एकेकाळी आंबेवन या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात शंभरपेक्षा अधिक आंब्याच्या जाती होत्या. मात्र आता जागेची कमतरता आणि इतर कारणांमुळे गोव्याचा हा आंबा कमी होत चालला आहे. त्यामुळे अनेक जाती नष्ट झाल्या आहे. अशा परिस्थितीत त्यांपैकी 42 जातींचे संवर्धन करण्यासाठी भारतीय कृषी विज्ञान संस्थेने या जातींची बिजे आपल्या जनुकीय पेढीत (जर्मप्लाझ्मा बँक) साठवून ठेवली आहेत.
या केंद्राचे पूर्वीचे वैज्ञानिक ए. आर. देसाई यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गोव्यातील शंभरपेक्षा अधिक आंब्याच्या जातींपैकी 72 जातींची नोंद 1979 साली करण्यात आली होती. यात नंतर आणखीही भर पडली. या जनुकीय पेढीत साठविलेल्या बिजांतून ही संस्था लोकांना हवे असल्यास कलमे तयार करून देते, अशी माहिती त्यांनी दिली.
गोव्यात आंब्याच्या या जाती पोर्तुगीज मिशनऱ्यांनी आणल्या होत्या. 16 व्या शतकात त्यांनी कलमे तयार करण्याची कलाही शिकून घेतली होती. याचमुळे गोव्यातील बहुतेक आंब्यांना या पाद्रींची नावे देण्यात आली आहेत. सध्या कृषी खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गोव्यात 5 हजार हेक्टर जमीन आंब्याच्या लागवडीखाली आलेली असून दरवर्षी त्यातून 11 हजार टन उत्पन्न येते.
वाढती लोकसंख्या यामुळे कमी झालेली जमीन आणि आंब्यावर होणारा कीटकांचा मारा, यामुळे गोव्यातील आंब्याचे उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे दिसून आले आहे. यात आंब्याच्या काही जाती नष्टही होऊन गेल्या आहेत, अशी माहिती वरिष्ठ वनस्पती तज्ञ मारिया फोन्सेका यांनी दिली.
आंब्याची झाडे उंच वाढत असल्याने आणि त्यांना जागा जास्त लागत असल्याने लोक आंब्याची कलमे लावण्यास पुढे येत नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. कृषी विज्ञान खात्याने काही जनुक पेढीत जी बीजे सांभाळून ठेवली आहेत. परंतु जापाव, खाप्री, पानके, आरुढ, बास्तार्द, बोबींयो, तेमूद, रुझारियो, रेमेदीस, दो बेर्नाद, दो फेर्नांद, दो फिलीप, सेव्हरिंग, तिमोज यासारख्या जाती दुर्मिळ झाल्या आहेत.
गोव्यात सध्या मानकुराद या आंब्याची चलती असून लोक बहुतेक याच जातीचे पीक घेतात. या जातीला आता ‘जीआय टॅग’ प्राप्त झालेला आहे. त्यापाठोपाठ ‘मुसराद’ हा आंबा गोव्यात प्रसिद्ध आहे. मात्र इतर जातींच्याही आंब्याचे लोकांनी पीक घ्यावे, यासाठी कृषी विज्ञान खात्याने प्रयत्न चालविले आहेत. राज्यात आंब्याचे उत्पन्न वाढावे, यासाठी सरकारही कार्यरत आहे.
मालकोरादचा झाला ‘मानकुराद’
आज ज्या आंब्याला गोव्यात मानकुराद म्हणून ओळखले जाते, त्या आंब्याचे मूळ नाव मालकोराद (म्हणजेच फिकट रंगाचा) असे होते.
मात्र कालांतराने त्याचा अपभ्रंश होत होत ते नाव मानकुराद असे झाले. हा आंबा जरी फिकट रंगाचा असला, तरी त्याची चव सर्वांत चांगली असल्याने या जातीला गोव्यातच नव्हे, तर गोव्याबाहेरही मोठी मागणी आहे.
सध्या महाराष्ट्रात सर्वांत अधिक मागणी आहे, त्यात हापूस (आल्फोन्सो), हा आंबाही गोव्यातूनच महाराष्ट्रात गेल्याची नोंद आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.