Election Officer  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आचारसंहिता उल्लंघनाच्या 329 तक्रारी

‘सीईओ’ची माहिती : 28,413 फलक हटविले, 2.44 कोटींची मालमत्ता जप्त

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत विद्रुपीकरण कायद्याखाली विविध भागातील सुमारे 28,413 फलक हटविण्यात आले आहेत. ‘सी व्हीजील’ या ॲपद्वारे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल 329 तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यातील 219 प्रकरणी संबंधित तालुक्यातील निर्वाचन अधिकाऱ्यांमार्फत कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. 9 तक्रारींबाबत गुन्हा नोंद झाला आहे. आतापर्यंत सुमारे 2.44 कोटींची दारू, ड्रग्ज, रोख रक्कम तसेच वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) कुणाल यांनी दिली. (Goa Assembly Election 2022 latest news)

राज्यातील 40 मतदारसंघामध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे 81 भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यातील एक पथक राखीव आहे. ‘सी व्हीजील’ या ॲपमार्फत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे येणाऱ्या तक्रारींची दखल घेतली जात असून त्यांची शहानिशा केली जात आहे. आतापर्यंत आलेल्या तक्रारींपैकी 219 मध्ये तथ्य असल्याने उर्वरित तक्रारी रद्द करण्यात आल्या आहेत. दररोज अशा प्रकारच्या सरासरी 30 तक्रारी दाखल होत आहेत. उमेदवाराला पाचजणांना सोबत घेऊन घरोघरी प्रचार करण्यास मुभा आहे, तरीही कार्यकर्त्यांच्या मोठा जमावासह ते फिरत असल्याच्या तक्रारी आल्यास भरारी पथके तेथे जाऊन कारवाई करत आहेत, असे कुणाल यांनी सांगितले.

निवडणूक (Election) आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये,यासाठी फर्मागुडी येथील अभियांत्रिकीच्या पदवी स्वयंसेवकांची मदत घेण्यात येत आहे. कोरोना मार्गदर्शक तत्त्वे, निवडणूक प्रचाराची मार्गदर्शक सूचना तसेच निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन तसेच सोशल मीडियावरही लक्ष ठेवण्यात येत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, पोलिस, अबकारी खाते यांच्यामार्फत बेकायदेशीर मद्यसाठा, ड्रग्ज तसेच हिशोब न दाखवू शकलेली रक्कम जप्त करण्यात येत आहे. मतदारांना त्यांच्या मतदारसंघातील उमेदवारांची इत्यंभूत माहिती ‘केवायसी ॲप’ अपलोड केली जाणार आहे. त्यामुळे मतदारांना त्या उमेदवारांची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे, असे कुणाल यांनी स्पष्ट केले.

80 व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना, विकलांग व कोरोना (Coronavirus) संसर्ग इस्पितळात उपचारासाठी दाखल असलेल्या मतदारांना टपाल मतपत्रिकाद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. राज्यात अशा मतदारांची माहिती जमा करण्यात आली असून ‘फॉर्म डी’ येत्या 26 जानेवारीनंतर या मतदारांच्या घरी निवडणूक अधिकाऱ्यांचे पथक जाऊन देणार आहेत. त्यानंतर तो भरून झाल्यावर 5 ते 12 फेब्रुवारीच्या काळात या मतदारांकडून जमा केला जाणार आहे. या नागरिकांच्या घरी भेट देताना दोनवेळा संबंधित मतदार सापडला नाही तर त्याला मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही असे जिल्हा निवडणूक अधिकारी अजित रॉय यांनी सांगितले.

2.44 कोटींचा माल जप्त

राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 2.44 कोटींची दारू, ड्रग्ज, रोख रक्कम तसेच वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) कुणाल यांनी दिली.

निमलष्करी दलाच्या 55 कंपन्या मागवल्या

या निवडणुकीसाठी राज्यातील सुरक्षा व्यवस्थेसाठी निम लष्करी दलाच्या सुमारे 55 कंपन्या मागवण्यात आल्या आहेत. त्यापैकी सध्या 20 कंपन्या गोव्यात दाखल झाल्या आहेत. त्या विविध पोलिस स्थानकासाठी तसेच संचलनासाठी वापरण्यात येत आहेत. राज्यातील पोलिसांव्यतिरिक्त ही अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित 35 कंपन्या येत्या पुढील दिवसात गोव्यात दाखल होणार आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक बोसेट सिल्वा यांनी दिली.

28 पर्यंत अंतिम मतदारयादी

5 जानेवारी 2021 रोजी मतदार याद्या तयार करण्यात आल्यानंतर 18 वर्षे पूर्ण झालेल्यांचे 14,127 अर्ज त्यांची नावे मतदार यादीत समावेश करण्यासाठी आले आहेत. या अर्जांची छाननी व शहानिशा करण्यात आल्यानंतर त्यांचा समावेश केला जाईल. ही प्रक्रिया पूर्ण करून येत्या 28 जानेवारीपर्यंत अंतिम मतदार यादी तयार केली जाईल. त्यामुळे पात्र असलेल्या अर्जदारांना मतदानाचा हक्क मिळणार आहे, असे कुणाल म्हणाले.

101 जणांच्या तडिपारीची शिफारस

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात माहिती देताना पोलिस महानिरीक्षक राजेश कुमार म्हणाले की, आतापर्यंत गुन्हेगारी पार्श्‍वभूमच्या 264 जणांची नोंद करण्यात आली आहे. 6 जण ‘रासुका’खाली आहेत. 101 जणांना राज्यातून तडिपार करण्याचा प्रस्ताव जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. त्यातील 39 जणांविरुद्ध प्रक्रिया सुरू आहे.त्यातील ३० जणांनी शांतता भंग न करण्याची हमी दिली आहे. 1700 जणांना आजपर्यंत प्रतिबंधात्मक अटक (Arrest) करून त्यांना जामिनावर सोडले आहे. राज्यातील चेकनाक्यांवरील तपासणी कडक करण्यात आली आहे. प्रवेश करणाऱ्या माल वाहतूक वाहनांवर देखरेख ठेवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT