काकरा-बांबोळी येथील समुद्रकिनाऱ्यावर ठेवलेल्या पारंपरिक मच्छिमारांच्या चार होड्या आज सोमवारी पहाटे चारच्या सुमारास आगीत खाक झाल्या. या होड्यांना आग लागण्याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी घातपाताचा संशय होड्यांच्या मालकांनी व्यक्त केला आहे.
या घटनेप्रकरणी आगशी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर दुर्घटनेत सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
मध्यरात्रीनंतर आग लागल्याचे तेथील लोकांचे म्हणणे आहे. या आगीमुळे काकरा समुद्रकिनाऱ्यावर आगीचे तांडव निर्माण झाले होते. आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने स्थानिकांना काहीच करता आले नाही.
नुकसानग्रस्तांना 8 पंच देणार महिन्याचे वेतन : सांताक्रुझ सरपंच जेनिफर ओलिव्हेरा व उपसरपंच व्हिनासिओ डॉम्निक परेरा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सांताक्रुझ पंचायतीच्या आठ पंचसदस्यांनी आपले एक महिन्याचे मानधन नुकसानग्रस्तांना देण्याचे जाहीर केले.
त्यांचा उदरनिर्वाह या होड्यांच्या मदतीने मासेमारीवर अवलंबून असल्याने सरकारने त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. नुकसानग्रस्त होड्यांच्या मालकांना कायदेशीर मदत लागल्यास सांताक्रुझ पंचायत त्यांना पाठिंबा देईल, असे उपसरपंच परेरा यांनी सांगितले.
‘त्या’ चारच होड्या कशा जळल्या?
आगीत खाक झालेल्या या चार होड्यांपैकी दोन लाकडी तर दोन फायबरच्या होड्यांचा समावेश होता. आग गवताला लागून ती होड्यांना लागल्याची चर्चा होत असली तरी मालकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
प्रत्येक होडीमध्ये अंतर होते तसेच अनेक होड्या रांगेमध्ये समुद्रकिनाऱ्यावर होत्या. त्यातील चारच होड्यांना आग कशी काय लागली? असा त्यांचा सवाल आहे. त्यामुळे संशय बळावला आहे. पोलिसांनी होड्याच्या मालकांची तसेच तेथील काही स्थानिकांच्या जबान्या नोंदविण्याचे काम सुरू केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.