोलवाल्यांनी जे अंदाजे धावोदसेचे गणित केले आहे त्याची सरासरी काढल्यास गोव्यात भाजपा व काँग्रेसला समान म्हणजे सोळा सोळा जागा मिळणार आहे. याचाच अर्थ निकाल फिफ्टी फिफ्टी लागणार असेल तर मग इतरांची चांदीचा म्हणावी लागेल.
काणकोणात विजय कुणाचा!
नशिबाशिवाय ज्यास्त व वेळे आदी काही मिळत नाही असे ग्रामीण भागात मानले जाते. कोणकोण मतदारसंघात विजय कुणाचा? असा प्रश्न विचारल्यास उत्तर मिळते विजय भाजपाचा. मात्र अपक्ष उमेदवार विजय पै खोत यांचे पारडे जड का? यावर स्पष्टीकरण देताना विजय समर्थक सांगतात की, काणकोणात विजय पै खोतच जिंकणार व भाजपाला पाठींबा देणार. पण, लोक म्हणतात काणकोणात विजय भाजपाचाच होईल. रमेश तवडकरजी, महादेव देसाईजी आणि काँग्रेसचे आंदोलनजीवी उमेदवार जनाभाई ऐकताय ना, विजय म्हणतो विजय भाजपाचाच.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.